Wednesday, May 20, 2026

लडाख - मे २०२६

समुद्रसपाटी पासून ११,००० ते १८,००० फूट उंचीवर, अनेकविध रंगांची रेती; माती; वाळू, दगड; धोंडे; खडक; डोंगर; पर्वत; आणि बर्फाच्छादित शिखरे; चिंचोळ्या नद्या; विस्तीर्ण वाळवंटी दऱ्या-खोरे, रंग बदलणाऱ्या निळ्या रंगांची विशाल सरोवरे, डोंगरांच्या कड्यांवर बांधलेली तिबेटी पद्धतीची घरे; निसर्गरम्य परिसरात डोंगरांवर बांधलेल्या बुद्धाच्या उंच उंच मुर्त्यांची बुद्ध विहारे, अत्यंत नम्र; सज्जन; मितभाषी; कामसू; चपट्या नाकाची आणि मिचमिच्या डोळ्यांची साधी सरळ माणसे, आणि त्यांनी निर्माण केलेली निर्मळ; निरलस; निसर्ग-प्रेरित संस्कृती.....अशा अनेक प्रकारे विविधगुणदर्शन घडवून आणणाऱ्या नितांत सुंदर लडाख बद्दल खरेतर भरपूर काही लिहिता येईल, लिहायचा प्रयत्नही करेन. परंतु इतक्या सगळ्या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लडाखभर सतत दिसत राहतात ते भारतीय लष्कराचे सैनिकी तळ, लष्करी गणवेश धारण केलेले रुबाबदार सैनिक; हिरव्या रंगाच्या गाड्या; BRO (Border Road Organisation) ने तयार केलेले गुळगुळीत रस्ते; जागोजागी BRO च्या कार्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख करणारी तडफदार वाक्ये ई. अनेक गोष्टींबरोबर उल्लेख करणे आवश्यक असलेली उल्लेखनीय अशी भारतीय लष्कराची स्मारके!

स्मारक १ - Hall of Fame, Leh

"When you go home, tell them of us and say, for your tomorrow, we gave our today."

फक्त credit card नेच प्रवेश फी स्वीकारण्याची लष्करी पद्धत आधीच असलेला विश्वास आणि आदर दृढ करते. प्रवेश घेतल्याबरोबर असलेल्या छोट्याशा दालनात एक लष्करी अधिकारी तुमचे स्वागत करतो तेव्हा सर्वप्रथम लक्ष जाते ते वर उद्धृत केलेल्या संदेशावर, आणि टचकन डोळ्यात पाणी उभे राहते. 'कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौट के फिर ना आये' ह्या कवी प्रदीप ह्यांच्या अजरामर ओळींची आठवण करून देणारे ते वाक्य, आपल्या सैनिकांच्या सर्वोच्च निरपेक्ष त्यागाची आठवण करून देते. त्यानंतर अनेकदा आणि वारंवार डोळ्यात पाणी येत राहते; गालांवरून वाहत राहते. सैन्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्याहून अधिक आपण काही केले पाहिजे, पण एवढी संवेदनशीलता तरी आपल्यामध्ये असलीच पाहिजे!

तेथील लष्करी अधिकारी लडाखमध्ये लढल्या गेलेल्या एकूण ५ युद्धांची (१९६२ - चीन, १९६५ - पाकिस्तान, १९७१ - पाकिस्तान, १९९९ - पाकिस्तान, २०२० (गलवान) - चीन) संक्षिप्त ओळख करून देऊन मग १९९९ च्या कारगिल युद्ध्याची तपशीलवार माहिती देतात. जेव्हा ते terrain model वर युद्ध कसे आणि कुठे घडले हे सांगतात तेव्हा अनेक चित्रपट, बातम्या, documentaries मध्ये पाहिलेल्या युद्धाची अधिक स्पष्ट कल्पना येते. शेरशहा Captain विक्रम बात्राचा निडर स्वभाव, Captain मनोजकुमार पांडेंचा विलक्षण पराक्रम, १५ गोळ्या खाऊनही जिवंत राहिलेले सुभेदार योगेंद्र सिंह यादव, ह्यांच्याबरोबरच सर्वात पहिल्या शोध मोहीम पथकातील हालहाल करून मारल्या गेलेल्या सर्वच्या सर्व सैनिकांचा परमोच्च त्याग, त्यांनी भोगलेल्या यातना ऐकून जीव कासावीस होतो.

