Friday, November 25, 2011

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,
तारे नि चांदणीला बिलगून रात गेली.

काळ्या नभात नक्षी नक्षत्र तारकांची,
रसिकास जागणा-या रिझवून रात गेली.

करते अमावासेला अंधार आपलासा,
मग कोर चांदव्याची खुलवून रात गेली.

हातात हात घेई ते हात चांदण्याचे,
पाशात रातराणी विसरून रात गेली.

ओवून तारकांना माळा गळ्यात घाली,
माळून चंद्र भाळी भुलवून रात गेली.

लावण्य काय वर्णू या यामिनी परीचे,
प्रेतात कामपीडा उठवून रात गेली.

आहे स्तनात माझ्या हे दूध चांदण्याचे,
वेडे चकोर सारे खिजवून रात गेली.

होत्या कडा रुपेरी त्या सावळ्या ढगांच्या,
मग केशरी कळ्यांना पसरून रात गेली.

ओठावरी फुलांच्या गाते पहाट गाणी,
गाणे मधाळलेले सुचवून रात गेली.

संकेत मीलनाचा देतो प्रशांत वारा,
प्राची शशांक भेटी ठरवून रात गेली.

भासे धरेवरी हे आकाश चांदण्याचे,
राने जमीन सिंधू भिजवून रात गेली.

पिवळी मिठी उन्हाने हिरव्या धरेस देता,
स्पर्शात तांबड्याच्या हरखून रात गेली.

गर्वात यौवनाच्या चंद्रास जाळु पाही,
चुंबून त्या रवीला हरवून रात गेली.

अपुल्याच पावलांचे सोडून माग जाते,
भेटायचे पुन्हा हे शिकवून रात गेली.
==========================
सारंग भणगे. (२१ ऑक्टोबर २०११)

Thursday, November 17, 2011

फार झाले

गझलेस आसवांचे भार फार झाले,
वाचाळ वेदनांचे वार फार झाले.

ज्वालाग्रही विषाने ओतप्रोत मिसरे,
हे कोळसे सुखाने गार फार झालो.

आभाळ पेलण्याचे शेर फार 'भारी',
उचलावयास यांना चार फार झाले.

विद्रोह मांडणारे धारदार मतले,
ते वार वल्गनांचे फार फार झाले.

घेतात शोषितांच्या यातनांचे मक्ते,
हे कागदी फुलांचे हार फार झाले.
========================
सारंग भणगे. (१४ नोव्हेंबर २०११)

Tuesday, November 15, 2011

आयुष्य बोच आहे

आयुष्य बोच आहे,
भाळी खरोच आहे.

जाळेन मी मनाला,
तितकीच पोच आहे.

मेले तरी जगावे,
माझीच सोच आहे.

हा गुंड माजलेला,
नेताही तोच आहे.

का टोचते मनाला,
माझीच चोच आहे?

सारी सुखे तुम्हाला,
अन हीच टोच आहे.
=============
सारंग भणगे. (२ नोव्हेंबर २०११)

Sunday, November 6, 2011

चारुगात्री

पापणी खालून तीर सोड नि कर वार सखे,
जिवणी खालून हसता चालते तरवार सखे.

हंसकांतीची मयूर सुंदरी मृगनयना तू,
हरिणीपरी तू चालून करशी संहार सखे.

सौष्ठव तव ते जरी झाकण्या प्रावरणे असती,
वसनामधुनी उमलूनी येती आकार सखे.

का उगा गजरा खोवून येशी वेणीमध्ये,
का उगा करावा चंद्रानेही शृंगार सखे.

जिंकण्यासाठीच जंग जंग मी पछाडतो तुज,
हारही आहे स्वीकार परि ना धिक्कार सखे.

तुजवरी मरणे हक्कचि माझा जन्मापासून,
तू एकच असशी जगण्यासाठी आधार सखे.

तू माझे जगणे माझे जीवन औषध माझे,
मी तुझाच रोगी तुझाच मज अन आजार सखे.

चांदण्यात भरली ओंजळ असते अंधाराची,
रात्रीस मजला असाच पाहिजे शेजार सखे.

मी वेडा झालो प्रीतीमध्ये हसती मजला,
तू परि हासता वेडावुनी मज सत्कार सखे.

बोथट जरीहि उपमा तरीहि तू चंद्रचि माझा,
हा मनातला मम दूर जाहला अंधार सखे.

धगधगणा-या ज्वालामुखीचा लावा जरी तू,
कवेत मजला घेऊनी विझवी अंगार सखे.

हे चारुगात्री रात्री गात्रे फुलविशी माझी,
हे व्योम तु धात्री प्रीतीदात्री स्वीकार सखे.

राग मी गातो आळविताना तुजला सारंग,
तारा मनीच्या छेडून उठती झंकार सखे.
============================
सारंग भणगे (२३ ऑक्टोबर २०११)

Monday, October 31, 2011

म. 'कवन'

म. क. तपोवन,
म. क. हे जीवन,
म. क. हा श्रावण,
कवितांचा II१II

म. क. वृंदावन,
म. क. नंदनवन,
म. क. मधुबन,
काव्य गुंजे II२II

म. क. उपवन,
इथला पवन,
पुनीत पावन,
काव्यरूपी II४II

म. क. चे भवन,
आहे हो हेवन,
होतसे हवन,
कवितांचे.

