Friday, November 10, 2017

तुझ्यावाचून मला जराही करमत नाही


तुझ्यावाचून मला जराही करमत नाही
तुला करमते म्हणून मी ते सांगत नाही

घड्याळातले काटे फिरती सतत निरंतर
तुझ्यावाचून काळ पुढे पण सरकत नाही

अवकाशाहुन अपार मोठी आहे कविता
चिमटीमध्ये माझ्या इवल्या मावत नाही

कधी तृणांवर हुळहुळणारा अल्लड वारा

होउ शकतो कसा वावटळ समजत नाही

कुणी न व्हावे उजाड इतके कोळपलेले
काळजातही आता काही उगवत नाही

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शब्दामधून पाझरतो पण झिरपत नाही
=========================
सारंग भणगे (१० नोव्हेंबर २०१७)

Thursday, November 9, 2017

स्मृती

तुझ्या मौनातल्या संवेदनांनी गूज सांगावे
असे माझ्या मनाशी तू करावे गूढ कांगावे

कुणी बोलायला नाही कुणी ऐकायला नाही
असा मी एकटा आहे, तरी एकांत हा नाही
मला भेटावया येती स्मृतींचे नित्य सांगावे

तिन्ही सांजेस होता मी जरासा शांत सामुद्री
घुमे आलाप गाजेचा तुझ्याशी लागते तंद्री
अशा वेळेस शब्दांनी मुक्याने आत रांगावे

स्मृतींचे दीप निर्मोही मनाने लावतो आहे
मनाच्या वाहत्या पाण्यामध्ये ते सोडतो आहे
प्रभेने त्या वियोगाच्या तमाने दूर पांगावे
======================
सारंग भणगे (७ नोव्हेंबर २०१७)

Saturday, November 4, 2017

लग्नानंतर

लग्नाआधी सुखात होतो सुखात आहे लग्नानंतर
आधी होते मुक्तकाव्य जे वृत्तकाव्य ते लग्नानंतर

उगाच पूर्वी जागून रात्री प्रॉडक्टीव्ह ना काही घडले
मधुरात्रीला अधुरात्रीचे स्वप्न उमलले लग्नानंतर

करायचो ज्या कृती बेधडक त्यांची आता चोरी झाली
पोरी बघणे चोरीहूनही पाप जाहले लग्नानंतर

लग्नाआधी वाचन बक्कळ; कविता लिहिल्या असत्या पुष्कळ
‘परी’ बोबडी अल्लड कविता कुशीत येते लग्नानंतर

वृत्त अलामत खूप कवाफी रदीफ होते लग्नाआधी
प्राणप्रियेने प्राण फुंकले गझलियतचे लग्नानंतर
==========================
सारंग भणगे (४ नोव्हेंबर २०१७)

Monday, October 23, 2017

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती

आयुष्याचे सरपण गेले सरणावरती
कविता सुचते आहे अपुल्या मरणावरती

राम सोबती असता कसला मोह जडाचा
काय नवल की जीव जडावा हरणावरती

तारण असते जीवन त्याचे पाण्यासाठी
जमीन जाते बळी बळीची धरणावरती

तू गेल्यावर श्वास घेतला अखेरचा मी
आता जगतो आहे केवळ स्मरणावरती

निरिच्छ होउन गाव सोडला बैराग्याने
धुळही नव्हती कणभर त्याच्या चरणावरती

डोके भिडले आकाशाला पाय भुईवर
मस्तक माझे झुके अशांच्या चरणावरती

- सारंग भणगे (२० ऑक्टोबर २०१७)

Saturday, October 21, 2017



कलापूर्ण व्हावे.. जगावे असे की..
सुरांसोबती ताल मिसळून जावा..
धुमारे फुटावे हजारो... मनाला..
निळाभोर.. आकाश पक्षी उडावा..

कधी चित्र-रंगात गुंतून जाता
जुन्या चौकटीतून बाहेर यावे
पहाव्यात रेषा..उमलती कशा या
कलामंदिरी.. फक्त देणे उरावे

कलाकार आहेच 'तो' ही निराळा
रुजे पंचभूतात गाणे प्रवाही
असे गूढ शिल्पात कोरून जाई
उरे ना कला.. ना कलाकार राही

* सुनीति लिमये
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुनीतिताई, फार म्हणजे फार सुरेख रचना आहे!

रणजित नेहेमी म्हणत असतो कि कवितेला छान लय असली कि कविता वाचावीशी वाटते आणि हे खरेच आहे. कविता लयबद्ध असली कि तिला एक वेगळीच उभारी येते. म्हणजे प्रत्येक कविता ही मोरासारखी सुरेख असतेच; पण ती छान लयीत असली कि जणू मोराने तो पिसारा पूर्ण फुलवला कि तो कसा अधिक मनोहर दिसतो, तसे काहीसे होते! तुमच्या ह्या कवितेला इतकी सुंदर लय आहे कि वाचायला खूप मजा आली.