कारगिल युद्ध्याबरोबरच एकूण भारतीय लष्करातील परमवीर चक्र, महावीर चक्र आणि इतर शौर्य पुरस्कारांची आणि त्यांनी सन्मानित केलेल्या वीर योद्धयांची माहिती दिली जाते. प्रत्येक वेळी जाणवत राहते कि आपले आजचे अस्तित्व हे ह्या शूर योद्धयांच्या अतुलनीय पराक्रम आणि त्यागामुळेच आहे.

संग्रहालयात पाहण्यासारखे, वाचण्यासारखे इतर पुष्कळ आहेच. त्याचा प्रत्यक्ष अनुभव नक्कीच घ्यावा! "Only the best of friends and the worst of enemies visit us."



स्मारक २ - स्योक युद्ध स्मारक, नुब्रा खोरे, लडाख

सियाचीन हिमखंडाविषयी आपण सर्वांनी ऐकलेच असेल. १९८५ साली ह्या अत्यंत मोक्याच्या हिमखंडाला (glacier) भारताने ताब्यात घेतले. वस्तुतः एवढ्या उंचीवर (समुद्रसपाटीपासून २१,००० फूट) आणि मानवी वास्तव्यासाठी अत्यंत प्रतिकूल, किंबहुना मानवी वास्तव्य अशक्यच होईल अशा ह्या हिमखंडावर सैनिकी तळ असण्याची आवश्यकता नाही असे अलिखित सामंजस्य भारत-पाकिस्तान मध्ये होते. परंतु चीन आणि पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी ह्या अशा ठिकाणी भारतीय लष्कराला गेली ४१ वर्षे वास्तव्य करावे लागत आहे. खरेतर, भारताने त्वरित हालचाली करून तिथे लष्करी तळ उभा केला नसता तर १९८५ ला पाकिस्तानने हे मोक्याचे ठाणे काबीज केले असते.

सियाचिनला केवळ बर्फ असतो, सर्वत्र पांढऱ्या बर्फाचे साम्राज्य! तापमान उणे ४० ते ६० अंश इतके अतिप्रचंड थंड असते. २१,००० फूट उंचीवर प्राणवायू अत्यंत विरळ असतो. ह्या आणि अशा अनेक निरतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय सैनिक तिथे तळ ठोकून आहेत.

तिथे आपल्या सैनिकांना ४ महिन्यांहून अधिक काळ वास्तव्यास पाठवले जात नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय हि नुब्रा खोऱ्यातील सियाचीन base camp मधूनच होते. ह्यासाठी फार मोठा खर्च भारतीय लष्कर खर्च करते. पण ४ महिने, अशा अतिप्रचंड थंड वातावरणात राहून, लष्करी क्रिया पार पडून, सतत पांढऱ्या शुभ्र बर्फाचेच केवळ दर्शन घेऊन सैनिकांवर विविध मानसिक परिणाम सुद्धा होतात. अनेकदा तिथे हिमवर्षाव; हिमस्खलन (avalanches) होते, वातावरण सतत बदलत राहते. जरी तिथे चीन-पाकिस्तानबरोबर युद्ध होत नसले तरी क्रूर निसर्गाशी चाललेल्या निरंतर युद्धात अनेक भारतीय सैनिक दरवर्षी आपले प्राण गमावतात! ह्या खंडप्राय देशाचे संरक्षण करण्यासाठी सियाचीनच्या ह्या हिमखंडांच्या टोकांवर आपले सैन्य सर्वस्वाचा त्याग करत गेले ४१ वर्षे प्रत्येक दिवस एक प्रकारच्या युद्धाचा सामना करत तगून आहेत. नुब्रा खोऱ्यातील ह्या स्मारकात १९८५ पासून हुतात्मा झालेल्या ह्या शूरवीरांच्या नावाची यादी आहे. तसे म्हटले तर इतर काहीच नाही, परंतु विशाल डोंगरांनी वेढलेल्या आणि खोल दरीतून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या जवळच उभ्या केलेल्या ह्या स्मारकापाशी जाऊन ह्या वीरांचे किंचित स्मरण करणे हे देखील सौभाग्यच आहे!



