Thursday, April 9, 2009

झुंजुमुंजु वेळ

झुंजुमुंजु वेळ, पाखरांचे पालुपद,
तांबड्या रेघेवर तेजाचे ध्रुवपद.

किरणांची भूपाळी, वा-याचे संगीत,
पाण्यात निथळले प्रतिबिंब रंगीत.

सोनेरी कळसावर पिवळी बकुळी,
रानाच्या कुशीत हसते चाफ़ेकळी.

चरवीतल्या दुधाचा पांढरा फ़ेस,
रात्रीत जागून विसावली वेस.

पिलांच्या चोचीत न्याहारीचा चारा,
खोप्यात वहातो नदीवरचा वारा.

नदीवर तरंग अल्लड नाचतात,
वाळुच्या सलगीने कविता सुचतात.
========================
सारंग भणगे. (4 एप्रिल 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...