Thursday, December 18, 2008

निसर्गवैभव.

आज फ़ुटावे अस्मानाला पंख त्याने उडून जावे,
घेऊन हाती हात ढगाचा क्षितीजानेही झुलुन घ्यावे.

गोड फ़ुटावे धरतीलाही सुर सुगंधित गाण्याचे,
सागर लाटी कान देऊनी गान ऐकतो पाण्याचे.

पानावरती दंवबिंदुंनी पहाटकाळी उगा निजावे,
पिउन सारी मेघममता धरतीनेही चिंब भिजावे.

उंच कड्याच्या ओठांमधुनी निर्झरबालक खेळावे,
तरूणाईच्या परसामध्ये फ़ुलाफ़ुलांचे मेळावे.

तृणांवरती नाचतनाचत समीरालाही झुलवावे,
इंद्रधनुचे दान देऊनि आकाशाला खुलवावे.

घट्ट ओल्या मातीमध्ये मुळामधूनी पसरावे,
किरणांसंगे खेळत असता सूर्यालाही विसरावे.

हिरवाईच्या लतामंडपी तुळसमंजि-या हलती-डुलती,
पर्णसड्यातुन गंधमाधवी मोहवती मधुमालती.

शांत वनावर फ़ुंकर घाली वारा अवखळ निलाजरा,
काट्यावरती गुलाब फ़ुलला अतीव बुजरा नि लाजरा.
(कातरवेळी वाटेवरती रंग पिसारा खुले साजरा)

डोंगर भासे निळेनिळे नि पहाड काळे कभिन्न,
पलाश पिंपळ पळस अवघे दुरुन भासती अभिन्न.

पहात राहतो निसर्गवैभव डोळे भरुनि मोदभरे,
काव्यामधुनी गाणे गातो ऐका जन हो नादभरे.
=======================================
सारंग भणगे. (7 डिसेंबर 2008)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...