स्मारक ३ - रेझिंग ला युद्ध स्मारक, अहिर धाम

मेजर शैतान सिंग ह्यांचे नाव जर ऐकले नसेल तर आपल्या एक मुस्काटात मारून घ्यावी. खरेतर मेजर शैतान सिंग, Captain विक्रम बात्रा, Captain मनोज कुमार पांडे ह्या सारख्यांना आपण दैवत म्हणूनच मानले पाहिजे, त्यांचे पूजन केले पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे; आणि त्यांच्या ह्या स्मारकांना तीर्थस्थळाचा दर्जा दिला पाहिजे. "शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा" राम प्रसाद बिस्मिल ह्यांच्या ह्या ओळी प्रत्यक्षात यायला हव्यात!

१९६२ च्या चीन युद्धात १८,००० फूट उंचीवरील रेझिंग ला खिंडीमध्ये मेजर शैतान सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली चिनी सैन्याबरोबर लढत असताना, ११४ भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, परंतु बदल्यात १३०० चिनी सैनिकांना कंठस्नान घातले, ते देखील तुटपुंजा दारुगोळा, साहित्य, कपडे, अन्न-पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये! एखाद्या कल्पित युद्धकथेमध्ये शोभावा असा विलक्षण, अमानवी पराक्रम गाजवणाऱ्या ह्या ११४ हुतात्म्यांचे स्मारक चुशुल येथे काहीच वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. मे महिन्याच्या उन्हाळी मौसमात, दुपारी साधारणपणे १२ वाजता ३ sweaters अंगावर चढवलेले असतानादेखील प्रचंड वाऱ्याने झोक तर जात होतेच, परंतु थंडीने हुडहुडी भरत होती. तर मग १७-१८ नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत ह्या ११३ वीरांनी कसे युद्ध लढले असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही. ३,००० चिनी सैनिकांशी १२० सैनिक ४ दिवस अन्नपाण्याविना लढले. झुंज अशी दिली कि २ महिन्यांनी जेव्हा भारतीय लष्कराधिकारी रेझिंग ला ला पोहोचले तेव्हा ह्या सैनिकांची बोटे अजूनही बंदुकांवर होती. "दस दस को एक ने मारा" ह्याचा प्रत्यय देणारी अहिर जातीची १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या ह्या सैनिकांच्या विरागाथेचे वर्णन कवी प्रदीपांनी अक्षरश: करून ठेवले आहे -

"जब तक थी सांस लड़े वो

फिर अपनी लाश बिछा दी

संगीन पे धर कर माथा

सो गये अमर बलिदानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुर्बानी"

"थी खून से लथ पथ काया

फिर बंदूक उठाके

दस दस को एक ने मारा

फिर गिर गये होश गंवा के"

स्मारकात ह्या वीर-गाथेची इत्थंभूत माहिती ऐकताना, अमिताभ बच्चन ह्यांच्या आवाजातील documentary पाहताना मनाची प्रचंड कालवाकालव होत राहते, डोळ्यातून अश्रूंचा पारा सतत फुटत राहतो, ऊर अभिमानाने भरून येतो, गळा आणि डोळे ओले होत राहतात. इतका प्रचंड पराक्रम गाजवणारे हे सैनिक अनामिकच राहतात, त्यांच्या त्यागाविषयी आपण अनभिज्ञच राहतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यापेक्षा आपण फिल्मी हिरोंकडून प्रेरणा घेतो, आपले ऐषोआरामातले जीवन जगताना क्वचितच त्यांची आठवण आपण काढतो ई. अनेक संमिश्र भावनांनी आपण भावविवश किंवा भावविव्हल देखील होतो.

