Friday, July 24, 2009

तळे


उंच सुंदर डोंगर होते
तळास त्यांच्या तळे होते
आभाळाच्या प्रतिबिंबाने
पाणी तळ्याचे निळे होते

सभोवताली झाडे हिरवी
रंगीत पक्षी नभात मिरवी
गालांवरती अवखळ वारा
हात, तळ्याच्या अलगद फ़िरवी

उठे शिरशिरी जळावरती
गोड लहरी तळ्यावरती
हसू उमलते ओठांमध्ये
भान उरे ना ताळ्यावरती

मऊ लव्हाळी हळवी काठी
पानफ़ुलांची सुरम्य दाटी
प्रतिबिंबातुन तळे घेते
आकाशाशी गाठीभेटी

नभी अचानक मेघ जमले
गगन मंदिरी म्रुदंग घुमले
तळ्यामधल्या जळासंगे
जळथेंबांचे नाते जमले

तळ्यात काही जळचर होते
दर्शन त्यांचे पळभर होते
नितळ निळ्या पाण्यावरती
स्फ़टिक शुभ्र ते दहिवर होते

कमळफ़ुलांची पुष्करिणी
तळ्यात फ़ुलली कुमुदिनी
मोहक रमणी रूपवती
जणू पाहे निळ्या दर्पणी

नभी अवतरे शशांक रात्री
हळुच ऊतरे निलजलपात्री
अंग झाडता गळे चांदणे
तळे शहारे पुलकित गात्री

नि:शब्द रात्रीच्या ऊत्तर प्रहरी
ऊभा पाहुनि ध्यानस्थ गिरी
वरती ऊठती चंचल लहरी
निश्चल होते तळे अंतरी

निश्चल होते तळे अंतरी
========================
सारंग भणगे. (जुलै २००९)

Thursday, July 16, 2009

एकदा पुन्हा मला लहान व्हायचंय

------------------------
सोडले मागे कितीतरी, किती घ्यायचे राहिले,
पुढे पुढे जाताजाता, मागे कधिच ना पाहिले.

भूतकाळी बालपणीच्या एकदा गहाण रहायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

मागे राहिले बाल्य हिरवे नि गुलाबी तारूण्यही,
निष्ठुर कोरड्या जगरहाटी प्रेम विरले कारूण्यही.

सारे झिजावे मजसाठी अशी सहाण व्हायचंय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

शौक उनाड शिवाराचे; अल्लड पाणी विहीरीचे,
आंबटचिंबट चिंच-आवळे आणि कच्च्या कैरीचे.

दमून गेल्या मैदानाची मला तहान व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

आजीआबांच्या गोष्टींची मजाच असते न्यारी,
आईबाबांच्या ओरड्याची सजाच असते प्यारी.

खेळुन खेळुन तुटलेली मला वहाण व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

जत्रेमधला चिकटमेवा चन्यामन्या आंबट बोरं,
फ़ाटक्या रबरी चेंडु मागे धावतात सारी पोरं.

तासापुरतंच खोटं खोटं मला शहाणं व्हायचय,
एकदा तरी पुन्हा मला खरंच लहान व्हायचय.

करता जर आली मला ग्रह नक्षत्रांची हेराफ़ेरी,
काळाच्या या चक्राला फ़िरवता आले जराजरी,

तेवढ्यापुरतं तरी मला थोडसच महान व्हायचय,
खरं सांगतो एकदा पुन्हा मला लहान व्हायचय.
=================================
सारंग भणगे. (15-16 जुलै 2009)

Wednesday, July 15, 2009

मनाच्या फ़ोडणीच्या कविता

मळभ दाटले आकाशात
चिंब देह धरतीचा
तळ्यात बुडाला चंद्र हा
मार्ग धुंडाळी परतीचा.

निळीसृष्टी भेदरली
पिसे झाले क्षितीजही
मान वाकूनि झाड हे
आत्म्यात शोधते वीजही.

अज्ञाताच्या वाटेवर
निर्गुण सावली सरकते
पहाटको-या सुर्यस्तनात
किरणक्षीर पाझरते.

देह झाडाचा सुरकुतला
हात पसरूनी अस्ताव्यस्त
मागे क्रूर उन्हास
हिरवाईचा वरदहस्त.

