Sunday, April 26, 2009

कृष्णवेडी

व्याकुळली एक राधा,
ऐक सांगते वेदना,
कृष्णविरहाची व्यथा,
ना कळे मधुसूदना.

गाई गोपाळात दंग,
कृष्ण कसला निःसंग.
मूक रडते मी वेडी,
तरी भावना अभंग.

त्याचे अवघे गोकुळ,
माझा केशव केवळ.
तो लीलेत निमग्न,
माझी वाढे तळमळ.

म्हणे पूर्ण अवतार,
करी जनाचा उद्धार,
असो निर्गुण निरिच्छ.
माझा भक्तीचा श्रृंगार.

मी त्यासी ओवाळते,
मनामध्ये आळविते.
भक्ती माझी अनाहत,
अव्यक्तासही चाळविते.

मी न झाले निर्मम,
मज हवा समागम,
भक्तीच्या विलासात,
होय मधुर संगम.

माझी वासना विशुद्ध,
मी बंदिनी अबद्ध,
मी मिलनोत्सुक मुक्ता,
अव्यक्त शब्दबद्ध.
===============
सारंग भणगे. (25 एप्रिल 2009)

Saturday, April 25, 2009

उगाच एक कविता

कशासाठी स्वप्नांचे तु जाळलेस दिवे
अन् आकाशी स्वप्नखगांचे माळलेस थवे

मी गंध होतो दरवळत गं आसपास
अन्य फ़ुलांचे का गजरे तु माळलेस नवे

शय्येवरती तळमळताना एकांकि जळलीस तु
अन् पेटलेल्या श्रृंगारांना का जाळलेस सवे
==============================
सारंग भणगे (मार्च 2009)

Thursday, April 23, 2009

देहात वासंतिक...दुपार पेटली

देहात वासंतिक
दुपार पेटली
मी रात्र थंड ही
मुकाट रेटली

तु तारू दूरसा
अथांग सागरी
येशील मिलना
कोरड्या किनारी?

मी खळाळती नदी
तु विरक्त वाटसरू
सलील वैभव हे
तुजवीण काय करू!

या तनुत दाटला
घनथेंब अमृताचा
घे तव यJअकुंडी
अर्घ्य या घृताचा

मी तेवते अभोगी
जळते सांद्र मंद्र
या अवस नभीचा
होशील काय चंद्र

ही सतार छेड ना
नि झंकार मारवा
या मैफ़लीत हो
सुरेल गारवा

मी विषण्ण अपर्णा
विरह - योगिनी
तु येशील कदा
जलमेघ होऊनी?

घंटेसम घणाणते
मी तुज आळविते
तु अलिप्त निश्चल
जरी गाभारा चाळविते
================
सारंग भणगे. (22 एप्रिल 2009)

Wednesday, April 22, 2009

रत्नाकर 2

तु थेंब,
आणि मी थेंबांचं असीम आकाश.
तु अंश,
आणि मी अनेक अंशांचं अवकाश.

तुझ्य अंतरंगाला सापडेल जेव्हा,
तुझ्यातल्या अथांग सागराचा,
हा असा अर्थ....तेव्हा

अनिश्चततेच्या वादळात
निश्चलतेचा अडग चिराग,
तेवत राहील, अविरत, चिरंतन.

वैफ़ल्याला सुगंध लाभेल,
साफ़ल्याच्या साक्षात्काराचा,
आणि निष्क्रियतेचा विखवृक्ष,
कोसळून फ़लित होईल,
चिरस्थिर ही वसुंधरा..

आणि गळून पडेल बिंदुंचे भान.
बदलतील प्रतलांचे अन्वयार्थ.
जुळेल सत्-चित्-आनंदमयी नाते,
बिंदुंच्या अतीत नेणा-या प्रतलावरील,
एका,

केंद्रबिंदुशी...

असा मी सिंधु..
-------------------------
सारंग भणगे. (22 एप्रिल 2009)

Sunday, April 19, 2009

रत्नाकर

चिरागSSSS..........

(जांभळ्या आसमंतात कुठलासा अनाहत निनाद
आणि त्याचे घुमणारे पडसाद...धरतीवर...)

पार्थिवाच्या किना-याकडे धावणा-या
त्या अपार्थिव लाटांना..
भुललास!

मी खोल रे,
अनंताच्या असीम व्याप्तीएव्हढा!

