Wednesday, September 10, 2008

नको 'घोट वादळाचा'

वादळ बोलावून येत नाही,
अन् आल्यावर जात नाही।
येताना जे घेउन येतं,
ते जाताना देत नाही।

वादळ पहावीत फ़क्त चित्रात,
जगण्यात त्याचा सोस नको।
निष्कंटक, अभोगी जीवनाला,
मारण्याची भलती हौस नको।

चांदण्याचे वेध बरे,
वादळाचा घोट नको।
जीवनाच्या उंबरठ्यावर,
मरणाची अवचित भेट नको।

वादळ पिउन येतो वारा,
उध्वस्ततेचा खडा पहारा।
यौवनाच्या कोमल तनुवर,
घनदु:खाचा उठे शहारा।

झेलुनी घे अंगावरी,
सागराच्या उन्मुक्त लाटा।
कशास उगा धुन्डाळिसी,
वादळाच्या घनघोर वाटा।

वादळाचा घोट तुझा,
लोट तू माझ्यावरी।
अणुरेणुंचे सृजन तुला,
विस्फोट पण माझ्यावरी.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...