Saturday, September 27, 2008

वीज म्हणाली निवडुंगा


वीज म्हणाली धरतीला,
निवडुंग तुझ्या मातीला।

निवडुंग म्हणाले गगनाला,
लोळ वीजेचा तव सदनाला।
=======================

फेडू पहातासे माझी वसने,
काटेरी हां निवडुंग निर्लज।
मासोळी ना मी मूढ़ धीवारा,
मी धगधगणारी अस्मानवीज।

निवडुंग हां तटस्थ योगी,
मरूभूमीचे ताप भोगी।
वीज मेनका नाचे तपभंगा,
निर्लेप निवडुंग विकार निरोगी।
=======================

किती कृपण हां निवडुंग बिचारा,
पाण्यास देई अंतरी सहारा।
चल घे फुलवून आले मी,
मेघांचा जलधर पिसारा।

मरूभू ही निर्जल जरीही,
जीवन माझे जरी काटेरी,
स्वयंभू अन् स्वयंपूर्ण मी,
जाळलोळ ना; मी जलधारी।
=======================

क्षणमात्र तळपते गगनगृही,
नाकाम माझी प्रकाशउर्मी.
देहात कोंडली दाहकता परी,

असमर्थ जाळण्या दुष्कर्मी।

जीवन झाले व्यर्थ फुकाचे,
आयुष्य नको हे निवडुन्गी।
तृप्त मी परी तृषार्त जीवा,
निर्वाह माझा निरुपयोगी।
=======================

आठवा ऋतू


अजून स्मरते प्राणसखे; बालपणीचे सर्ग जुने,
शोधत हुडकत श्वानअर्भक; चाळली सारी तृणपाने।

वर्षाऋतूचा अबोध अल्लड; कुतूहलाचा हर्षसोहळा,
पाऊलवाटी पाचूंचा; हिरवा चाफा खलु खुलला।

हासत खेळत अपुले सरले; सांद्र सरल शारद-शैशव,
नीटस वाटेवरती गाफिल; सजले यौवन वसंतवैभव।

पानावारती हिरावाईचे; नवल निरलस विलसत होते,
गंधमधुर पुष्पपल्लव; वाटेवर या तरळत होते।

ऋतू ऋजुता हेमंताची; लेऊन या रस्त्यावरती,
पुन:श्च फुलला बालतरु; ऋतूचक्राचे आरे फिरती।

दौडत आला शिशिर झरझर; झाडोझाडी पानझडी,
संध्याछाया स्वैर लांबल्या; एकटी रडती मुकी बाकडी।

चुरचुरतील हे पर्णसडे; कुरकुरतील जीर्णखोडे,
गाढ मिठीतून थंडीच्या; ग्रिष्माचे पदरव कोरडे।

नयनात साठली अवघी वाट; मनात वाचला जीवनपाठ,
सहा ऋतूतून उमलून आली; प्रीतकथेची जीवनवाट।

वाट पहातो वाटेवरती; जीथे सरले अवघे जीवन,
ऋतू सातवा आठवणीन्चा; आठवा ऋतू पुनर्मिलन.

Thursday, September 18, 2008

वैशाख वणवा.

संतप्त सूर्यलाटा;
कोळपले आवार,
कोरड्या नदाचे;
कोरडे थरार।

वृक्षेपण विरली;
वीराट वाळवन्ट,
वैशाख जाळतो;
शुष्क आसमंत।

देहात अग्निदाह;
पेटली वसुंधरा,
अगडोंब उसळले;
वितळला पारा।

अग्निवर्षा कोसळे;
अग्निप्रलय लोटला,
दिठीच्या मिठीत;
पूर्वरंग पेटला।

उन्हाचे प्रासाद;
शयनगृही अंगार,
माध्यान्हीच्या शय्येवरती;
निखा-यांचे श्रृंगार।

भाजली सृष्टी;
संताप ब्रम्हांडी,
सावधान मर्त्या;
कलिकाळाची नांदी

सर्वांग चांदणे

मी चकोर पिसा;
चांदण्यात चिंब,
तू गोड माधुरी;
मधाचा थेंब।


हां देह तुझा;
चंद्ररश्मी रूपी,
हां स्नेह तुझा;
अमृताची धुंद कुपी।

तू प्रेम लोटले;
अशरीर संजीवन,
जणू पीयूष गोठले;
चिन्मय चिद्घन।


तुझी साथ वैभवी;
मोतीयांचे संभार,
तू भावभैरवी;
मालकंस गंधार।


तू शीतल शालीन;
गर्भरेशमी शाल,
यामिनीचे प्रावरण;
चंदेरी विशाल।


हां निळा आसमंत;
नव्हे; माझा कंठ,
तू सर्वांग चांदणे;
तृप्त आकंठ.

