Sunday, May 18, 2014

आभाळ


तिचा मायेचा पदर, पर त्यालाही ठिगळ
फाटक्यानं कशी बरं झाके लाजेचं आभाळ

वरं आभाळ दिसतं तेच झालं घरा छतं
दहा दिशांचा संसारं तोचं झाला घरागत
जिण उघडं नागडं देणं देवाचं सगळं

कुठं कुठं शिवू आता सारं फाटलं आभाळ
कोरं कोरडं ठेवलं सटवाईनं कपाळ
सारं कोरडं तरीही गाली वाहतो ओघळ

देव आंधळा म्हणू कि त्याला दगडाचा म्हणू
त्याचे कटीवर हात त्याने वर केले जणू
त्याचं आभाळ कोरडं आम्हावरीच कोसळं
===========================
सारंग भणगे (१८ मे २०१४)

Monday, May 12, 2014

कृष्णा

घेत आहे सारखे ती नाव कृष्णा
द्रौपदीला वाचवाया धाव कृष्णा

खेळणे झाले पुरे हा माणसांशी
आंधळ्या कोशिंबिरीचा डाव कृष्णा

यादवीला टाळणे ना शक्य झाले
वाचण्याचा काय आम्हा वाव कृष्णा!

भारताला धर्म ग्लानी गाढ आली
अन् तुझाही झोपल्याचा आव कृष्णा

नाम-भक्ती सोड आता युद्ध कर तू
काय नाही हा अहिंसा-भाव कृष्णा!

सारंग भणगे. (2 मे 2014)

Thursday, April 17, 2014

ती मला अन मी तिला

कोण होते सोबतीला, ती मला अन मी तिला
वाळवंटी जीवनाच्या, ध्रूव ती मी काफिला

सोयरे सारेच आले द्यावयाला सांत्वना
ना दिला तो हात आम्ही एकमेकांना दिला

खेळ होता जीवनाचा चालला चोहीकडे
ज्यात नाही हार ऐसा डाव आम्ही मांडिला

पाठराखी खूप होते पाठशिवणी खेळले
आंधळ्या रात्री परंतू तूच धरले कंदिला


शेंदले पाणी जनांनी आपुल्या आडातले
तू तळाशी जीवनाचा ओघ बनुनी वाहिला
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Wednesday, April 16, 2014

नाते

तुझे माझे असे नाते जसे ओवी नि जात्याचे
पहाटेच्या दंवाचे अन् तृणाच्या लीन पात्याचे


सुगंधाचे तुझ्या कोडे कळाले ना कुणालाही
जळालो मी तरी राखेस 'तो' येतो; धुरालाही


तुझ्या गाण्याविना काही मला ऐकू न येऊ दे
मुका मी आंधळा होवो परी बहिरा न होऊ दे


नुरावी मी तरीही आपल्या मागे उरावी तू
जणू मी धूप होवोनी जळावे अन सुटावी तू


कधी माझ्यावरी कोणी रचावे काव्य शब्दांनी
मला वाचून जाणावे तुझ्या अर्थास सर्वांनी


अशी होतीस अस्तित्वात माझ्या तू मिळालेली
तुझ्या गर्भात मी, आत्म्यात माझ्या तू बुडालेली
================================
सारंग भणगे. (१६ एप्रिल २०१४)

Sunday, March 16, 2014

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या
मनात स्मृतींचे थवे नभवर्खी
...
अता उरले ते उरी उललेले



मनावर ओझे अनावर झाले
उरी रुतलेले जणू शर होते
...
जसे मदनाचे तिच्या वळणांचे




जरा मरणाचे उरी भरलेले
कमी भय झाले जसे कळले की
...
मला सुख नाही तिच्या मिळण्याचे

 
मला मरणाचे असे सुख झाले
असे घडले की पुन्हा परतावे
...
कधी रडले ना, जरा रडले ते
==================
सारंग भणगे (डिसेंबर २०१३)

