फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड
तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...
अशी तारकांनी असूया
करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...
ढगांनी
झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्याशी झुरावे, अशी गोड
तू...
जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी
गोड तू
जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे,
अशी गोड तू...
तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या
मुलाने हसावे, अशी गोड तू...
सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी
श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...
यमाला कसा प्राण माझा
मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...
जणू
धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी
गोड तू...
तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी
तुकाराम व्हावे, अशी गोड तू...
असे मेघ काळे झपाटून जावे, तुला
पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...
कसे काय सांगू कसा
गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड
तू...
शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता
विस्मरावे, अशी गोड तू...
सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध
ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...
तुझे मूल्य जाणून
झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड
तू...
तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला
भुलावे, अशी गोड तू...
तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता
चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...
कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता
तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...
मला स्पर्श साधा, तुझा
भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड
तू...
कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म
संपून जावे, अशी गोड तू...
- निरज कुलकर्णी.
=================================================
तु या गझलेत कुणाला गोड म्हटला आहेस देव जाणे, कि तुच जाणे. पण या गझले एवढी गोड
कविता मी आजवर वाचलीच नाही. गझल वाचली आणि नुसता मोग-याचा घमघमाट सुटला बघ घरभर.
रात्री ११.३० ला माझ्या घरात मोग-याचा वास घेऊन बायको आली आणि म्हटली 'काय चालले
आहे?'. तुझे लग्न झाले असेल तर तु बायकोचा टोन, चेहरा हे सारे डोळ्यासमोर आणु
शकशील.
मी अरे उगाच शंका नको म्हणुन तातडीने तुझी गझल बायकोला वाचुन दाखवली.
वाटले तुझ्या गझलेनंतर ती ही तशीच गोड होईल.....
ती एवढेच म्हणाली....'याला
म्हणतात कविता; नाहीतर तु!' (हे ही तु बायको या प्राण्याचे (कि प्राणिचे) हावभाव
डोळ्यासमोर आणलेस तर तुला माझी केविलवाणी अवस्था लक्षात आली असेल.)
तरीही
मला तुझी कविता (गझल ही कविताच असते असे मी मानतो) इतकि गोड वाटली आहे; काय सांगु!
(काय ते मी सविस्तर सांगणार आहेच).
या गझलेमध्ये ती महागझल आहे हे वैशिष्ट्य आहेच. पण केवळ 'महा' आहे म्हणुन ती महान
नाही. महानता ही त्या गझलेच्या रूपसौंदर्यात आहे.
अहाहा, काय गोड गझल आहे.
एखाद्या सुंदर रमणीचं नितळ सौंदर्य पहाटेच्या प्रसन्नवेळी संगमरवरी शुभ्र-सफेद
प्रासादाच्या गवाक्षातुन दिसावं; कि राजहंसानं मोत्याचा चारा खात असताना
पुष्करणीतील पंखावर उडालेले सलील-तुषार आपले शुभ्रश्वेत पंख फडफडवुन निथळुन टाकावं.
तुझ्या गझलेला उपमाच नाही; किंवा तुझ्या गझलेला इतक्या उपमा लिहीता येईल कि
कालिदासाला कदाचित आकाशातुन खाली पडावं लागेल.
फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे
अशी गोड तू...
- हा मतलाच इतका गोड आहे कि काय सांगावे. सुंदर रंगबिरंगी गोड
फुले...इतकि गोड कि त्यातुन मधुरस वेचुन रंगीत फुलपाखरे सगळ्या विश्वास मोहवतात;
ज्या माधुर्याचे रूपक गोडपणाच्या परिसीमेला दिले जाते, तो मध मधमाशा त्या फुलातुन
वेचतात....अशा गोड फुलांनी देखिल तुझ्या गोड दिसण्याने लाजुन चूर
व्हावे...
निशा ही गंधितच असते आणि अशा त्या निशेने अक्षरशः गंधात न्हाऊन
निघावे, मग ती निशा काय बेधुंद होईल ना!....अशी गोड तु; असा गोड तुझा
मतला.
=========================
अशी तारकांनी असूया करावी तुला
पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...
- तारकांनीही तुझी
आसूया करावी इतकि तु गोड आहेस. यातुन तु तीच्या गोडपणाचे परिमाण द्यायला सुरूवात
करतोस. हे तसे उत्तमच.
पण त्याही पुढे जाऊन चंद्र-सुर्यात त्या तारकांना
सोडुन तुझ्या गोड पणाविषयी चर्चा व्हावी, हे तर अजबच, अद्भुतच. यात असाही एक अर्थ
दिसतो कि दिवस-रात्र तुझ्या गोड पणाचे गुणवर्णन चंद्र-सुर्यही करत असतात; आणि
त्यामुळेच तारकांनाही तुझी आसूया निर्माण होते. १०० गुण या
शेराला.
===========================================
नभाने तुझ्या
उंबर्याशी झुरावे, अशी गोड तू...
