तुझ्याशिवाय जगायच?
अशक्य आहे।
हे अटळ मृत्यो!
तुझ्याशिवाय जगायच अशक्य आहे।
आज या पुरातन अश्वत्थ वृक्षाखाली,
उभा आहे मी;
पेलत भार; भाळातून वाहणा-या जखमेच्या वेदनांचा।
घेउन हातात प्राक्तनाचा भणंग कटोरा;
मृत्युमंदिरातल्या गाभा-यासमोर,
करीत यमदेवतेची आराधना।
हे अटळ मृत्यो;
तुझ्याशिवाय जगायचं? अशक्य आहे।
हे कृतका,
माझं आवाहन आहे तुला,
तुझ्या तळहाता एव्हढ माझं हे तडफ़डणार;
मृत्युच्या आशेत फ़डफ़डणार प्राणपाखरू
तुझ्या तळव्याखाली ठेचून टाक।
घे या प्राणविहगाचा ठाव; कायमसाठी।
वापर तुझी अमोघ शस्त्र,
अन् होऊ देत माझा अश्लाघ्य अंत।
तुझ्या कराल कवेत विसावण्यासाठी,
अधीर आहे माझा व्याकुळ जीव।
माझ्या या जीवनाच्या गावाला
फक्त एकच वेस आहे; जन्माची
आणी मग आहे
उंचच उंच तटबंदी;
आयुष्याच्या अंतहीन अमर्याद सीमांची।
लुब्ध करणा-या देखण्या नक्षत्रांनाही
लुप्त देण्याच वरदान आहे;
अन् लुकलुकणा-या तारकांनाही
निखळून तुटण्याच सौभाग्य आहे।
थकलोय मी आता घेउन;
भाळावरती भळभळणार हे प्राक्तन।
झाल्या आहेत यातना माझ्या असीम
या अनंत खिन्न अवकाशासारख्या।
हे आयुष्याचं लक्तर
मृत्युच्या चव्हाट्यावर फ़ेकण्यासाठी,
अवघं आयुष्य आसुसलयं।
मृत्युच्या कठोर आणी सर्वथैव अटळ
यमनियमाला सिद्ध करण्यासाठी म्हणून
माझ्या आयुष्याचा अपवाद का केलास।
उद्दामा, मृत्युघंटानाद करण्याऐवजी
नकारघंटाच वाजवतोस?
चल, माझं आहे तुला आव्हान;
अजिंक्या, आज तुला पराभूत व्हाव लागेल,
तुझ्याशी लढण्याच बळ नसलेल्या
या अश्वत्थाम्याच्या दुर्भाग्यापुढे।
हे धनञ्जयसूता,
असूया वाटते तुझ्याविषयी।
माझ्या पित्यान रचलेल्या मृत्युच्या चक्रव्युव्हात;
तुला जीवनापासून मुक्तता मिळाली;
यमदूताच्या कुशीत अलगद विसावयाची।
पण महापित्यान रचलेल्या जीवनाच्याया अभेद्य अच्छेद्य चक्रव्यूव्हात
मी अडकलोय,सतत मुक्ततेची आर्जव करत।
मरणोन्मुख असून,
अन् मृतवत जीवन जगून,
मरणाची कुठलीही आशा नसलेल्या
त्रिशंकु स्थितीत।
हे सर्वेश्वरा,
दिलीस तू कित्येक मर्त्यास
जीवन संजीवनी,
परंतु युगानुयुगे मृत्युमंदिराचे उंबरठे झिजवणा-या
या चिरंजीव अश्वत्थाम्यावर
कर उपकार, खोलून ते मृत्यूचे महाद्वार।
चिरंजीव असण्याची ही चिरंतन शिक्षा भोगणा-या मला,
मृत्युच्या शाश्वत सत्यापासून विलग ठेउ नकोस।
दे मला
त्या मृत्युदेवतेला पराभूत करणारा
महामृत्युंजय मंत्र,
या अविनाशी आयुष्याचा अंत साधण्यासाठी।
अन्यथा या लय पावणा-या सृष्टीत
प्रलयानंतर अवस्थित असतील
केवळ तीघेच.....
तू...
मी... अन्,
माझा अजिंक्य मृत्यु.
No comments:
Post a Comment