Saturday, February 18, 2012

दवबिंदुंचा गजरा

केसामध्ये दवबिंदुंचा माळून गजरा,
चुकवून आली शशी-निशेच्या चुकार नजरा,
रंग उषेचे घेऊन आली,
गालावरती गुलाल लाली,
नभ-भाळावर चमचमणारा रवी हासरा.

नेसून गोऱ्या अंगावरती हिरवा शालू,
फुलाफुलांनी बहरून आला नाजूक वेलू,
खांद्यापासून फुटल्या फांद्या,
बुंधा त्यांचा सुडौल बांधा,
वसंतवैभव गात्रांमधुनी लागे खेळू.

पसरून काळे कुंतल झाली श्याम-शर्वरी,
विखुरल्या अन जणू तारका शुभ्र मोगरी.
चमचमणाऱ्या कर्णफुलांची,
रेखीव नक्षी नक्षत्रांची,
भांगामधले कुंकुम भासे शुक्र रुपेरी.
===========================
सारंग भणगे. (३१ जानेवारी २०१२)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...