- यात खरेतर तांत्रिकदूष्ट्या गोडपणाचा
संबंध येत नाही. नभाला आपण कुठल्याही प्रकारे गोड म्हणत नाही. पण ते नभही धरतीला
सोडुन जीच्या उंब-यापाशी झुरते ती किती गोड असेल, असा एक अर्थ निघतो. या ओळी मनावर
गोड शिरशिरी ठेऊन जातात.
जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड
तू
- पहिली ओळ ठीक, आहे सुंदर, पण तशी कितीतरी जणांनी ती साधली
असती.
पण दुसरी ओळ मी पहिल्यांदाच ऐकतो आहे अशी उपमा. तुझा गोडपणा इतका कि
दंवाने उन्हाला ओले करावे.... लक्षात येतंय का! अरे ऊन त्या दंवाला विरघळुन टाकते;
पण इथे तीच्या गोडपणाची कमाल इतकि कि ते दंवाचं मार्दव उन्हालादेखिल ओलं करून
टाकतं. ऊनही त्या गोडपणाच्या ओलेपणात न्हाऊन निघु
लागतं.
=================
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड
तू...
- पुन्हा शेराची पहिली ओळ तशी सुरेखच, पण तशी ती पहिल्यांदाच लिहीली
गेली असे नाही.
दुस-या ओळीत वरवर पाहता काही विशेष दिसत नाही. परंतु
बारकाईने विचार केला तर कळते कि समर्थांनी जीथे म्हटले, 'जगी सर्व सुखी असा कोण
आहे', ते बापडे कितीही खरे असो, तु इतकि गोड आहेस ना गं कि मनाचे आकंठ समाधान होते.
पुर्ण तृप्त होते. एरवी मनाला असे आकंठ समाधान कसे
मिळणार?
===============
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड
तू...
- पुन्हा पहिली ओळ तितकिशी पटली नाही. असे वाटले कि दुसरी ओळ
पहिल्यांदा सुचली असावी आणि पहिली ओळ ही फक्त vaccum filling साठी लिहीली असावी.
असो!
तुला पाहता मुलाने हसावे (यातला 'त्या' हा शब्द, जो पहिल्या ओळीशी
संबंधित आहे, मी दुर्लक्षित करतो आहे); किती सुंदर कल्पना आहे. इथे मुलाने हे मी
लहान मुलासाठी घेगंधकोशी''त्या फुलांच्या गंधकोशी' मधल्या 'बालकांचे हास्य का' या
ओळी आठवल्या.
=================
सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड
तू...
- अरे राधा-कृष्ण किती करोडो कवितात येऊन गेले असतील नाही. पण इथे तु
त्याच कृष्णाविषयी नि राधेविषयी (जीला तु या कवितेत गोड असे वारंवार म्हणत आहेस,
तीला मी रसग्रहणापुरते राधा धरत आहे) किती वेगळे लिहीले आहेस.
मी आजवर
राधेच्या-मीरेच्या गिरीधरावरील भक्तीविषयी ऐकले वाचले होते, पण कृष्णाने त्यांची
भक्ती केली असे कधीच ऐकले नव्हते. किती एकतर्फी इतिहास लिहीला जातो असे आत्ता
तुझ्या ये शेरावरून वाटून गेले.
ईथे श्रीधर आणि हरी हे शब्द कृष्णनिदर्शक
आहेत. हे शब्द सहसा कवितेत दिसत नाही, निदान अशा प्रकारच्या कवितेतरी. परंतु इथे ते
शब्द खुप समर्पक वाटतात; छान वाटतात.
पहिल्या ओळीत तु राधेच्या
मधुराभक्तीचाच आधार घेतला आहेस. तसा तो सामान्यच वाटतो. पण दुस-या ओळीत तु त्या
कृष्णाला, हरीला भक्तांच्या रांगेत आणुन बसवले. जे अगणितजणांचे आराध्य दैवत आहे,
ज्याच्या भक्तीने कैवल्यमुक्तीचे आश्वासन मिळते, त्या हरीला तु तुझ्या 'ती'च्या
भक्तगणांत आणुन बसवले.
कवितेचे सामर्थ्य यातच आहे कि जे आजवर कुणीच केले
नाही, जे कृष्णाविषयी राधा किंवा मीरेच्यासंदर्भानेही कुणी कधी विचार केले नाही, ते
तु तुझ्या या ओळीत आणुन दाखवलेस. कृष्णाला तुझ्या तीच्य गोडपणाचे भक्त बनवलेस, इतके
जितके राधेने कृष्णावर प्रेमवर्षाव केला
असेल.
===========================================
यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी
गोड तू...
- पुन्हा एकदा फार वेगळे लिहुन गेलास. यम, मृत्यु वगैरे दाखले
अनेकदा आले असतील अशा प्रकारच्या गझलामधुन. पण तु तीच्या गोडपणाच्या सामर्थ्याची
चुणुक यमाला पराजीत करून दाखवली आहेस. आणि यमाला कसे पराजित केलेस; मृत्युवर कसा
विजय मिळवला, तर तो तीला जिंकुन तुझे श्वासच चिरायु बनले तर तो बिच्चारा यम काय
करणार तुझे वाकडे. तो यम प्राण घ्यायला येईल खरा, पण ज्याचे श्वास त्या गोडपणाला
जिंकून चिरायु झाले आहेत, त्याला यम तरी कसा परास्त करणार.
