Tuesday, December 9, 2008

भक्त एकादशी



जीवनरोग जरा व्याधी । अहं वासना त्यासी बाधी ॥
म्हणोन संजीवन समाधी। ज्ञानदेवे घेतली ॥१॥

तरी भक्तीचा सोहळा । अखंडित वाहे विमळा ॥
भेटती भक्तीच्या ओहोळा । ओहोळ अनेक ॥२॥

भक्तीसूर्य प्रकटला । व्योमी प्रकाश दाटला ॥
चिन्मय चिद्घन कोंदटला । दिठीच्या कठी ॥३॥

भक्तीरस लागे वाहू । आळंदिहूनि निघे पाहू ॥
ग्राम नामे देहू । प्रकटला तुका ॥४॥

तुक्या झाला भणंग । भक्तीत जाहला दंग ॥
विठ्ठल नाम तरंग । मनात उठती ॥५॥

संसार जाहला व्यर्थ । मोह तुटला स्वार्थ ॥
उरला केवळ परमार्थ । उपकारापुरता ॥६॥

अमृताचा यावा वीट । पांडुरंग ऐसा अवीट ॥
विठ्ठलाचे पायी वीट । तुका जाहला ॥७॥

तुटले सारे मोह पाश । देह झाला अवकाश ॥
मृत्यु येणे अवकाश । विधिलिखित सारे ॥८॥

अता विठ्ठला राहवेना । तुका दूर पाहवेना ॥
वियोग कसा साहवेना । कैवल्यधामी ॥९॥

वैकुंठदूत धाडिले । यमनियम मोडिले ॥
भक्त ह्रुदयी भिडले । अद्वैत प्राप्ती ॥१०॥

वैकुंठी पोचली काया । भक्त विठ्ठलाचे पाया ॥
ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झाला कळस ॥११॥
==================================
सारंग भणगे. ( 9 डिसेंबर 2008)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...