Saturday, January 25, 2014

सांजसंध्या

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले


चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती


हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे


दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता


समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा


भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती


खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते


निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते


जना मनास भावते कवीसही विभाव ही
निवांत सांज सावळून जन्मते विभावरी
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Tuesday, January 21, 2014

राधा - २


प्रिय राधा,

 

कशी आहेस? कित्ती दिवसात तुझे पत्रच आले नाही! पाठवलेच नाहीस कि आपल्या post खात्याच्या कार्यक्षम कारभारामुळे मला मिळाले नाही! अर्थात तुला हे माझे पत्र मिळाले आणि त्याचे तू उत्तर लिहिलेस आणि ते मला पोहोचले तरच ते कळेल, नाही का.

 

मी तसा मजेत आहे. खरेतर ‘तसा’ हे चुकूनच लिहून गेलो. मी तसे लिहावयाला नको होते. मला कल्पना आहे कि तुला त्यातून काय वाटणार आहे याची. पण खरोखर सहज लिहिता लिहिता मी तसे लिहून गेलो गं! आत्ता माझ्याकडे पेनाचे खोडरबर देखील नाही, आणि ज्यावेळी हे पत्र लिहितो आहे त्यावेळी कुठली दुकानं उघडी असणार! तुला तर कल्पना आहेच माझी पत्र लिहायची वेळ!

 

नाही, ती वेळ बदलली नाही. बदलेल असेही वाटत नाही. आठवतंय, मी दिवसा तुला एक पत्र लिहिलं होतं, आणि मग त्याचं उत्तर येण्याऐवजी तूच घरी आली होतीस भेटायला इतक्या लांबून, मी आजारी वगैरे आहे का असे पाहायला. तुझं येणं आवडतंच गं, पण मी आजारी आहे का पाहायला आलीस, आणि मी आजारी नाही म्हटले तेव्हा कपभर चहाही न घेता निघून गेलीस............ते आवडलं नाही. म्हणूनच, ज्यावेळी कदाचित आकाशात चंद्रालाही झोप लागत असेल अशाच वेळी मी तुला पत्र लिहू शकतो! तसेही त्या चंद्राशिवाय, आकाशातल्या ताऱ्यांशिवाय, कळवळणाऱ्या काही जनावरांपेक्षा आणि माझ्या मनात तुझ्या विषयी उठलेल्या वादळांशिवाय आणखी ह्यावेळी कोण कुठे जागे असते!

 

sorry, हे देखील लिहून गेलोच! तुला सांगू, काही वेळा शब्द साथच देत नाहीत, आणि काही वेळा जणू पेनाला गळती लागल्यासारखे निबमधून ते झिरपत जातात जणू. निसरड्यावरून आपला पाय सटकतो ना तसा ह्या शब्दांचादेखील पाय घसरतो कधी कधी असेच वाटते.

 

असो! मी छान मजेत आहे. तू इतकी ओरडयाचीस म्हणून ऑफिसमध्ये वेळेत जायचा, मन लावून काम करायचा खूप प्रयत्न केला, करत असतो. पण तुला माहिती आहे ना, औषधाचा डोस एकदा दोनदा घेऊन चालत नाही. काही काही रोग असे असतात कि त्यांना वारंवार आणि सातत्याने औषध घ्यावेच लागते. पण काही काही दूरच्या गावांमध्ये कुठे दवाखाने आणि औषधाची दुकानं असतात! तिथले रोगी नाहीत का कधीतरीच औषध घेतात कुणी शहरा-बिहराकडून घेऊन आले तर, आणि मग जेव्हा औषध मिळत नाही तेव्हा खोकत राहतात; कण्हत राहतात! आपल्या देशात गरीबीच फार आहे बघ.