ह्या तीन स्मारकरांनी लडाखची माझी हि ट्रिप खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाली. प्रवासाच्या आनंदाला एक अर्थपूर्णता लाभली. सिंधू नदी पाहून, तिला स्पर्श करून आपण ह्या नदीतून उगम झालेल्या, फुललेल्या संस्कृतीचे पाईक आहोत, अविभाज्य भाग आहोत हि भावना गदगदत राहिली, पण ह्या लष्करी स्मारकांमधून लडाखभर पसरलेला, पण डोळ्यांनी न दिसणारा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा लाल रंग आणि त्यांच्या त्यागाचा अदृश्य असा भगवा-केसरी रंग मन भरून राहिला आहे! आणि पुन्हा पुन्हा ते शब्द प्रतिध्वनीत होत राहत आहेत -

"ऐ मेरे वतन के लोगों

ज़रा आंख में भर लो पानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुर्बानी"






स्मारक ४ - छत्रपती शिवाजी महाराज पॅंगॉन्ग लेक

पॅंगॉन्ग लेकला आपण पोहोचत असतानाच आपल्याला सर्वात प्रथम Maratha Light Infantry च्या आवारातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पूर्ण पुतळ्याचे दर्शन होते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. "सप्तसिंधू यवनांच्या हातून मुक्त करा" ह्या महाराजांच्या स्वप्न वजा आदेशाची पूर्ती आज झालेली असली तरीही लडाखच्या दोन बाजूंना आपले दोन कट्टर शत्रू आजही भारतीय प्रदेश गिळंकृत करून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत महाराजांचा विजयी मुद्रेतील हा पुतळा अत्यंत प्रेरणादायी स्मारकचं आहे! ह्या उल्लेखाशिवाय प्रस्तुत लेखाचे प्रयोजन पूर्णही झाले नसते अशी माझी भावना आहे!



- सारंग भणगे (२० मे २०२६) 

Saturday, July 23, 2022

एकांताचा ध्यास असावा एकाकीपण सोडून द्यावे

असू दे देव्हारा शब्दांचा गाभारी पण मौन असावे


प्रेम नसावे कुणावरही प्रेमावरती प्रेम करावे

आनंदावर सारे करती दुःखावरही खूप करावे


देण्यासाठी जन्म आपला दातेपण पण देऊन जावे

देणे म्हणजे गतजन्मींच्या थकीत ऋणांचे बस् परतावे


कधी व्हावे शहर आपण कधी परंतु अरण्य व्हावे

बंध जुळावे अनेकांशी तरी अंतरी अनन्य रहावे


कुणीच आपले नसेल तेव्हा आपण कुणाचे होऊन जावे

धरा-नभाने दूर सारता क्षितीजवासी होऊन जावे


असेल भंगुर क्षणेक जीवन इंद्रधनुसम दिसून जावे

असे जगावे कि जगण्याने मरणालाही अश्रू फुटावे.

============================


  • सारंग भणगे (२६ जून २०२२)

Monday, May 18, 2020

क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे


क्षणाक्षणांचे व्हावे मिसरे आयुष्याची गझल जमावी
रसिका केवळ नको शेवटी हर शेराला दाद मिळावी

सुरेख लिहितो गझला त्याला अपार असते दु:ख म्हणे पण
फसते त्याला दु:खच नसते गैरसमजूत अशी नसावी

आयुष्याच्या मुशायऱ्याला हजर हजारो रसीक श्रोते
हरेक मिसरा जिच्याचसाठी अशी गझल पण हजर नसावी?

असून सारे तिच्या विना हे जगणे वाटे अशी गझल की
शेर कितीही लिहिले तरीही मतल्या शिवाय पूर्ण न व्हावी

बाप होतसे शेर प्रसंगी आणिक होते जमीन आई
मक्ता घेउन त्यांचा आपण गझल मुसलसल पूर्ण करावी

कधी वाटते गझलेला मी जन्म दिला ती माझी मुलगी
पुन्हा वाचता जाणवते की अशीच माझी माय असावी
=============================
सारंग भणगे (१८ मे २०२०)

Sunday, May 17, 2020

जीवनधारा

किती दूरचा प्रवास आहे
नदीस माहित नाही
सारे अंतर पळे निरंतर
शेवट शोधत नाही

दोन किनारे फुलवित जाणे
असा ध्यासही नाही
पांथस्थांची तृषा भागवू
अशी आसही नाही

शुष्कपणाचे दु:ख तिला ना
तरी ‘कोरडी’ नाही
जिते बुडवते; प्रेत तारते
म्हणून ‘तिरडी’ नाही

‘वाहत जाणे’ इतके करते
नदधर्माचे पालन
‘जीवन’धारा म्हणजे असते
निजकर्माचे वाहन
============
सारंग भणगे (१७ मे २०२०)