सारेच मनासारखे घडेना

एकाच टक्क्याने का चुकावा; बोर्डातला नंबर,
सा-या स्पर्धा जिंकून दुखावी; फ़ायनलला कंबर।

नेहेमीच असते सुंदर कन्या; दुस-याची मैत्रीण,
आवडत्याच विषयाचा निघतो; पेपर नेहेमी कठीण।

नेमकी येते औफीसच्याच वेळी; पावसाची मोठी सर,
शुभकार्यास निघता येते; आडवे काळे मांजर।

इस्त्रीवाला गायब होतो; इन्टरव्ह्यूच्याच दिवशी,
कायमच राहतो नाटकात आम्ही; कलाकार हौशी।

कर्ज घेता त्वरीत चढावा; व्याजाचा टक्का,
पल्याडची संधी येता; रिजेक्ट व्हिजाचा शिक्का।

घाटातच फुटावे नेमके रात्री; गाडीचे टायर,
कागद-कलम नसता होई; जागा आमच्यातला शायर।

यादी आहे अशी बरीच; मोठी लांब लांब,
आवळून बांधली आहे; जीवनाची काचणारी कांब।

कुणास ठाउक काय आहे; नियतीशी आमचा करार,
सारेच मनासारखे घडेना परी; हाच जगण्यातला थरार।

Wednesday, September 17, 2008

माझे सर्वस्व तू.

नक्षत्रात होतीस तू; मी तुझ्या वक्षात गं,
पौर्णीमेचा चंद्र माझ्या ओंजळीत साक्षात गं।

निरागस बालकाच्या होतीस तू हास्यात गं,
सर्वस्व माझे ओतले मी तुझ्या दास्यात गं।

निर्झराच्या होतीस तू झुळझुळ पाण्यात गं,
मधुमग्न भामराच्या रुणझुण गाण्यात गं।

गानधुंद गायकाच्या होतीस तू सुरात गं,
पुष्पकोशी दाटलेल्या मकरंदी पुरात गं।

प्रजापतीचा होतीस तू पहिलाच हुंकार गं,
सृजनाचे आद्य अक्षर तू अनाहत ओंकार गं.

Tuesday, September 16, 2008

शयनस्वामिनीची कैफियत.

किती निर्मिल्यास मला तू रे सवता,
रोज रात्रीस असती तुझ्यासंगे कविता।

तू तीला आळवितो; मी तुला रे अभागी,
तू तीच्यास्तव जागा; मी तुझ्यावीण जागी।

शयनमंदिरात गाई आरती आर्ततेची,
रीझवी आसवांना स्वप्ने पूर्ततेची।

तू भाव-शब्द-लेणे कोरण्यात दंग,
हे लावण्य-लेणे भोगण्यात भंग।

शयनमंदिराचे दैवत जर हरपले,
मला पोळूनी मग; काव्य तव करपले।

तुझी जीव-कविता झुरते इथे मी,
तिथे काव्य जन्मे; मरते इथे मी।

तू तोय अन् मी; तुझी भावसरिता,
तू शब्द माझा; तुझी रे मीच कविता,
तुझी रे मीच कविता।

"घोट चांदण्याचा"

चांदण्याचा घोट घेता
ह्रुदयात उमटली चांदणी,
डोळ्यात माझ्या चन्द्र
अन् ओठात मधुर गाणी।

अनंत चांदण्या गगनी
अबोल हळवी प्रीती,
चांदणे पिण्यास आतुर
चातक-चकोर रिती।

नियतीची रम्य मृगया
बाणात घेतला ठाव,
शरपंजरी सुखाच्या
रोमारोमात घाव।

प्रीतमंदिराचा कळस
संतुष्ट; पाय-या तृप्त,
चांदण्यास आळवितो
यामिनीचा भक्त।

चांदणे पिउन झालो,
शरद रुतू मी,
चकोराचे अंतरंग
दररोज जीतो मी।

रक्तवर्णी सूर्य
आरक्त कपोल,
रात्रीच्या ओठात
चांदण्याचे बोल।

तरुतनुवर यौवन
गुलमोहर बहरला,
फांद्यावर पाखरांनी
संसार नवा पसरला।

आता उरले काही
चकोराचे मागणे,
आकंठ तृप्त पिउनी
कैवल्याचे चांदणे.