त्या हलणा-या शारीर लाटांमध्ये
कसले शोधतोस,
वैराग्य!

थोडा आत ये,
अज्ञाताच्या निगूढ अंतरात
मि, रत्नाकर (झोपाळलेल्या आकाशाला चेतवणा-या धीरगंभीर आवाजात...),
स्थिरतेचे स्थितप्रज्ञ स्पंदन अनुभवण्यासाठी...
थोडा आत ये..
-------------------
सारंग भणगे. (20 एप्रिल 2009)

Monday, April 13, 2009

फ़ुटकळसे काही

खोदून संपलो केव्हाच मी जरी
का घालशी उगा टीकाव आजही

आता बुजलो सये ढीगा-यात मी
कशास चढविशी हे भराव आजही

खेळात रंगलो मी तुझ्याच संगती
कशास करिशी तरी सराव आजही

शिवून कावळे पिंडास गेले तरी
मला मोडण्याचे का ठराव आजही
=======================
सारंग भणगे (13 एप्रिल 2009)

फ़ुटकळसे काही

खोदून संपलो केव्हाच मी जरी
का घालशी उगा टीकाव आजही

आता बुजलो सये ढीगा-यात मी
कशास चढविशी हे भराव आजही

खेळात रंगलो मी तुझ्याच संगती
कशास करिशी तरी सराव आजही

शिवून कावळे पिंडास गेले तरी
मला मोडण्याचे का ठराव आजही
=======================
सारंग भणगे (13 एप्रिल 2009)

Saturday, April 11, 2009

भेट

एकटं वाहून शेवटी
आभाळही थकतं
क्षितीजावर धरेला
हळूच जाऊन टेकतं

वेल बिलगते वृक्षा
फ़ुले अन् वेलीवर
सारंगांची गर्दी
फ़ुल आणि कळीवर

कळी खुलते हसते
रवीकराच्या पाशात
भुंगाही मस्त रमतो
कमळाच्या कोषात

कमळालाही पंकाची
साथ खचित असते
मंडूकाचे पाऊलही
पंकामध्येच फ़सते

मंडूकही रिझवू पाही
डराव डराव बेडकिला
वा-याची आस असते
सताड उघड्या खिडकीला

वारा तीच्या कांतीला
हळूच स्पर्शून जातो
मोहोरल्या कायेवर
रोमांच गीत गातो

रोमांचातून प्रियसखा
भेटीस खास येतो
दुनियेत सांगा दोस्तहो
कोण भेटीविन रहातो?
==============
सारंग भणगे. (16 मार्च 2009)

ईथे ओशाळला मृत्यु

सोललेला देह तुझा अग्निजाळ भासतो,
या खुदा! हा संभा, रक्तबंबाळ हासतो.

फ़ोडल्या डोळ्यातुनि रक्तपूर जरी वाहिले,
यातनांचे बेबंध तो लोळकल्लोळ सोसतो.

आसूड तुटे, तो न फ़ुटे, लक्तरांची आभूषणे,
ठायी ठायी वेदनांना तो घायाळ ठासतो.

फ़ाटल्या उरातल्या फ़ासळ्याही फ़ाटल्या,
फ़ोडताना जांघ तो टाच रक्ताळ घासतो.

बांग आली, हाय मी काय दावू खुदास मूँ,
पाक माझ्या आस्तिनात मी विटाळ पोसतो.
===============================
सारंग भणगे. (6 एप्रिल 2009)

Thursday, April 9, 2009

झुंजुमुंजु वेळ

झुंजुमुंजु वेळ, पाखरांचे पालुपद,
तांबड्या रेघेवर तेजाचे ध्रुवपद.

किरणांची भूपाळी, वा-याचे संगीत,
पाण्यात निथळले प्रतिबिंब रंगीत.

सोनेरी कळसावर पिवळी बकुळी,
रानाच्या कुशीत हसते चाफ़ेकळी.

चरवीतल्या दुधाचा पांढरा फ़ेस,
रात्रीत जागून विसावली वेस.

पिलांच्या चोचीत न्याहारीचा चारा,
खोप्यात वहातो नदीवरचा वारा.

नदीवर तरंग अल्लड नाचतात,
वाळुच्या सलगीने कविता सुचतात.
========================
सारंग भणगे. (4 एप्रिल 2009)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...