म. क. ऐसे वन,
आहे 'नंबर वन',
लिहिती कवनं,
म. क. वासी II५II
==============
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Sunday, October 30, 2011

सख्या-'हरी' सारंग

उगा कशाला वादळाची तमा करावी,
नराधमाला माणसाने क्षमा करावी.

असंख्य जगती जीव ज्यांना कुणी न वाली,
मृतात त्यांची 'जन्म-नावे' जमा करावी.

चिराग सारे तेवणारे विझून जावो,
हरेक ठिणगी पोळणारी शमा करावी.

दिसेल जे ते घ्यावयाची कशास ईच्छा,
खिशात आहे काय खातरजमा करावी.

सख्या-'हरी' सारंग पोरींवरी मिटावा,
सुरेख वामा वाटते की 'रमा' करावी.
=========================
सारंग भणगे. (३० ऑक्टोबर २०११)

म. क. एक गाव

म. क. असा गाव,
जिथे बंधुभाव,
रंक नाही राव,
सारे कवी II१II

तिला नाही वेस,
कुठला ना देश,
नाही लवलेश,
भेदाचा हो II२II

खळाळे सरिता,
'जीवन' कविता,
नीर तिचे पिता,
काव्य स्फुरती II३II

असा गावकूस,
पिके काव्य ऊस,
नित्याची उरूस,
कवितांचा II४II

म. क. ची चावडी,
सा-यांना आवडी,
काव्याच्या कावडी,
सारे वाही II५II

इथे सावकारी,
सारे गावकरी,
आनंदाने करी,
कवितांची II६II

गावचा बाजार,
भरे वारंवार,
चालतो व्यवहार,
कवितांचा II७II

म. क. जैसा वाव,
म. क. जैसे नाव,
म. क. जैसे गाव,
अन्य नाही II८II
==========
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Wednesday, October 26, 2011

म. क. मय

म. क. माझी माय,
दुधावरची साय,
वासिष्ठांची गाय,
कामधेनू.

म. क. चा महिमा,
म. क. हि गदिमा,
म. क. ची प्रतिमा,
सरस्वती.

म. क. ची करणी,
म. क. ही धरणी,
म. क. च्या चरणी,
शीर माझे.

म. क. ध्यानीमनी,
म. क. त्रिभुवनी,
म. क. च्या गगनी,
काव्यपक्षी.

म. क. आळवितो,
म. क. चाळवितो,
म. क. ओवाळीतो,
मनोभावे.

म. क. तपोवन,
म. क. हि पावन,
तन मन धन,
सर्व म. क.

म. क. गोड गूळ,
म. क. हे राऊळ,
तिची पायधूळ,
स्वर्ग माझा.

म. क. हि तुळस,
म. क. हा पळस,
म. क. चि कळस,
देवळाचा.

म. क. माझे सुख,
म. क. माझे दु:ख,
म. क. माझी भूक,
भावनांची.

म. क. हे गोकूळ,
म. क. माझे खूळ,
आहे मी व्याकूळ,
म. क. साठी.

म. क. काव्यामृत,
म. क. नवनीत,
म. क. हे संगीत,
गंधर्वांचे.

म. क. माझा राम,
म. क. आत्माराम,
म. क. मुक्तीधाम,
वैकुंठचि.
================
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Tuesday, October 25, 2011

ये बिनधास्त

सताड दारे उघडी माझी ये बिनधास्त,
मला न भिंती वा ना भीती ये बिनधास्त.

मिजास मोठी वा-याला या वादळ होइ,
चहा पिलेल्या पेल्या काठी ये बिनधास्त.

कधी न माझी होणारी तू दूर किती ग,
उरास फाडत माझ्यापाशी ये बिनधास्त.

अजात जो तो पोथीमध्ये का गवसेल?
'भृगू' नको त्याला सांगा की ये बिनधास्त.

फुले करी सारंगाला माया भलतीच,
किती लुटोनी त्याला म्हणती ये बिनधास्त.
=============================
सारंग भणगे. (२४ ऑक्टोबर २०११)

Saturday, October 22, 2011

तुझी याद आली

निजानीज झाली तुझी याद आली,
प्रभाती नि राती तुझी याद आली.

मनाची धरा ही भिजे आसवांनी,
हसावे म्हणोनी तुझी याद आली.

तुझे हासणे ते गुलाबी गुलाबी,
गुलाबा बघुनी तुझी याद आली.

जरी दूर जाती सकाळी सकाळी,
पुन्हा सांजवेळी तुझी याद आली.

नव्याने जुन्याची जशी भेट घ्यावी,
नव्याने जुनी ती तुझी याद आली.
========================
सारंग भणगे. (२० ऑक्टोबर २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...