Thursday, April 23, 2009

देहात वासंतिक...दुपार पेटली

देहात वासंतिक
दुपार पेटली
मी रात्र थंड ही
मुकाट रेटली

तु तारू दूरसा
अथांग सागरी
येशील मिलना
कोरड्या किनारी?

मी खळाळती नदी
तु विरक्त वाटसरू
सलील वैभव हे
तुजवीण काय करू!

या तनुत दाटला
घनथेंब अमृताचा
घे तव यJअकुंडी
अर्घ्य या घृताचा

मी तेवते अभोगी
जळते सांद्र मंद्र
या अवस नभीचा
होशील काय चंद्र

ही सतार छेड ना
नि झंकार मारवा
या मैफ़लीत हो
सुरेल गारवा

मी विषण्ण अपर्णा
विरह - योगिनी
तु येशील कदा
जलमेघ होऊनी?

घंटेसम घणाणते
मी तुज आळविते
तु अलिप्त निश्चल
जरी गाभारा चाळविते
================
सारंग भणगे. (22 एप्रिल 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...