Monday, September 15, 2008

अंतर-मंथन

अंतरातल्या मंदिरातला देव अंतरी कोंडला।

तंग तो पतंग जो बंधतेशी जोडला।

आरसाचाच हां आसरा अंतरास असा विसरला।

दंशतेचा अंश आहे वंश नृशंस तो पसरला।

व्यथा झाली कथा ज्याची वृथा पारायणे।

अस्त ज्यांचा उध्वस्त ऐशी स्वस्त रामायणे।

हात ज्यांनी घात केला द्यूत त्यांनी मांडले।

हिरण्यवर्णी हरीणाने हरणडाव साधले।

काळजीने का जळे काजळले काळीज।

नाग ओके आग हृदयी धग त्याची वीज।

आतड्याने ताडले तेरड्याचे रंग,

मढे ज्यावर चढ़े त्या तिरडीचे अंग.

तुला जगायचय का?

तुला जगायचय का? तुला जगायचय का?
पाण्यावरच्या एक तरंगा,
तुला तगायचय का?

छोट्या छोट्या स्वप्नांसाठी
आधी झगडलो किती,
कितीही उंच उडलो तरीही
अखेर व्हायचे माती।

चमचमणारा तारा फुटता
तुला बघायचे का?
तुला जगायचय का? तुला जगायचय का?

आज हिरवेगार शेत ते
सुंदर किती हे दिसते,
पीक कापता की करपता
भकास उजाड़ ते होते।

क्षणात लपते इंद्रधनू जे
तुला बघायचे का?
तुला जगायचय का? तुला जगायचय का?

औटघडीचा खेळ अवघा
भातुकलीची भांडी,
आसक्तीचे दास सारे
पिंडी ते ब्रम्हांडी।

अळवावरच्या पाण्यासारखे
तुला वागायचय का?
तुला जगायचय का? तुला जगायचय का?

काव्यप्रपात

करावे काव्यप्रताप,

कोसळावे काव्यप्रपात,

भावनांचे काव्यसंताप,

व्हावी नूतन काव्यप्रभात।

भरवाव्या काव्यसभा,

फाकावी काव्यप्रभा,

नर्तनास काव्यरंभा,

तोषवावी काव्यप्रतिभा।

वर्षाव्या काव्यस्वाती,

उजळाव्या काव्यज्योती,

जुळावी काव्यनाती,

मोहवावी काव्यरती।

फुलावी काव्यफुले,

झुलवावे काव्यझुले,

कर्णोकर्णी काव्यडुले,

तरुलतांवर काव्यखुले।

करावा काव्यविहार,

गुंफावे काव्यहार,

लुटावी काव्यबहार,

ग्रहावा काव्याहार।

पूजावी काव्यपार्वती,

तोषावी काव्यभगवती,

आळवावी काव्यवेदवती,

विनवावी काव्यसरस्वती.

Sunday, September 14, 2008

सुप्रभात

प्रसवली घनतिमिर निशा,

उजळल्या बहुरंगात दिशा।

..................................................................

निलनभी रंग पेरुनी खुलली कोरीव नक्षी,

क्षितीजावरती पंख पसरुनी दूर उडाले पक्षी,

हिरण्यगर्भात उजळली उषा,

उजळल्या बहुरंगात दिशा।

..................................................................

काषायवसने लेऊनी आली प्राची क्षितीजावरी,

आरक्त कपोली लुब्ध विहग स्वार पंकजावारी,

स्तवनास हेमप्रभेची भाषा,

उजळल्या बहुरंगात दिशा।

..................................................................

Friday, September 12, 2008

देख; कबीरा रोया

अणुस्फ़ोटाचा मंथर डसला, बुद्ध कसनुसा हसला।

मराठीघाव अनुजावर पडला, अन् चाणक्य रडला।

अस्मितेचा वांड वारू सुटला, सहिष्णुतेचा घडा फुटला।

हाय कंबख्त! ये क्या बोया, देख; कबीरा रोया.

Thursday, September 11, 2008

प्रणय प्राणी


तुझा जागण्याचा हां नवा बाज आहे;

उलूक तू तसा घरंदाज आहे।


रे किती चावरा; तुज म्हणू काय श्वान,

रे किती सावरा तुझे आवेग नि भान।


नाग तू विषारी या संगात आहे,

तुला कर्दळीचा तसा नाद आहे।


मकरंद वेचणारा तू असतोस भृंग,

बाहुकोशी कळीच्या गंधात होय दंग।


तसा प्राणीच ना रे; प्रणयात दंगणारा,

प्राणात, प्रिय माझ्या, प्राजक्त हुंगणारा.

