Thursday, September 18, 2008

सारेच मनासारखे घडेना

एकाच टक्क्याने का चुकावा; बोर्डातला नंबर,
सा-या स्पर्धा जिंकून दुखावी; फ़ायनलला कंबर।

नेहेमीच असते सुंदर कन्या; दुस-याची मैत्रीण,
आवडत्याच विषयाचा निघतो; पेपर नेहेमी कठीण।

नेमकी येते औफीसच्याच वेळी; पावसाची मोठी सर,
शुभकार्यास निघता येते; आडवे काळे मांजर।

इस्त्रीवाला गायब होतो; इन्टरव्ह्यूच्याच दिवशी,
कायमच राहतो नाटकात आम्ही; कलाकार हौशी।

कर्ज घेता त्वरीत चढावा; व्याजाचा टक्का,
पल्याडची संधी येता; रिजेक्ट व्हिजाचा शिक्का।

घाटातच फुटावे नेमके रात्री; गाडीचे टायर,
कागद-कलम नसता होई; जागा आमच्यातला शायर।

यादी आहे अशी बरीच; मोठी लांब लांब,
आवळून बांधली आहे; जीवनाची काचणारी कांब।

कुणास ठाउक काय आहे; नियतीशी आमचा करार,
सारेच मनासारखे घडेना परी; हाच जगण्यातला थरार।

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...