एका भूमीमध्ये पेरली मी स्वप्नांची बीजे,
परी प्रयत्नेवीण एकही बीज नाही रूजे.
या स्वप्नांच्या पूर्तीसाठी कष्ट सर्व उपसले,
दैवा हाती सारे आता मम नेत्र नभी भिडले.
पांढरे ढग आकाशी सारे नेकही काळा मेघ,
बुजेल कशी मग भूमीमधली ही उजाड भेग.
पण आता मज थांबणे हे असंभव वाटतसे,
दैवाकडे जाईन मी उमटवीत पावलांचे ठसे.
म्हणेन "मम पाठीवरती द्या मेघांचे हे ओझे,
अवजड जरी हे वाहत नेईन अंतापर्यंत सहजे".
दैवही माझी परीक्षा घेऊ पाहतसे कठोर,
परी ठावा नसे त्यासी मम मनिचा जोर.
स्वस्वप्नांच्या पूर्तीखातर मी एवढेही न करीन का?
अवजड मेघ घेऊन पाठी मी पुरे न धावीन का?
हा विश्वास सार्थ करीत धावलो कधी न थंबलो मी,
एक ही मेघाचा अंशही न सांडीता आलो मी.
आता या मेघा बरसवीन मम स्वप्नबीजांवर,
एक स्वप्न आणिक पेरीन फ़ुटेल सर्वा अंकुर.
आता हे मेघही झाले बरसण्या आतुर,
ओझे हे जड झाले आता मम पाठीवर.
अन् पहा ते कसे बरसले पूर्ण भरुनी जल,
जसे बाळा पाहताच वाहे आईचे अंचळ.
धन्य झाली ती भूमी बीजे ती धन्यही,
धन्य माझे प्रयत्न अन् धन्य ते मेघही.
हळूच पहा डोकावतसे भूमीमधून अंकुर,
आता स्वप्नपूर्तीचा मंगल दिन नसे तो दूर.
वाजतो माझ्या मनि मृदंग वाजंत्री चौघडा,
शांती सुखाने भरला माझ्या मनाचा हा घडा.
=============================================
सारंग भणगे. (1997)
No comments:
Post a Comment