मऊ रेतीचा पाऊलास
असा हळवा स्पर्श
कुणी हळुवार जशी
फ़िरवावी मोरपीसं.

भिजल्या रात्रीत
थिजले मौन माझे
शब्द रातकिड्याहून
ठरले गौण माझे.

बिनधास्त कोकिळा ही
स्वरसाज आळविते
मल्हार छेडता मी
पिंगळ्यास बोलाविते.
===============
सारंग भणगे. (केव्हातरी...कुठेतरी)

Saturday, July 4, 2009

अभिसार

घेशील देह हा कवळुन बाहुपाशी
घेशील कुंतलांना माझ्या तुझ्या उशाशी
गात्रात मारव्याचे सूर जैसे उठावे
गाण्यात प्रणयवेड्या तु मलाच आळविशी

गोकुळ यौवनाचे भरून तुडुंब वाहे
तु मत्स्य प्रणयाचा तळ्यात डुंबताहे

बुडून जा सख्या रे ने मजलाही बुडाशी
प्रणयसिंधु पोहताना पीळदार हो खलाशी (१)

प्रत्येक पाकळीला तु चुंबुन चिंब घ्यावे
अगणित पाकळ्यांची मी रे कळीच व्हावे

रसात रे विलासी रमलास मधुकोशी
माधुर्य चाखताना रचल्या प्रणयराशी (२)

भरले कणीस रूपाचे शीवार अनावर झाले
ते पाहुनी उपाशी जोरात जनावर आले

मधुचंद्र जोंधळ्याचा चाले चांदण्याशी,
अभिसार पाखरांचा हो बुजगावण्याशी (३)
==================================
सारंग भणगे. (जुन २००९)

Sunday, June 28, 2009

इंजिनिअर?

नामकाकांच्या 'अभागी' वरून घडलेला हा अपघात...


इंजिनदादा इंजिनदादा धाव धाव धाव
पडतील तुला नाही तर घाव घाव घाव

पाहु नको थोडे ही ईकडेतिकडे तिकडेईकडे
धडपडती लोकही जिकडेतिकडे जिकडेतिकडे

धुर काढ अगदि भरपूर भकाभक भकाभक
ऊर फ़ाटू दे धावत रहा धकाधक धकाधक

कुठे फ़ाटक्या आकाशी बघु नको बघु नको
सारे म्हणती माणसा रे जगु नको जगु नको
===============================
सारंग भणगे. (28 जुन 2009)

Sunday, June 21, 2009

एक पाखरू उडालं - हर्षदा विनया

आपल्या समुहावरचं एक अतिशय मनस्वी पाखरू भरारी घेत आहे, आणि कदाचित ते पाखरू आता पुढे काही काळ या आपल्या समुहावर किलबिलाट करायला फ़ारसं भेटणार नाही. त्या पाखराला उडण्यापुर्वी लिहावा वाटलेला एक काव्य-संदेश.

त्या पाखराचं नाव आहे - हर्षदा विनया.

हर्षदा तीच्या शिक्षणानिमित्त बाहेरगावी जात आहे आणि त्यामुळे ती कदाचित आपल्या समुहावर फ़ारशी भेटणार नाही. जे हर्षदाला ओळखतात त्यांना हर्षदा जाणं म्हणजे काय हे निश्चित समजेल.

सर्वात मुख्य म्हणजे हर्षदा कुठल्याही लौकिक आणि सामान्य अर्थाने उच्चशिक्षणासाठी चाललेली नाही, तर अंतरात सामाजिक जाणीवा ठेऊन सामाजिक कार्यासंबंधातील शिक्षण घेण्यासाठी चालली आहे. हे एका अर्थाने अलौकिक आणि असामान्यही आहे.

तीच्यासाठी लिहीलेला हा निरोप, आपल्या सर्वांतर्फ़े.
-------------------------------------------------------------


एक पाखरू उडालं,
त्याला आभाळं ठेंगणं,
त्याच्या कवेत माईना,
सारं विशालं गगनं.

एक पाखरू उडालं,
त्याला आस दिगंताची,
त्याच्या पंखामदि बळं,
धरी कास अनंताची.

एक पाखरू उडालं,
त्याचं आभाळं वेगळं,
भुईच्या मातीमदि,
त्याला घावलं आभाळं.

