Tuesday, September 16, 2008

"घोट चांदण्याचा"

चांदण्याचा घोट घेता
ह्रुदयात उमटली चांदणी,
डोळ्यात माझ्या चन्द्र
अन् ओठात मधुर गाणी।

अनंत चांदण्या गगनी
अबोल हळवी प्रीती,
चांदणे पिण्यास आतुर
चातक-चकोर रिती।

नियतीची रम्य मृगया
बाणात घेतला ठाव,
शरपंजरी सुखाच्या
रोमारोमात घाव।

प्रीतमंदिराचा कळस
संतुष्ट; पाय-या तृप्त,
चांदण्यास आळवितो
यामिनीचा भक्त।

चांदणे पिउन झालो,
शरद रुतू मी,
चकोराचे अंतरंग
दररोज जीतो मी।

रक्तवर्णी सूर्य
आरक्त कपोल,
रात्रीच्या ओठात
चांदण्याचे बोल।

तरुतनुवर यौवन
गुलमोहर बहरला,
फांद्यावर पाखरांनी
संसार नवा पसरला।

आता उरले काही
चकोराचे मागणे,
आकंठ तृप्त पिउनी
कैवल्याचे चांदणे.

2 comments:

Harshada Vinaya said...

काय रे सारंग दादा...
किति घोट घेणार तू?
आमच्यासाठी बाकी ठेव.. [:-)]

कविता सुंदर.. आता मी तूझ्या कवितांविषयी बोलणंच सोडणार..
कारण त्या अप्रतीमच असणार अशी खात्री पटली माझी...

सारंग भणगे said...

तू माझं खुप कौतुक करते आहेस म्हणून सांगतो. एव्ढ़यात मला थोड़े असे वाटू लागले होते की मी ज़रा अतीच कविता करतो आहे सध्या. वाटू लागले आहे की अता थोड़े थांबावे. जे उत्तम जमेल तेच लिहावे. पण सुचते आहे तर मग का नाही लिहायचे अशी द्विधा मनस्थिती आहे.
त्यामुळे ठरविले जे उत्तम सुचेल तेच post करायचे.

बर काही कारणाने मी पुढचे काही दिवस, निदान १०-१२ तरी फोरम वर येणार नाही. त्यामुळे एव्ढ़यात लिहीलेल्या सर्व कविता भराभर post करीत आहे. तसेच इतर कविता फार वाचत नाहिये.

या फोरम वर मार्गस्थ उषेचा नामक एक प्राणी आहे. फार फार सुंदर कविता लिहीतो हां माणूस. त्याच्या काही जुन्या कविता वाचल्यास तर वेडी होशील.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...