Wednesday, September 10, 2008

नको 'घोट वादळाचा'

वादळ बोलावून येत नाही,
अन् आल्यावर जात नाही।
येताना जे घेउन येतं,
ते जाताना देत नाही।

वादळ पहावीत फ़क्त चित्रात,
जगण्यात त्याचा सोस नको।
निष्कंटक, अभोगी जीवनाला,
मारण्याची भलती हौस नको।

चांदण्याचे वेध बरे,
वादळाचा घोट नको।
जीवनाच्या उंबरठ्यावर,
मरणाची अवचित भेट नको।

वादळ पिउन येतो वारा,
उध्वस्ततेचा खडा पहारा।
यौवनाच्या कोमल तनुवर,
घनदु:खाचा उठे शहारा।

झेलुनी घे अंगावरी,
सागराच्या उन्मुक्त लाटा।
कशास उगा धुन्डाळिसी,
वादळाच्या घनघोर वाटा।

वादळाचा घोट तुझा,
लोट तू माझ्यावरी।
अणुरेणुंचे सृजन तुला,
विस्फोट पण माझ्यावरी.

Sunday, September 7, 2008

पुन्हा एक 'घोट वादळाचा'

अव्यक्त प्राजक्त
कसा काय बंदी!
आरस्पानी अश्रु
कसे जायबंदी!


उगा ही निळाई
उभी का तिढ्यात
गत:प्राण भूमी
क्षितीजाच्या पुढ्यात।


बेईमान मित्र
पाखडतो आग
जळणा-या डोळा
बिथरते जाग।


झावळी पडावी
झाड़ कोसळावे
चैतन्याचे दैन्य
मढ्यात मिळावे।


हिणकस कणीस
बेजान दाणा
उगा उगण्याचा
नको नवा बहाणा।


आच चांदण्याची
चेतवू नको रे
अवसअधू विधूला
फितवू नको रे।


करू नको फुकाची
तडिते बतावणी
अलवार तुझी रेघ
कशी दीनवाणी।


कामातुर चन्द्र
आळवण्यात दंग
नाखवा बुडाला
सागरी अथांग।


दुभंग झोपडीत
डोळ्यात अश्रुपूर
पेटलेल्या दुपारी
पा-यातूनी धूर।


करी कोणता व्याध
दु:ख़ास जायबंदी
हां घोट वादळाचा
करणार काय बंदी?

Saturday, September 6, 2008

आठवणी भिजलेल्या

त्या आठवणी भिजलेल्या,
नदीच्या काठी रुजलेल्या
त्या आठवणी भिजलेल्या।

ओली राने; गाती गाने,
भिजली पाने; आयुष्याची।
क्षितीजावर स्वप्नात निजलेल्या।
त्या आठवणी भिजलेल्या।

ओला वारा; या जलधारा,
गळतो सारा; आसमंत।
ओंजळीत ज्योती विझलेल्या।
त्या आठवणी भिजलेल्या।

पानोपानी; उदास गाणी,
हां विरहाग्नि; आठवणी त्या।
पिसात झडत्या सजलेल्या।
त्या आठवणी भिजलेल्या.

अतृप्त हाक

शिणलेल्या वाटेवर
रान विणलेले
पहाटेच्या ओठात
गुलाब कोंडलेले।

संन्यस्त देवळात
आर्त आरती
गाभा-यात जीवंत
मंद स्निग्ध ज्योती।

मंद समीर
मधुर वेळ
झाडांची पाने
खेळतात खेळ।

विझलेला वणवा
वणव्याची राख
आगीची भूक
अतृप्त हाक.

Wednesday, September 3, 2008

स्वामी-पूजन


उदबत्त्या आरत्या धूप; नेत्री पहावे स्वामीरूप.

दुग्ध दहि मधादि स्नान; मुखी असावे स्वामीगान।

कमळ केवडा कुसुमादिक; सदा कंठी स्वामीहाक।

चंदन कस्तुरी अष्टगंध; चित्ती स्मरावे स्वामीछंद।

सद्भावे घालू दंडवत; हृदयी व्हावे स्वामीमूर्त.

Tuesday, September 2, 2008

रुद्र-प्रपात

हां खवळला सागर,
की फुटले
रणरुद्र संगर?

या कोसळती लाटा,
की पिंजारल्या
शिवकेशजटा?

हे आदळती प्रपात,
की आसूड ओढ़ती
सहस्त्र तडिताघात?

हे फाटले आकाश,
की घुसळले दैत्यांनी
अवघे अवकाश?

या कडाडल्या विद्युल्लता,
की मोडियले
शिवधनु दशरथसूता?

हां अवतरला प्रलय,
की आमंत्रण हे अवचित
पहाण्या यमालय?

हे वादळी थैमान,
की पिसाटले
समस्त सागरी सैतान?

हे आरंभले क्षीरमंथन,
की योजीयले
सृष्टीचे मैथून?

हां कोपला वरुण,
की कोंदटले
चैतन्य चिद्घन?

या आदळती मेघधारा,
की परजली
आयुधे शिवशंकरा?
Related Posts Plugin for WordPress, Blogger...