व्याकुळली एक राधा,
ऐक सांगते वेदना,
कृष्णविरहाची व्यथा,
ना कळे मधुसूदना.
गाई गोपाळात दंग,
कृष्ण कसला निःसंग.
मूक रडते मी वेडी,
तरी भावना अभंग.
त्याचे अवघे गोकुळ,
माझा केशव केवळ.
तो लीलेत निमग्न,
माझी वाढे तळमळ.
म्हणे पूर्ण अवतार,
करी जनाचा उद्धार,
असो निर्गुण निरिच्छ.
माझा भक्तीचा श्रृंगार.
मी त्यासी ओवाळते,
मनामध्ये आळविते.
भक्ती माझी अनाहत,
अव्यक्तासही चाळविते.
मी न झाले निर्मम,
मज हवा समागम,
भक्तीच्या विलासात,
होय मधुर संगम.
माझी वासना विशुद्ध,
मी बंदिनी अबद्ध,
मी मिलनोत्सुक मुक्ता,
अव्यक्त शब्दबद्ध.
===============
सारंग भणगे. (25 एप्रिल 2009)
No comments:
Post a Comment