Tuesday, July 22, 2008

माझी प्रेमकहणी - एक लंबकाव्य

तुला पाहून माझ्या
मनात दाटले प्रेम
तुझे नी माझे
सारेच वाटले सेम।

ओळख व्हावी असं
सारखं वाटलं होतं
समोर येता जिभेवारच
पाणी मात्र आटत होतं।

आडोशामागुन मग
तुला मी बघायचो
भूमिगत प्रेमावीराच
जीवन मी जगायाचो।

तुझं हसण मोकळ
अन् मोहक चालण
आवाज तुझा मंजुळ
अन् मधुर बोलण।

तुझ्यापेक्षा तुला मीच
अधिक ओळखू लागलो
तव स्मृतींच्या पुष्पातला
मध चाखू लागलो।

दूरच्या टेकडीवर जेव्हा
वारा शीळ घाले
तुझ्या स्मृती देऊन
आतड्यास पीळ घाले।

स्वप्नांच्या क्षितीजावर
तूच तरळत असे
अन् श्वासांच्या संगात
तूच दरवळत असे।

आताशा स्वप्नांना मात्र
अर्थ आला होता
वाटल...आतापर्यंतचा काळ
व्यर्थ गेला होता।

स्वप्न नुसती पहावी किती
गेलो मी कन्टाळून
ठरवल....
टाकायच एकदा विचारून।

त्या दिवशी मी
आलो छान नटून
म्हटल एकदा
पहाव तरी भेटून।

तुला दुरून पाहता
गेलो मी बावरुन
जवळ यायच्या आत
स्वत:ला घेतल सावरून।

जवळ जशी येता तू
श्वास माझे दुणावले
अन् छातीमधले ठोके
माझे मलाच जाणवले।

उभा समोर राहता
गेलो पार गडबडून
अजाणता मग
काहीतरी बडबडून।

हसतच ओठात तू
हातात वही ठेवली
अन् हासत तुझ्या जाण्याने
सारी आग निवली।

पण आता पडला प्रश्न
काय मी बोललो?
भितीच्या पुंगीवर
कसा मी डोललो।

घाम पुसत मी
वही तुझी उघडली
अन् तुझ्या मनाची
घडी उलगडली।

शब्दकळ्या त्या पाहून
गाठ प्रेमाची सांधली
तू माझा 'सारंग'
मी तुझी 'गंधाली'।

अर्थ जसा कळला
भीती सारी पळाली
तुझ्या मनातली
नाती माझी कळाली।

मनोद्यानामध्ये
हास्यफुले उमलली
अन् हर्षाच्या आकाशी
इंद्रधनूषे उमटली।

आनंदाचे धबधबे
उसळून वाहिले
मानस सरोवर
हर्षलहरींनी व्यापिले।

निळ्या विभोर आकाशी
हर्षपक्षी उडाले
हर्ष - वायु संगे
प्रेमसंकेत धाडिले।

सूर्यकिरणातही
नकळत मार्दव आले
चन्द्ररश्मी भासूनी
मन चकोरेव झाले।

पुष्पसंचातील
झाल्या गंधित कालिका
अवसेला नभात होत्या
लुकलुकत तारका।

विश्व मोहर आला
आनंदाचा कहर झाला
मनाच्या बागेमध्ये
फुलांना बहर आला।

अलंकापुरी नटली हृदयी
लेउनी हर्षलंकार
मनाच्या मृदंगावरी
उमटले हर्षझंकार।

कल्पवृक्ष कल्पनेतला
आज सत्यात आला
गगन झाले ठेन्गणे
स्वर्ग वितात आला।

स्वप्नालाही सत्याचे
पंख मिळतात तर
कालसर्पाच्या दंती
अमृतडंख असतात तर।

आज हां 'सारंग'
गंधमय झाला
अन् गंधालीचा संग
सारंगमय झाला।

प्रेमाची ही मयसभा
मायाच केवळ ठरू नये
आत्माही प्रेममय व्हावा
कायाच केवळ वरु नये।

तीच्या ह्रुदयाताही
प्रेमफुल उमलले होते,
अन् गंधित त्या कळीवर
प्रेमदव उतरले होते।

अजाण म्हणून अव्यक्त
व्यक्त होता फुलल्या कळ्या
नकळतच दूर झाल्या
अजाण (न) वृक्षाच्या मुळ्या।

गंध नि रंगाचे हे
अपूर्व मिलन
नकळत उघडले
ह्रुदयाचे दालन।

आता तिची नजर
जराशी जड़ होती
अन् तिच्या कटाक्षात
माझी पड होती।

रात्री आता कठीण होत्या
दिवसाचीच प्रतीक्षा
खुळ्या स्वप्नातील राजकुमारी
भेटली होती वक्षा।

चन्द्ररश्मी शीतल तरीही
पोळू लागले मन
मार्तंड जरी तप्तही
भासू लागले तापहीन।

इन्द्रधनुच्या शरांनाही
मिळाली होती दिशा
शरपंजरी होतो मी
तरीही नजरेचीच भाषा।

नजरानजर होता
नजर ती चुकवित होती
नजर माझी मात्र
उत्तर किती विचारित होती।

शब्द तुझ्या ओठातले
मम ओठांनी वाचू का?
अन् गालांवरच्या मोहक
(ख)कळ्या मी वेचू का?

ओठांवरची लाली का
येई गालांच्या कुसुमी
आरक्त मुखचन्द्र देखत
मी म्हणतसे हसूनी

"शब्द मम ओठातले
तव अधरी रुळावे
चुंबनासही असे
अर्थ नवे मिळावे।"

जड़ पापणी उठे
आरक्त नेत्र दिसे
तिच्या ओठातूनी
माझे हास्य हसे।

तिच्या अधर खगांची
अधीर झाली फ़डफ़ड
अन् माझ्या ओठातील
बधीर केली बडबड

शांत सागारावारती
उठल्या अजस्त्र लाटा
मनाच्या पंखांनाही
फुटल्या सहस्त्र वाटा।

माझे ओठ तिच्या
ओठांनी चुंबित झाले
त्या अमीप सुखाने
स्वर्गही अचंबित झाले।

आता सुखाचे हे
असीम आकाश उलगडले
अन् तिने प्रेमपाशात
मला सावकाश पकडले।

पहिलाच तो रेशीमस्पर्श
हवाहवासा होता
हां साराच अनुभवही
नवानावासा होता।

होती त्या अनुभवासही
भावभवाची झालर
आत्म्यात अमुच्या
सत्यशिवाचे मंदिर।

असं आमच्या दोघांचं
दोघंचच प्रेम असतं
ते तुमचं आणी आमचं
कधीच सेम नसतं।

ऐका देउनी अवधान
या काव्याच्या अंती
तुम्हा रसिक सज्जनास
माझी कर जोडून विनंती।

मी सांगितली ही कहाणी
असं तीला सांगू नका
ती सांगू लागली तर
माहीत असल्याच दाखवू नका।

अन्यथा आमुची होइल
एक दर्दभरी कहाणी
भातुकलीच्या खेळातले होऊ
आम्ही राजा नि राणी.

1 comment:

Unknown said...

आज हां 'सारंग'
गंधमय झाला
अन् गंधालीचा संग
सारंगमय झाला।
गंध नि रंगाचे हे
अपूर्व मिलन
नकळत उघडले
ह्रुदयाचे दालन।
KHARACH CHHAN

Related Posts Plugin for WordPress, Blogger...