एक जवळची व्यक्ती करिअर साठी दूर जात असताना लिहिलेले काव्य.....
अंतर जरीही अनंत असले, अंतरी परी नसावे अंतर,
अभंग असतील अपुली नाती, मणि असावे प्रेम निरंतर।
जा झेपावूनी निळ्या आभाळी, कवळूनी घे तारांगण अवघे,
परी ये परतूनी या धरती वरती, साद घालता धावत वेगे।
खुणावती उत्तुंग शिखरे, विराट सागर अथांग क्षितीजे,
उरात असता अभेद्य आशा, अजिंक्य गगन भासेल खुजे।
बंधपाश जरी खेचतील तुजला, फ़िरून पाहू नकोस मागे,
खचशील परी पतंगापरी, तोडशील जर मागील धागे।
अखंड यत्ने जिंकून घे, आकाश अवघे असीम अवनी,
झेपेल इतकीच घे झेप, नको, घास मोठा छोट्या वदनी।
विसावयाचे विसरु नको, परी विश्रान्तीसी विराम हवा,
जिंकशील तीही लोक जरी, मनी अविरत श्रीराम हवा।
हां उपदेश नको मानूस बंधू, प्रेमाचे हे आलिंगन आहे,
शब्दात कितीही गुंफले तरी, अजून खासे अबोलच आहे।
No comments:
Post a Comment