Saturday, September 27, 2008

आठवा ऋतू


अजून स्मरते प्राणसखे; बालपणीचे सर्ग जुने,
शोधत हुडकत श्वानअर्भक; चाळली सारी तृणपाने।

वर्षाऋतूचा अबोध अल्लड; कुतूहलाचा हर्षसोहळा,
पाऊलवाटी पाचूंचा; हिरवा चाफा खलु खुलला।

हासत खेळत अपुले सरले; सांद्र सरल शारद-शैशव,
नीटस वाटेवरती गाफिल; सजले यौवन वसंतवैभव।

पानावारती हिरावाईचे; नवल निरलस विलसत होते,
गंधमधुर पुष्पपल्लव; वाटेवर या तरळत होते।

ऋतू ऋजुता हेमंताची; लेऊन या रस्त्यावरती,
पुन:श्च फुलला बालतरु; ऋतूचक्राचे आरे फिरती।

दौडत आला शिशिर झरझर; झाडोझाडी पानझडी,
संध्याछाया स्वैर लांबल्या; एकटी रडती मुकी बाकडी।

चुरचुरतील हे पर्णसडे; कुरकुरतील जीर्णखोडे,
गाढ मिठीतून थंडीच्या; ग्रिष्माचे पदरव कोरडे।

नयनात साठली अवघी वाट; मनात वाचला जीवनपाठ,
सहा ऋतूतून उमलून आली; प्रीतकथेची जीवनवाट।

वाट पहातो वाटेवरती; जीथे सरले अवघे जीवन,
ऋतू सातवा आठवणीन्चा; आठवा ऋतू पुनर्मिलन.

1 comment:

Club said...

Bravo. Nice Blog.
Beautiful pictures.

Please visit my blog

http://bali-universe.blogspot.com

good luck

Related Posts Plugin for WordPress, Blogger...