Sunday, September 7, 2008

पुन्हा एक 'घोट वादळाचा'

अव्यक्त प्राजक्त
कसा काय बंदी!
आरस्पानी अश्रु
कसे जायबंदी!


उगा ही निळाई
उभी का तिढ्यात
गत:प्राण भूमी
क्षितीजाच्या पुढ्यात।


बेईमान मित्र
पाखडतो आग
जळणा-या डोळा
बिथरते जाग।


झावळी पडावी
झाड़ कोसळावे
चैतन्याचे दैन्य
मढ्यात मिळावे।


हिणकस कणीस
बेजान दाणा
उगा उगण्याचा
नको नवा बहाणा।


आच चांदण्याची
चेतवू नको रे
अवसअधू विधूला
फितवू नको रे।


करू नको फुकाची
तडिते बतावणी
अलवार तुझी रेघ
कशी दीनवाणी।


कामातुर चन्द्र
आळवण्यात दंग
नाखवा बुडाला
सागरी अथांग।


दुभंग झोपडीत
डोळ्यात अश्रुपूर
पेटलेल्या दुपारी
पा-यातूनी धूर।


करी कोणता व्याध
दु:ख़ास जायबंदी
हां घोट वादळाचा
करणार काय बंदी?

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...