कृष्णाच्या
उदाहरणा/उपमेनंतर हा दुसरा फारच उत्कृष्ट कल्पनाचमत्कृतीचा नमुना आहे. आणि अजुन
पुढे येणार आहेत.
=======================
तुझा सावळा रंग माया करे,
पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...
- अरे
कुठे पोचलास. लोक अशा गोड तीच्यासाठी देवदास बनतील, चातक-चकोर बनतील, कृष्ण बनतील,
जोगी-बैरागी बनतील, बरबाद कवि बनतील..... पण तु तुकाराम बनायला निघालास. या ओळींनी
तु या नुसत्या मधुर कवितेला अलौकिक प्रमाण दिलेस. देवदासाचे किंवा मजनुचे प्रेमात
भणंग होणे निराळे. तो केवळ भौतीक प्रेमाचा परमोच्चबिंदु मानता येईल, पण सदेह
वैकुंठागमन करणा-या तुकारामाचे भणंग होणे हे परालौकिक आहे, पारमार्थिक आहे. तु यात
तुकाराम आणि पांडुरंग हा संबंध सहजतेने योजुन या श्रृंगारिक कवितेला प्रासादिक करून
टाकलेस. धन्य!
सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी
गोड तू...
- सुरेख शेर. तुझ्या गोड हासण्याने त्या सौदामिनीवर रूसण्याशिवाय
पर्यायच उरू नये....अशी गोड तु!
=================
कुबेरासही, मी भिकारी
गणावे, अशी गोड तू...
- या उपमेला मी फार गुण देणार नाही. पण ही जी रचना तु
केली आहेस आणि या ओळीच्या अनुषंगाने वरच्या ओळीतला 'मुल्य' हा शब्द किती चपखलपणे
योजला आहे ते लक्षात येते. हे रचनाकाराचे कौशल्य
असते.
=====================
तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता
प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...
- पहिले म्हणजे तीच्या
वर्णनाचे वाक्य असूच शकत नाही; ते महावाक्यच असू शकते. महावाक्यमधुन पुन्हा त्या
गोडपणाची अलौकिकता सिद्ध केली आहे. पुन्हा हे ही कविच्या प्रतिभेचे
द्योतक.
पण त्यापुढे जाऊन, महाभारत, जे भारतात विसरणे म्हणजे मृत्युसमान
आहे, विसरले जावे, अशी गोड तु. प्रत्येक उपमेतुन त्या गोडपणाला श्रेष्ठत्व देण्याचा
हा प्रयत्न इतका जबरदस्त जमला आहे, कि नतमस्तकच
व्हावे.
==================
तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती
लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...
- वरील सर्व शेर एका
बाजुला आणि हा शेर एका बाजुला. म्हणे गालिबविषयी का गालिबने कुणाविषयी (कदाचित मीर)
असे लिहीले कि तु मला तो एक शेर दे आणि माझी आख्खि शायरी तुझी करून घे, मला तसेच
म्हणावे वाटते आहे यार!
काय लिहु. ज्या बोधिवृक्षाने या समस्त विश्वातील
संयम, वैराग्य आणि अनासक्तीचा सर्वोच्च आदर्श असणा-या गौतमास; विष्णुच्या आठव्या
अवतारास, ज्ञानप्राप्ती करून दिली, त्या बोधिवृक्षाला तु तीच्या गोडपणाच्या मोहाने
आकर्षित होऊन तीच्या दर्शनासाठी रांगेत उभे केलेस, काय रे.....कुठे शिकलास हे सारं.
तीच्या गोडपणाच्या दर्शनाचा मोह इतका जबरदस्त कि त्या बोधिवृक्षालाही तो आवरता येऊ
नये...अगाध, अद्वितीय......नव्हे; एकमेवाद्वितीय!
=====================
कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे,
अशी गोड तू...
- बास, खरंय. तु ही थकलास. शब्दही थकले. सारे शेवटी नेती
नेतीच झाले. ज्याला शब्दसामर्थ हतबल करावे अशी गोड तु......
खरे सांगु त्या
गोडपणाचं खरं परमोच्च वर्णन या शेवटच्या शेरात येतं. एवढी महागझल नि महान गझल
लिहुनही शेवटी शब्दांचं पांघरूण त्या गोडपणाला अपुरं पडतं हेच खरं त्याचं वर्णन.
कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड
तू...
- एकच फसलेला शेर. वाचताना सहज न लक्षात येणारा. पण बारकाईने पाहिले
तर इथे तीचे गोडपण दुय्यम-तिय्यम झाले आहे तुझ्यापुढे. तीचे नाव घेतल्याने तुला
आठवावे, यात तीच्या गोडपणाची महती कशी बरे...... मला वाटते, इथे विकेट पडली आहे.
असो, ते महत्वाचे नाही.