 

नवीन काय वाचते आहेस? म्हणजे तुला मिळत का वाचायला काही? आणि नाही मिळालं तरी काही बिघडत नाही गं. नुसती पुस्तकं वाचून कुणी मोठं होत का? पुस्तकी किडे होतो आपण. मी देखील हल्ली अजिबात पुस्तकं वाचत नाही............पहाटेपर्यंत! हं! झोपेचं माझं पहिल्यापासून तसं वाकडंच, तुला तर माहितीच आहे. मग त्याची कशाला काळजी करायची उगाच. अग काही काही माणसांना झोप कमी चालते; पुरते. मग रात्री फक्त रातकिड्यांच अद्भुत संगीत ऐकत बसण्यापेक्षा बसतो आपला काहीतरी पुस्तकाची पान उघडून, त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

 

काळजी करायचीच झाली तर ह्या कडाक्याच्या थंडीत डांबराच्या निगरगट्ट रस्त्याच्या कडेला कुत्र्यासारख झोपणाऱ्या त्या भिकाऱ्यांची करावी किंवा धरणामध्ये जमीन बुडालेल्या; आतड्यात फक्त पीळच उरलेल्या; सरकार दरबारी हक्काचा मोबदला मागण्यासाठी कित्येक कोस चालत तालुक्याच्या गावाला आलेल्या शेतकऱ्याची करावी, नाहीतर ....................

 

म्हणूनच मी तुला पत्र लिहित नाही! लिहायला घेतलं कि काहीतरी भलत-सलतच लिहितो जातो. जिथे सलतंय तिथे असंच होत कि काय कोण जाणे! राधे, सोलवाटलेल्यानं विव्हाळायचही नाही का गं!

 

असो, माझ्या जखमांच रक्त हळूहळू माझ्या शाईत उतरायला लागलं आता बहुदा. ते वाचून तुझ्या डोळ्यात अश्रुंच रक्त तरारेल. म्हणून इथेच थांबतो आता!...............पुन्हा उद्या लिहीनच ना तुला पत्र, ह्या रात्रीला तांबडं ढुशी द्यायला सुरुवात करायच्या वेळी!

 

आणि हो, सर्वात महत्वाचं राहिलंच कि! अग बाई, लवकरात लवकर जरा तुझा पत्ता कळव कि!

 

सारंग

राधा - १


प्रिय राधा,

 

आज प्रथमच तुला प्रिय लिहिण्याचं धाडस करतो आहे; पण खरंतर ते ‘प्रिय सागर किंवा प्रिय समीर’ हे लिहिण्याइतकंच सहज आणि उत्स्फूर्त होतं, आणि जे सहज असतं ते निर्मळ असतं असं निदान मला तरी वाटतं. त्यामुळे त्यात धाडस खरंतर नाहीये. ‘पण सहजपणे आपल्या हातून घडते ती चूक निर्मळ आणि पवित्र असली, तरीही त्याची जाणीव हि त्रासदायकच असते.’ तेव्हा ह्या धाडसाला मनावर घेऊन नकोस.

 

खरंतर यात धाडस कोणतच नव्हतं. कारण जे प्रिय असतं त्याला ‘प्रिय’ म्हणण्यात काय चूक? पण आपल्याला जे ‘प्रिय’ असतं ते जगाला ‘अप्रिय’ असेल किंवा त्याहून अधिक म्हणजे आपल्याला जे ‘प्रिय’ वाटतं, ते वाटणं त्या ‘प्रियालाच’ अप्रिय वाटत असेल तर...... तर मात्र ते निश्चितच चूक असलं पाहिजे, आणि मग ‘प्रिय’लाही ‘प्रिय’ म्हणायचं धाडस करावं लागतं!

 

असो! तुला वाटेल माझं घोडं ‘प्रिय’पाशीच अडलं कि काय! किंवा मी खरंतर तुला पत्र नव्हे तर ‘प्रिय’ ह्या शब्दाची ‘चिकित्सात्मक मीमांसा’ करून, ‘प्रिय’ असण्याचे विषदीकरण व ‘प्रियाप्रियाचे संकलनात्मक विश्लेषण’ करतो आहे कि काय! पण तसं नाहीये. मी मला जे ‘प्रिय’ आहे..........

