Thursday, September 18, 2008

सर्वांग चांदणे

मी चकोर पिसा;
चांदण्यात चिंब,
तू गोड माधुरी;
मधाचा थेंब।


हां देह तुझा;
चंद्ररश्मी रूपी,
हां स्नेह तुझा;
अमृताची धुंद कुपी।

तू प्रेम लोटले;
अशरीर संजीवन,
जणू पीयूष गोठले;
चिन्मय चिद्घन।


तुझी साथ वैभवी;
मोतीयांचे संभार,
तू भावभैरवी;
मालकंस गंधार।


तू शीतल शालीन;
गर्भरेशमी शाल,
यामिनीचे प्रावरण;
चंदेरी विशाल।


हां निळा आसमंत;
नव्हे; माझा कंठ,
तू सर्वांग चांदणे;
तृप्त आकंठ.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...