Wednesday, October 1, 2008

आजची अंगाई

आई आपल्या तान्हुल्यावर नेहेमीच प्रेम करते. जुन्या काळी आणी आजही. पण आज 'निंबोणीच्या झाडाखाली.....' ला किती अर्थ राहिला? गोठाच माहीत नाही; मग पाडस कुठून माहीत असणार.
मग काय आजच्या आईने अंगाई गाउच नये काय? कदाचीत ती अशी गाईल का "आजची अंगाई"।

----------------------------------------------------------------------------------------------
निज निज माझ्या बाळा,

रात्रपाळीचा प्रहर झाला।

उद्या सकाळी पुन्हा धावपळ,
सवडीचा ना मिळे एक पळ,
अधुरी निद्रा तुझी चाळता,
तुटतुटते रे काळिज तिळतिळ।

जरी समजते अपुरी सोबत;
कशी थांबवू पळत्या काळा।

पाळणगृही करीता पाठवण,
कितीदा येते तुझी आठवण,
जरी हरपले तुझे बालपण,
भवितव्याची असे साठवण।

संध्याकाळी तुला पाहता;
उरी दाटतो माय उमळा।

इतक्यातच येतील तात तुझे,
घेतील हाती हात तुझे,
विसरूनी भूक तहान शीण,
घेतील मुके गात तुझे।

डोळे भरूनी येते माझे;
पाहूनी पितृप्रेम जिव्हाळा.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...