Sunday, October 26, 2008

मनातील संध्याकाळ.



1) ती सांज

शांत एकांत हा, मंजुळ कोकिळ गान
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.

किलबिलती पाखरे जाती आपुल्या घरा
शांत निवते ही रखरखती वसुंधरा
दुरुनी कोठुनी, मंदिरामधुनी,
झंझंकारती झांज.
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.

दूर क्षितीजावरी तो भास्कर रेंगाळतो
शाम येतायेता दिन हळुच ढळतो.
दुरुनी कोठुनी, मंदिरामधुनी,
झंझंकारती झांज.
रम्य श्यामल धुंद द्रौपदीसमही सांज.
=================================
सारंग भणगे. (1989)

______________________________________________________
2) सायंकाळ सावळी

काल मी सावळी सायंकाळ पाहिली,
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.

मेघांच्या पापण्या ओढलेल्या,
किंचित होते उघडे डोळे.
अन् त्या नेत्रकडातून
बरसत होते रंग आगळे.

सांद्र नेत्र अन् होती पापणी ओली,
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.


क्षणभरच अचानक ते,
उठे पापणी उघडे डोळे,
मेघांच्या त्या गर्दीमधूनी
तरवारीसम वीज सळसळे.

शुभ्र प्रकाशे ही तीन्ही विश्वे नाहिली
डोळ्यात तिच्या होती, तांबूस लाली.

=================================
सारंग भणगे. (1995)

1 comment:

Anonymous said...

i like......

Related Posts Plugin for WordPress, Blogger...