एक पाखरू उडालं,
संगे ध्येयाचं पाथेय,
अंधाराच्या वाटातुन,
घेण्या सुर्याचा प्रत्यय.
===================
सारंग भणगे. (२० जुन २००९)

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

ये झुकुन अवघ्राण घे
दे मला तु रसदान दे
कृष्णवर्ण तु दाटला
धन्यतेचे स्तनपान दे

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

वैशाख शाखा सुकली रे
नभा विशाखा मुकली रे
शोधत गेली खोल मुळे
मातीत ओल चुकली रे

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

अधीर झाला जीव पीसा
ओढ लागली मय़ुरपीसा
तृष्णा पोचली तारसप्तका
सा रे ग म प ध नि सा

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

तृषार्त चातक जळून गेले
जीर्ण पानही गळून गेले
ओठामधल्या ओलाव्याला
ओज उन्हाचे पिळून गेले

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

कृपावंत हो सरसरून ये
मेघफ़ळांनी रसरसून ये
अनंत हस्तांच्या वर्षेने
बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.

बरस रे मेघा बरसून ये...बरसून ये.
==========================
सारंग भणगे. (21 जुन 2009)

Monday, June 15, 2009

कुसुमाग्रजांस...........सादर; सविनय

तो काव्यज्योती उजळून गेला,
अन शब्दमोती उधळून गेला,
अशी काव्यरत्ने जन्मा न येती
तो काव्यसिंधु घुसळुन गेला.

कुठे लखखावी तडिता नभात,
कुठे अंकुरावी कविता गर्भात,
कुठे शब्दवेणु गाई सुरात,
कुठे स्पंदने कवितेच्या ऊरात.

किती काव्यकुसुमे फ़ुलवून गेला,
तो काव्यसिंधु घुसळुन गेला.

कुठे शब्दक्रांती पेटे ज्वलंत,
कुठे गाती गंधर्व गगनी अनंत,
कुठे काव्यविहगे उडती दिगंत,
कुठे शब्दसुषुप्त होई जीवंत.

तो काव्यरसिकांस रिझवून गेला,
तो काव्यसिंधु घुसळुन गेला.
=======================
सारंग भणगे. (एप्रिल २००९)

Sunday, June 14, 2009

कवितेला....

दु:ख माझे आज मागे दाद माझ्या कवितेला
काय पान्हा न च फ़ुटावा पाहुनि मज कवितेला?

वाहतो मी भार दु:खे दु:ख त्याचे नसे परी
वेदनेने सांग माझ्या अश्रु न फ़ुटावा कवितेला?

फ़ाटलो मी अंतरी जरी अन दाटलो त्या दिगंतरी
फ़ाटताना अन दाटताना दाटूच नये का कवितेला?

ऐकताना दु:ख माझे वेदनाही गहिवरल्या
काय किंचित दु:ख साधे वाटू नये पण कवितेला?

मी तीचा दास झालो उदास होतो प्रत्येक वेळी
आता तरी ऊर माझा कळूच नये का कवितेला?

किती कोसले तीला जरी मी तीच होती संगतीला
संगीताच्या सांगतेला घेऊन जाईन मी कवितेला.
=====================================
सारंग भणगे (३ मे २००९)

Tuesday, June 9, 2009

सूर उमटले ओठांवरती

(गाल लललगा गागाललगा)

सूर उमटले ओठांवरती
ताल थिरकले बोटांवरती
नाद निसटला रानामधुनी
शीळ घुमतसे वाटांवरती

सूर उमटले ओठांवरती
लाट उठतसे लाटांवरती
नाव भिरभिरे पाण्यावरती
गीत सुटतसे बोटीवरती

सूर उमटले ओठांवरती
फ़ूल उमलले देठांवरती
वेल बिलगते झाडांभवती
रान बहरते बेटांवरती

सूर उमटले ओठांवरती
नीर खळखळे घाटांवरती
वात विहरतो शेतामधुनी
शेत हुळहुळे काठांवरती

सूर उमटले ओठांवरती
स्पंद परतले घंटांवरती
ओम अक्षर मंत्र आरती
शांत विलसते कंठावरती
=================
सारंग भणगे. (9 जुन 2009)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...