Monday, October 27, 2008

शेवटच्या भेटी

कॉलेजच्या शेवटच्या वर्षी लिहीलेली कविता............

आता मोकळे नभ हे झाले दूर उडाले पक्षी,
घरटे सारे रीते जाहले; कुणी न उरले साथी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

किलबिल सारी शमली आता, खळखळणारी दमली सरिता.
हे विरहाचे गीत अनावर पोळून गेले ओठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

गेली पाखरे आपुल्या देशी, उजाड वाटा पडक्या वेशी.
सखे सोयरे व्याकुळ सारे तोडून गेले गाठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

तुटती तारे उजळे मंडल, रीक्त नभ हे वाटे पोकळ.
मनि कल्पता विरहवेदना तुटतुटते पोटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

कळिकाळाची नदी वाहिली, ॠतूचक्रेही फ़िरता पाहिली.
कळिफ़ुले ही सुकली आता, गंध उरले पाठी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

येऊन गेले वादळ आणिक ठेऊन गेले चित्र भयानक.
उदास नयनि उगा होतसे अश्रूंची दाटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

सुताविनाही फ़िरतील चरखे; स्वकीय सारे बनतील परके.
नवीन पालवी फ़ुटेल तरीही; भरतील पुन्हा न घरटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

काऊचिऊचा खेळचि न्यारा; पाणी शिंपूनि घालती वारा.
पुसून अक्षरे गेली सारी; कोरीच उरली पाटी,
शेवटच्या भेटी; या शेवटच्या भेटी.......

=============================================
सारंग भणगे. (1998)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...