अशा लयबद्ध कवितेला सुंदर शब्दांची साथ मिळाली तर तो पिसारा फुलवलेला मोर जणू आनंदाने थुईथुई नाचू लागला आहे असा अनुभव मिळतो. अतिशय साधेच, पण तरीही कवितेला एकदम अनुरूप असे शब्द तुमच्या कवितेचे सौंदर्य खुलवत आहेत. प्रासादिक कवितांचा उद्देश हाच असतो कि वाचकाला त्यातून एक आनंद मिळावा, आणि तुम्ही जसे लिहिले आहे कि ‘सुरांसोबती ताल मिसळून जावा’; तसे तुमचे हे शब्दसौंदर्य त्या नादमय कवितेच्या सौंदर्यात फार सुरेख मिसळले आहेत.

शब्दांना नाद असतो, पण शब्दातून चित्र देखील निर्माण होते. कुणास ठाऊक मेंदूच्या किंवा मनाच्या कुठल्या कुठल्या अंगांना ते शब्द स्पर्शून जातात आणि कुठल्या कुठल्या संवेदनांना सुखावून जातात! पण अशी सौंदर्यपूर्ण कविता मनाला फार आल्हाद देऊन जाते! त्यासाठी नादमधुर तसेच समर्पक आणि सौंदर्यपूरक शब्द कवितेत योजणे ही सोपी कला नाही. शेकडो कविता वाचल्यावर मग असा अनुभव क्वचित मिळून जातो!

पण कवितेचा खरा आत्मा असतो तो म्हणजे तिचा आशय! ह्या कवितेत जर आशय नसता तर तो पूर्ण पिसारा फुलवून आनंदाने नाचणारा मोर हा एखादा लोकांचे कृत्रिम रंजन करण्यासाठी तयार केलेल्या electronic / मानवनिर्मित मोरासारखा वाटला असता. सौंदर्यपूर्ण कवितेत तितकंच सखोल आणि सघन आशय जेव्हा मिसळलेला असतो, तेव्हा ती कविता खऱ्या अर्थाने जिवंत होतेच; पण कवितेला अधिक उदात्तता देखील येते.

तुमच्या ह्या कवितेत आयुष्य अधिक परिपूर्ण; कलात्मक कसे जगावे हा संदेश हा त्या आशयाचा पाया रचतो, पण शेवटी तुम्ही जेव्हा ‘उरे ना कला.. ना कलाकार राही’ ही ओळ लिहिता तेव्हा जीवन कितीही सुंदर असले तरीही जीवनाची अगदी खरी परिपूर्तता ही त्या तत्वात विलीन होण्यात; कला आणि कलाकार हे द्वैत देखील संपण्यात आहे, हे लिहिता तेव्हा केवळ नतमस्तक व्हावे वाटते!

इतक्या छोट्या कवितेत इतके रंग असे भरले आहेत कि क्षणभर थक्क होऊन गेलो मी! फार आवडली ही रचना!

- सारंग

Tuesday, October 17, 2017

वयात आलेल्या माझ्या मुली

वयात आलेल्या माझ्या मुली,

आता जेव्हा तू माझं बोट सोडून
ह्या रस्त्यांवर उतरशील,
तेव्हा तुला भेटतील
ह्या शहरात वावरणारी
अनेक जंगली श्वापदे,
दिसतील कोल्हे; लांडगे; गिधाडे;
आणि अनेक जळवा; पिसवा,
अंगाला लुचणाऱ्या; रक्त पिणाऱ्या!

लुचेल एखादी जळू तुझ्या मऊ कोमल त्वचेला;
लचके तोडायला अंगावर धावतील लांडगे;
आणि फसवतील काही लबाड कोल्हे
तुला त्यांचं भक्ष्य करण्यासाठी!

तू लढ; हरू नकोस; भिऊ नकोस!
ह्या कभिन्न जंगलात भिन्न रहा आणि चालत रहा!

एखाद अनावर जनावर
तुला ओरबाडून; तुझ्या तनुची लक्तरं करू पाहील
जरी भक्ष झालीस तरी तुझ लक्ष्य विसरू नकोस,
स्वत:ची घृणा तर कधीच करू नकोस!!

शरीरावर झाले आघात
तरी तुझ मन त्यापासून अस्पर्श ठेव,
शांत रहा, पण भ्याडपणाने गप्प राहू नकोस!
अन्यायाचा थयथयाट कितीही असला तरी
तुझ्या अंतरंगातल्या अमर्याद शक्तीच्या थैमानापुढे
त्यांचा टिकाव लागणार नाही!
त्या शक्तींना टिकव, 
आणि वेळप्रसंगी
त्या शक्तींचा टिकाव ह्या श्वापादांवर घालून
त्यांच्या नृशंस; हिडीस वृत्तीला ठेचून मार!

पण असा बदला हेच जीवनाचे ध्येय
बनवू नकोस!
तुझ ध्येय कितीतरी उदात्त आहे,
ते ओळख; पारख!

ह्या जळवा; पिसवा फेकून दे
आणि तुझा काजवा शोध!
होय, ह्या घनघोर जंगलात
काही काजवेही भेटतील तुला;
हा विश्वास ठेव!