 

पुन्हा मी ‘प्रिय’ भोवतीच रुंजी घालतोय. खरंतर हे पत्र मी माझ्या ‘भावनांची सतरंजी’ अंथरण्यासाठी लिहित होतो. पण लिहिता लिहीतच कधीतरी किंवा कदाचित त्या आधीच माझ्या साऱ्या भावनाच शुष्क होऊन गेल्या.

 

मी एकदा लिहिले होते कि ‘काही भावनांची फुलं शब्दांचा सुगंध न घेताच कोमेजतात.’ पण काही वेळेला मात्र ‘शब्दांच्या लाटा उसळत असतात, पण भावनांच्या नावा त्यावर उतरतच नाहीत’. अशा वेळच्या लिहिण्याला अर्थ उरत नाही. त्यात नकळतच शुष्कपणा येतो.

 

आज काहीशी स्थिती तशीच आहे. खरंतर तुला काही लिहायचं म्हणजे शब्द सुचण्यापेक्षा ते हृदयातून उमटायला हवेत. बुद्धीला विचार करायला संधीच मिळाली नाही पाहिजे. पण आज तसं नाहीये. माझ्या हृदयातील भावनांचा सागर ओहोटीला गेलाय कि तुझ्याबद्दलच्या प्रेमाचा झराच आटून गेलाय? कदाचित तसच असावं! अग पाऊसच पडला नाही तर तो झरा तरी कसा टिकेल!

 

चातकासारखी पावसाची वाट पाहताना; चकोरासारखा चंद्रामृतकणांसाठी झटपटताना मला जर ‘माझा पाऊस’ किंवा ‘माझे अमृतकण’ मिळालेच नाहीत तर मी जगणार तरी कसे! त्यातच जर नकाराचं विष दिलं तर मी मरणं स्वाभाविकच आहे. विष पचवायला मी नीलकंठ नाही; मी व्याधाच्या विषारी बाणानं घायाळ होऊन मरणारा ‘सारंग’; अर्थात ‘श्रीकृष्ण’ आहे. आणि खरी शोकांतिका हीच आहे कि श्रीकृष्ण असूनही मला राधेची प्रीत...............!

 

तसे तर मला हे नात्यांचे बंध नकोच होते. खरेच! हि माझी निराशा नाही, किंवा तडजोडही नाही. कुठेतरी ते पटलेलं होतं. म्हणूनच मी एकदा लिहिलं होतं,

      ‘प्रेम राखीच्या धाग्यात नसतं, प्रेम कुंकवाच्या टिळ्यात नसतं’

प्रेम अलौकिक असतं, त्याला असल्या लौकिक, भौतिक आणि प्रतीकात्मक गोष्टीत स्वारस्य नसतं.

      ‘प्रेम आत्म्याचं मिलन असतं, खुल्या हृद्याच दालन असतं’

असंही कधीतरी लिहिलं होत. मला ते पटलही होत. त्यामुळेच भौतिक सुखांच्या व आकांक्षांच्या बर्फाखालून हि अभौतिक, अलौकिक, अपार्थिव सुखाच्या अनुभूतीची नदी खळाखळा वाहतच होती. त्यामुळे एक डोळा रडत असता, दुसरा मात्र हसत होता. कोरड्या, कडक उन्हात पावलं भाजत असताना, डोक्यावर मात्र ज्ञानाचं छत्र अडग होतं. म्हणूनच मी माझ्या मनातले आवेग आणि उर्मी, त्या उसळत्या भावनांची वाफ शक्तीन व संयमानं निर्धाराच्या व ज्ञानमय निश्चलतेच्या सायीखाली कोंडू शकलो. अवखळपणे धावू पाहणाऱ्या माझ्या भावनांच्या अजाण, अबोध, असमंजस, अवखळ, नाठाळ वासराला ज्ञानाच्या दोरान संयमाच्या दावणीला जखडू शकलो.