Tuesday, April 14, 2020

जागृती


अंतरात ज्ञानाला आरपार शोधावे
कोपरे नि कंगोरे तास तास तासावे
आतल्या निनादांचे शांत सूर ऐकावे
धाडतील स्वत्वाचे देवदूत सांगावे

बाह्यरूप विश्वाचे मोहलिप्त छायेचे
पांघरूण आत्म्याला नाशवंत कायेचे
पारतंत्र्य देहाचे जाणताच तू होशी,
मुक्त दूर जावोनी रागरंग मायेचे

दे मला अशी भक्ती दूर सार आसक्ती
ना अहं असूया वा वासना कि अतृप्ती
अमृतस्य पुत्रोऽहं हेच ब्रीद गुंजावे
आत्मलीन होण्याची दे असीम तू शक्ती
========================
सारंग भणगे (१४ एप्रिल २०२०)

Sunday, March 29, 2020

शांत तेवते मनात वात एक मंदशी

शांत तेवते मनात वात एक मंदशी
आत सांडता प्रकाश होय हर्ष मानसी
शांतता निनादता मनास स्थीरता मिळे
विश्व जाणते अशा नरोत्तमास तापसी

ज्ञान ग्रंथ वेद वाक्य ज्ञात त्यास देव ना
वेसणात बांधतो तरी विकार वासना
वेष्टनात बांधले शरीर तुच्छ मानतो
साधना उपासनेत खर्च सर्व चेतना

चित्त फाटते कधी बघून दीनदु:खिता
काळजातुनी फुटे अपूर्व काव्यसंहिता
सार साधनेतले सुबोधवाक्य सांगतो
शब्द त्यास की म्हणू जणू अमोघ अमृता

वाढताच व्यग्रता अलिप्त होउनी बसे
कूर्मतत्व बाणुनी सुषुप्त तृप्त होतसे
आत्मभान जागतां अनेक दीप पेटती
अंतरातला प्रकाश सर्वदूर जातसे
======================

सारंग भणगे (२९ मार्च २०२०)

Friday, December 20, 2019

सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

पूर्ण मी असेन जर अपूर्ण वाटतेच का?
उत्तरे मिळूनही सुटेचनात पेच का?

पांढऱ्या ढगा तुला सवाल एक थेट हा
सावली मला तुझी सदैव जाळतेच का?

झोपलीस त्या कुशीवरी सखे निवांत तू
सांगतेस जे तुझे अतीव प्रेम हेच का?

पोरगी विचारते मला खडा सवाल की
सात वाजता घरात मीच हे असेच का?

दु:ख ना तुला तरी कवी कशास व्हायचे?
फाटले नसेल तर उगा शिवायचेच का?
=====================
सारंग भणगे (१७ डिसेंबर २०१९)

Saturday, October 12, 2019

वृत्तबद्ध कविता

वृत्तबद्ध कविता प्रत्येक कवीने लिहायचा प्रयत्न केलाच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे. वृत्त हे कवितेचे व्याकरण आहे, अर्थात शास्त्र आहे. कविता हि मुळात कला आहेच, परंतु प्रत्येक गोष्टी मध्ये कला आणि शास्त्र ह्यांचा संगम हा प्रतिभेचा उच्चांक ठरतो. विज्ञानामध्ये जितके शास्त्र असते तितकीच कला पण असते. वैज्ञानिकाला देखील प्रतिभेची आवश्यकता असते. त्या प्रतिभेमुळे; सृजनशीलतेमुळे एकच विज्ञान शिकणारा कुणी एक शास्त्रज्ञ बनतो तर दुसरा कुणी केवळ एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत राहतो.

तर मला असे म्हणायचे आहे कि जर कविता करायची असेल तर कवितेचे व्याकरण समजणे; त्याचा अभ्यास करणे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी अभ्यास; सराव आणि साधना करणे हे सारे एक परिपूर्ण कवी होण्यासाठी आवश्यक आहे.

