आज अवचित का हे अश्रु, अश्राप या धारा।
सुन्न विमनस्क वाहे, आर्त अनाथ वारा।
दाटले गर्द मेघ, घालमेल आभाळात।
हंबरडा विझतो, चितेच्या मूक ज्वाळात।
ममताळू मातेच्या, मायेची मंद ज्योत्स्ना।
ती दाट साय नवनीत, की संजीवनी जीवना।
चोचीत घेउनी चारा, भरविते चिऊ पिलास।
की अंचळास जाउन लुचते, आवेगे निर्व्याज पाडस।
उरात गडद होती, स्मृतिचित्रे मातेची।
मर्त्यास अखेर कूस, अक्षर या पृथेची।
लढण्यास सज्ज आहे, अखेरचे हे युद्ध।
हरण्यास साक्ष आहे, अजिंक्य हे प्रारब्ध।
गिळंकृत आजच झालो, फसले विचारचक्र।
शापित आयुष्यावरती, दाटले मृत्यूचे अभ्र।
इतक्यात हलला पडदा, काळीज थरकले।
निष्प्राण शंखात कुणी, जणू संगर फुंकले।
उचंबळल्या लाटा हृदयी, नेत्रात घळघळा पाणी।
कंपित झाले बाहू, अबोल झाली वाणी।
दिसताच करूण ती मूर्ती, आवेगात धरले चरण।
"ओळखलेस का मला", पुसले, "माते, मी कर्ण".
No comments:
Post a Comment