 

त्यातूनच मला जाण आली व मला वाटू लागलं; पटू लागलं कि,

‘प्रत्येक नात्याची परिणतीच आपल्याला का अपेक्षित असते? एका सुंदर हळुवार पातळीवर आपण समांतर राहिलो तर बिघडले कुठे?

ज्याचं त्याचं प्रत्येकी एक जग असेल. त्या त्या जगातील एकमेकांच्या प्रतिमा वास्तवाशी मेळ साधणाऱ्या नसतीलही. पण जे काही होतं ते एका उच्च कलात्मक पातळीवर असेल. अनुभवातला अस्सलपणा वास्तवापेक्षाही प्रासादिक असेल.

अशा अशरीर संबंधांना नात्यात बद्ध करण्याची इच्छा का व्हावी?’ (संदर्भ ‘हृदयस्पर्शी’ – सुहास शिरवळकर)

 

ह्या विचारांनी प्रेरित झालेली माझ्या आत्म्याची कवाडं खाडकन उघडली. ज्याला प्रेमाचं नाव देत होतो, ती माझ्या मनापेक्षा जर माझ्या आत्म्याची अभिव्यक्ती असेल तर माझ्या नजरेत सारं विश्व हे समान व भेदाहीन असेल. ज्या अंतिम प्रेमाची सारेच प्रतीक्षा करीत असतात, त्याची अनुभूती प्रत्यक्ष होऊ शकली. काही क्षण का होईना, पण मनाला आत्म्याचा साक्षात्कार होऊन एका नवीन भावविश्व सृष्टीचा अविष्कार माझ्या मानस स्पर्शून गेला. त्याचे आभार कोणास मानावे हेच मला कळेना. पण मग त्याची सुरुवात जिथे झाली ते चैतन्याचे मूलगर्भ तू होतीस, म्हणून तुला हे आभार!

 

आता नात्यापलीकडच्या विश्वात आत्म्याचा प्रवेश करणे हेच जीवनाचे ध्येय राहिले. त्यासाठी अखंड, अथक प्रयत्न करणे हेच जीवनाचे खरे सार्थक! आता त्यासाठी ‘बाहेरच्या’ स्फुर्तींचा कागदी आधार नको. अंत:स्फुर्तींना बाह्यात्कारी गोष्टींचा आधार नको असतो. कारण,

      ‘आत ओसंडणाऱ्या प्रकाशाच्या लाटा, बाहेरच्या काळोखाने अंधारात नाहीत.’

शब्दांची हि कृत्रिम कारंजी इथे आता आपोआपच अस्तंगत झाली आहेत..........

सारंग.

Saturday, January 11, 2014

इशारे


आले मिळून सारे
माझे तुझे किनारे


शब्दात काय सांगू,
वाचा नं हे शहारे.


तू चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.


देतेस माझिया का,
स्वप्नावरी पहारे.


त्या लाघवी स्वरांनी,
घुमती मनी नगारे.


आली उषा कपोली,
हेही पुरे इशारे.


तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
----------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

Thursday, January 9, 2014

काय झाले ते कळेना

पाहते शून्यात कोठे राहूनी मौनात ती
काय झाले ते कळेना का अशी संदिग्ध ती

उद्ध्वस्त होते अंतरी थरकाप होतो का तिचा
आवाज मोठा ऐकता घामात होते चिंब ती

विश्वास ना दिसतो तिच्या वागण्या दिसण्यातही
हिंडते बस्स घेऊनी डोळ्यात लाखो प्रश्न ती

राग येतो रात्रीचा तिज व्यापितो अंधार का
ज्योत विझूनी अंतरीची का जाहली निस्तेज ती

लाडक्या बाबासही ना मारते मिठी ती आता
होता अचानक स्पर्श भिऊनी झिडकारते त्यांनाही ती

काय झाले ते कळेना का कळी कोमेजली
कोडे कटू सुटणार.. जेंव्हा .... काहीतरी बोलेल ती .........

