Monday, March 16, 2009

काव्य - नियम

नियमांनाही एक असतो बर का नियम
अन् असतो अपवादाला ही एक नियम

यमालाही नाही चुकला तोच हा नियम
नियमाने जो येतो तो मृत्यु हा नियम

सक्तीचे असतात बरे सारे हे खरे नियम
मुक्तीलाही कसा बरे असतो एक नियम

नियमित असे काही नाही असाही नियम
नियमांच्या नियमनाला असतातच नियम

पाळण्याचे असतात सारे मोडलेले नियम
पाळण्यातल्या तान्हुल्याला कसले नियम

नियमांना असतात पुन्हा किती पोटनियम
पोटासाठी अखेर असती केव्हढेतरी नियम

नियमांच्या नियंत्याला आहे का हो नियम?
यदा यदा हि धर्मस्य हा का त्याचा नियम?

जगन्नियंत्या लखलाभ तुला तुझे सर्व नियम
नियमाला मूळात नसतो मुळीच काही नियम
===============================
सारंग भणगे. (9 मार्च 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...