Sunday, July 6, 2008

ते दिवस.......... असे नसतील

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

असेल अवघे आकाश पेललेले....आज हे ओझे न पेलणा-या हातांनी,

असतील तारका मुठीत त्यांच्या, आजच्या रिकाम्या ओंजळीत,

असेल जिद्द आयुष्य उभे करण्याची, आज आयुष्यात उभे न राहू शकणा-यांच्यात,

असतील धुंद स्वप्न तेव्हा, आजच्या डोळ्यांच्या खाचात।

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

न्यायासाठी हात पसरायला लागणारे, अन् पसरलेले हात नसतील पडलेले भिजत घोंगड्यासारखे,

नसतील आजच्यासारख्या मिरवणूका, पण असतील भक्तीने कार्यात गुंतलेले जीव।

नसतील पुतळे त्यांचे, पण असतील त्यांच्या प्रतीमा हरेक ह्रुदयात।

नसतील वेदनेचे हुंकार, पण असतील प्रसन्नतेचे ओंकार।

नसतील नासलेले श्रृंगार, पण असतील ओथंबलेले प्रेम असीम।

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील,

भिंतींवर मृत प्राण्यांचे कातडे पसरून, शौर्याची केविलवाणी ग्वाही देणारे,

पण असतील मनुष्यातल्या पशुत्वावर, देवत्वाने मात केल्याचे।

वेदांचे भाट गात असतील, मुक्तीच्या रुचा,

अन् कवींना स्फुरत असतील, मंगल उषेच्या भूपाळ्या।

स्वप्नांचा झाला असेल अंत, एका स्वप्नपूर्तीच्या आरंभामुळे.......

ते दिवस....

ते दिवस.......... असे नसतील.......

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...