© विश्वास रघुनाथ कुलकर्णी

---------------------------------------------------------------------------------------------




विश्वास कुलकर्णी – (१) – कविता क्र. ८


विश्वासजी,


आपण आपल्या ओळीचा आधार घेऊन एका अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अलीकडच्या काळात ह्या विषयावरील कविता अधिकाधिक प्रमाणात वाचनात; ऐकण्यात येऊ लागल्या आहेत. अशाही कविता आता लिहाव्या लागतात हे केवढे मोठे दुर्भाग्य आहे.


 


अशा कवितेचे रसग्रहण करावे तरी कसे!


 


काय झाले ते कळेना हि ओळ आपण आपल्या कवितेमध्ये अतिशय समर्पक योजली आहे आणि त्या ओळीत जो गर्भितार्थ आहे; सूचितार्थ अभिप्रेत आहे तो मनाला अतिशय हेलावून टाकणारा आहे. ‘काय झाले ते कळेना’ हे म्हणत असताना काय झाले आहे ते कळते ते खरोखर दु:खद आहे!


 


तिच्या मौन रूपाचे वर्णन, तिचे सतत भयभीत वागणे हे अतिशय संयत परंतु वास्तविक वाटणारे आणि मनाला घुसमटून टाकणारे असे तुम्ही लिहिले आहे. हे वाचत असताना नकळत तिची अशी घुसमटलेली, मनातून उध्वस्त झालेली, अंतर्बाह्य हादरलेली अशी एक अतिविदारक प्रतिमा नकळत डोळ्यापुढे उभी राहते आणि ती मनाला हेलावून सोडते. कविता खूप अंतर्मुख करते, आपल्या पुरुषत्वाची आपल्यालाच शिसारी वाटू लागते, अशा परिस्थितीतून जाणाऱ्या; गेलेल्या बालीकांसाठी, स्त्रियांसाठी कुठेतरी मनात करुणा दाटतेच, परंतु तिच्यावर असे अघोरी अत्याचार करणाऱ्या नराधमांना ठेचून त्यांचा सूड आपणच घ्यावा अशी चीड निर्माण होते, मन अस्वस्थ होते....................... मनामध्ये अनेकविध भावनांचे प्रपात कोसळत जातात, मनातच ते दगडावर आपटून फुटून छिन्नविछिन्न होतात.............. लिहिता लिहिता ह्या विषयावर इतके लिहावेसे वाटू लागते कि आपल्या मनातून जणू शब्दांचे वादळ ह्या कागदावर भिरभिरावे असे वाटू लागते! थांबतो!


 


आत्ताच मी सई परांजपेंचा ‘दिशा’ पहिला. त्या अतिशय सध्या चित्रपटातील काहीही न दर्शवता दाखवलेली स्त्रीत्वाची विटंबना मनात प्रश्नचिन्हांची वावटळ निर्माण करून गेली होती कि इतक्यात तुम्ही अशाच, किंबहुन त्याहून अधिक गंभीर विषयावर संयत कविता लिहिलीत. त्यामुळे मन थोडे अधिकच सैरभैर झाले आहे.


 


इथे जे लिहिले आहे त्याला रसग्रहण म्हणावे कि नाही ठाऊक नाही, जर मी काही असंबद्ध लिहिले असेल तर माफ करा. परंतु तुमच्या कवितेमध्ये कुणाचेही मन सैरभैर करून टाकण्याची ताकद केवळ त्या विषयाच्या गांभिर्यामुळेच नाही तर त्या कवितेच्या सशक्त मांडणीमुळेदेखील आहे असे मला निक्षून इथे लिहावे वाटते. ह्याहून सुंदर आणि वाचनीय कविता असल्या तरी संवेदनशील माणसाने हि तुमची कविता निश्चित वाचावीच असा माझा आग्रह निश्चित असेल!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...