हे लिहीत असताना गायन कलेचा विचार मनात आला, आणि स्वाभाविकपणे किशोर कुमार समोर आला. किशोर कुमार हा शास्त्रीय संगीत न शिकलेला, परंतु असामान्य प्रतिभा लाभलेला गायक! त्याने त्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर पार्श्वगायन क्षेत्राचे शिखर गाठले. परंतु तरीही जर भीमसेनजींची तुलना किशोरशी केली तर भीमसेनजींच्या गायन प्रतिभेविषयी अधिक आदर वाटतो. खरेतर अशी तुलना योग्य नाही, परंतु मला असे वाटते कि गायनकलेचे शास्त्र शिकून त्याचे शिखर गाठणारा, हा पार्श्वगायनाचे शिखर गाठणाऱ्यापेक्षा अधिक उजवा वाटून जातो. अर्थात हे वैयक्तिक मत असू शकते!

तर मूळ मुद्दा हा कि कवीने वृत्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कवी कवितेविषयी किती गंभीर आहे ह्याचा वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास आणि  सराव करणे हा एक महत्वाचा घटक होऊ शकतो.

अर्थात ह्याचा अर्थ केवळ वृत्तामध्येच कविता लिहिली पाहिजे, हा अट्टाहास मला हास्यास्पद आणि अतिरेकी वाटतो. वृत्तांच्या सरावाने वृत्तबद्ध वृत्ती (हे स्वामी निश्चलानंद ह्यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक देखील आहे) तयार झाल्यावर कवीला अमुक एक कविता हि कुठल्या आकृतिबंधामध्ये जन्मली पाहिजे ते देखील उत्स्फूर्तपणे यायला हवे. मग त्यामध्ये केवळ वृत्तामध्येच कविता जन्म घेणार नाही, तर ती कविता उपजत असताना स्वतः:चा आकृतिबंध ठरवून येईल. जर वृत्तबद्ध वृत्ती शक्य असेल तर कवितेच्या सृजनाची हि उत्स्फूर्त प्रक्रिया देखील शक्य आहे. त्यामुळे कविता हि केवळ वृत्तातच असावी असे मत एकांगी वाटते.

वृत्त हे निश्चितपणे कवितेचा आकृतिबंध ठरवते. आकृतिबंध हे बाह्यरूप आहे, तर कवितेचा आशय हे त्याचे आंतररूप किंवा आत्मरूप आहे. आशय अधिक महत्वाचा कि आकृतिबंध हा खरेतर वादाचा मुद्दा असूच शकत नाही. आशयाशिवाय कविता अशक्यच आहे. त्यामुळे तो अत्यावश्यक आहे. आकृतिबंधाची अट हि त्यामानाने दुय्यम आहे.

अर्थात, केवळ आशय आहे म्हणून कुठल्याही आकृतिबंधामध्ये पसरटपणे गद्यप्राय कविता मांडणे, हे मलाही अजिबात पटत नाही, मान्य नाही. अशी कविता लिहूच नये अशा मी मताचा नाही, परंतु अशी कविता हि केवळ आणि केवळ स्वानंदासाठी किंवा स्वान्त सुखाय लिहावी, ती प्रसिद्ध करून त्यावर आपले कवित्व मिरवणे हे मला 'पाप' वाटते! जर अशा मुक्त कवितेला प्रसिद्धी मिळाली नसती तर मराठी कवितेचा दर्जा खूप अधिक चांगला टिकला असता असे मला तरी वाटते.

ह्याचा अर्थ पुन्हा सर्व मुक्त कविता ह्या गद्यप्रायच असतात असे नाही, किंवा त्या अगदीच अप्रसिद्धच राहिल्या पाहिजेत असेही नाही. काही अत्यंत दर्जेदार असे मुक्तकाव्य वाचले आहे आणि ते वाचल्यावर रटाळ वृत्तबद्ध काव्य वाचण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले असेही वाटले आहे.


कवितेबाबत दोन दुराग्रह मला दिसले आहेत, जाणवले आहेत. एक हा कि वृत्तबद्ध कवितेत व्यक्त होता येत नाही म्हणून मुक्तच्या नावाखाली सतत वाट्टेल ते लिहीत राहणे! ह्याने कविता-विश्वाचे साहित्यिक नुकसान होते, तर त्याच्या दुसऱ्या टोकावर मुक्त कविता हि कविताच नाही आणि केवळ वृत्त किंवा छंदबद्धच कविता रचली पाहिजे ह्याने देखील नुकसान होते.