आणि नाहीच मिळाला एकही काजवा
तर तुझ्या मनमंदिरात काजव्यांचे थवे शोध!
त्या काजव्यांची मशाल जेव्हा तुझ्या अंतरंगात पेटेल
तेव्हा हे जंगल देखील उजळून निघेल!!!

तेव्हा जग तुझ बोट धरून चालायला शिकेल!
============================
सारंग भणगे (११ ऑक्टोबर २०१७)

आर्तता काव्यात येते दाटुनी

आर्तता काव्यात येते दाटुनी
आत आहे तेच येते आतुनी

कष्टणाऱ्या बांधवांना भाकरी
गोड आहे विठ्ठला नामाहुनी

उंबऱ्यावर जाहली माझी प्रिया
माप येता वेदना ओलांडुनी

बोचरी असहायता पुरुषा तुझी
कृष्णमयता साध्य राधा होउनी

खोल विहिरीतून कविता काढतो 
मोट शब्दांची तिच्यावर बांधुनी
==================
सारंग भणगे (१६ ऑक्टोबर २०१७)

Saturday, September 23, 2017

अज्ञाताच्या शोधात २

तो किरण हातात घट्ट धरून
तो पुढे चालू लागला
पायांमध्ये चालण्याचं बळ असतं
ह्याची प्रथमच झालेली जाणीव
त्याच्या मनाला चेतना देऊन गेली

त्या तुडुंब अंधारात
तो एकटा किरण...
जणू एक छोट्याशा खडकवजा बेटाभोवती
तो अंधाराचा अंतहीन समुद्र पसरला होता  
आणि त्या बेटावर
आपला तोल सावरत
तो उभा होता

तो शंकीत भ्रमित होता
हा किरण म्हणजे
कौरवांच्या चक्रव्युव्हात अडकलेला अभिमन्यू
की विराट राज्याच्या आक्रमणात
संपूर्ण कौरावांना पराभूत करणारा
गांडीवधारी अर्जुन?
          
शंका, संभ्रम आणि प्रश्न....
एकेक त्याच्या मनात जन्म घेत होते
आणि क्षणार्धात त्या एकेका प्रश्नाचे
एका विशाल उंच वृक्षात रूपांतर होते

अनेक प्रश्नांच्या, शंकांच्या वृक्षांनी
त्या गडद अंधारात
एक घनदाट गच्च अरण्य उभं राहिलं..

आता त्या किरणाचा मार्ग देखील अडवला जात होता
इथवर त्या प्रचंड अंधाराशी
एकाकी टक्कर देणारा तो एकमेव किरण
आता कुठे कुठे हरत होता...हरवत होता

आणि एका बेसावध क्षणी
त्याच्या घट्ट मुठीतून निसटला...
आणि तो पुन्हा एकदा
त्या जातक अंध:काराने संपूर्ण वेढला गेला

एव्हाना पायात आणलेलं बळ ओसरलं
आणि तो एका प्रश्नवृक्षाच्या कराल बुंध्याला टेकून
अचेत होऊन बसला...
===============
सारंग भणगे

Wednesday, September 20, 2017

माझी कैफियत


बनून कापूस जखमा माझ्या पुसल्या नाहीस कधी
डोळ्यामधल्या अपार धारा टिपल्या नाहीस कधी
तंबोऱ्याच्या तुझ्या नशिबी तारा तुटक्या होत्या
म्हणून का रे तारा अपुल्या जुळल्या नाहीत कधी

तहानलेली नजर व्याकूळ शोधत होती तुजला
मृगजळ बनुनी समोर येण्या जीव कसा रे धजला
इमला इमला मी स्वप्नांचा चढवत होतो तेव्हा
मजला मजला पाडत गेला तुडवत गेला मजला

निवडुंगाचा स्वभाव होता काटे बोचवणारा
हळवी माया हिरव्या पानी नुसती साचवणारा
माध्यान्हीला उन्हार्त वेळी डोक्यावरती धरतो
पावसात पण छत्री उघडी पुढ्यात नाचवणारा

तुझ्यामुळे मी आहे केवळ जाण मला ही आहे
जाण मलाही बाबा तू पण आण तुला ही आहे
जेव्हा मी पण होईन बाबा तेव्हा माझे मी पण
तिच्याच कारण देईन कारण प्राण मला ती आहे
============================

सारंग भणगे (२० सप्टेंबर २०१७)

Monday, September 18, 2017

तू आहेस....

तू नाहीस माझ्या हृदयावरती गोंदलेली नश्वर
तू आहेस माझ्या प्राणावरती कोरलेली अक्षर

तुला भेटणे शक्य जरी पण क्षितिजावरतीच फक्त
तू आहेस माझ्या खांद्यावरती झोपलेलं अंबर

नौका'नयना' करिता येती तुझ्याचपाशी दोघे
तू आहेस माझ्या डोळ्यामध्ये बांधलेलं बंदर

पिऊन लाटा डोळ्यांमधल्या खारट चुंबन मिळते
तू आहेस माझ्या ओठांनीही चाखलेला सागर

तुझ्या नेणिवा भेटत गेल्या स्वतःस खोदत जाता
तू आहेस माझ्या अस्तित्वाला जोडलेलं अस्तर

--
सारंग भणगे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...