उनाड हसतो खुल्या अभाळी
गंधित गातो सोनसकाळी
पानावरती दंवबिंदूंनी
नाचनाचतो प्रभातकाळी.
भिरभिरतो मी कळीपाकळी
शिरशिरतो अन् मऊ लव्हाळी
झरझर पाणी निर्झरगाणी
हुंदडतो अन् अरण्यजाळी.
पावसात मी ढगात राहतो
चिंब धरती दुरून पाहतो
हिवाळ्यातल्या थंडीमध्ये
धुक्यामधूनी मी वाहतो.
ऊन्हाळ्याची सोनझळाळी
ऊन सावली आळिपाळी
किरणांचे ते पोत भरजरी
संध्या येते रम्य सावळी.
ऋतूरंगाची सुरेख नक्षी
निसर्गवैभव माझ्या वक्षी
विहंगम अवघ्या सृष्ठीमध्ये
स्वच्छंद गातो मुक्तपक्षी.
=============================
सारंग भणगे. (ऑक्टोबर 2008)
No comments:
Post a Comment