मला कवितेसाठी मध्यममार्ग अधिक योग्य वाटतो, ज्यात वृत्तांचा योग्य अभ्यास आणि शक्यतो वृत्तांमध्ये कविता रचण्याचा प्रयत्न कवींनी केला पाहिजे, पण क्रिकेटमध्ये जसा प्रत्येक फटका हा पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच मारून चालत नाही, तर त्यामध्ये काही अंशी मुक्तता हवी, तशीच काही कविता हि थोडी सैलपणे लिहिल्यास हरकत नसावी.

हे म्हणत असताना आपण लक्षात ठेवले पाहिजे कि वृत्तांच्या पाठोपाठ छंद रचना ज्या आहेत त्यामध्ये आवश्यक ती मोकळीक दिलेली आहे. ओवी, अभंग, अष्टाक्षरी ई. छंदांमध्ये नियम गणवृत्तांप्रमाणे जाचक नाहीत, आणि कवीच्या व्यक्ततेला मोकळेपणा त्यात मिळतो. कवींनी अशा छंदांमध्ये तरी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वृत्तामध्ये लिहिलेली कविता ह्यामध्ये स्वाभाविक 'बद्धता' येतेच. त्यामुळे वृत्तबद्ध लिहिण्यासाठी शब्दसंपदा अधिक हवी हे बऱ्याच अंशी बरोबर आहे. परंतु वृत्तात लिहीत असताना सहज येणारे शब्द सोडून जर जड, क्लिष्ट, अपरिचित शब्द वापरले तर ते रसभंगाला कारण होऊ शकते, हा स्वानुभव देखील आहे. वृत्तात सहज लिहिण्यासाठी केवळ सराव आवश्यक नाही तर आपण त्या कवितेवर खूप काम करणे आवश्यक आहे, खूप विचार करणे, कविता सुचून गेल्यावरही खूप काळ त्यामध्ये आवश्यक ते बदल करत जाणे, वारंवार ती कविता वाचून त्यात सुधारणा करत राहणे, हे सारे खूप आवश्यक आहे. पण आजकाल आपल्याकडे तेवढा वेळ, तेवढा संयम राहिलेला नाही. त्यामुळे जशी आहे तशी कविता पोस्ट करून मोकळे व्हायचे हि वृत्ती बळावलेली आहे. कवींनी कविता प्रसिद्ध करण्याच्या मोहापासून स्वतः:ला वाचवले पाहिजे, हे अत्यंत आवश्यक होत चालले आहे.

ह्या प्रक्रियेवर उत्स्फूर्तता गमावण्याचा आरोप स्वाभाविकपणे केला जातो. जो काही अंशी जरी मान्य केला, तरीही उत्स्फूर्तता हि केवळ कविलाच ठाऊक असते. ज्या कवितेत उत्कृष्ट आशय असतो, शब्दरचना आकर्षक असते, आणि मांडणी देखील उत्तम असते ती कविता रसिकांना अधिक भावते, अधिक काळ लक्षात राहते. मग त्यामध्ये उत्स्फूर्तता होती कि नव्हती हा मुद्दा रसिकांच्या, वाचकांच्या दृष्टीने संपूर्णतः गौण असतो. जोपर्यंत मूळ सुचलेल्या कवितेतील आशयाशी तुम्ही तडजोड करीत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कवितेत करोडो बदल केले तरी त्यातील उत्स्फूर्तता काकणभर देखील कमी होत नाही. उलट काही वेळा विचार करता करता कवितेच्या आकृतिबंधाबरोबरच आशय देखील समृद्ध होऊ शकतो. हे सर्व अकृत्रिमपणे कसे घडवून आणायचे हि देखील कवीची प्रतिभाच आहे. केवळ कविता सुचणे हीच नव्हे तर कविता संस्कारित सालंकृत करणे हा देखील प्रतिभाविष्काराचाच भाग आहे.

लिहिता लिहिता खूपच प्रदीर्घ लिहीत गेलो. सहज सुचेल तसे लिहिले आहे. हि माझी मते मांडली आहेत, पण ह्यावर देखील पुनर्विचार करणे आवश्यक असेल हे निश्चित!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...