Tuesday, July 15, 2014

पांडुरंग रावो

आज विठ्ठलाचे, नाव सर्व मुखी
जगी सर्व सुखी, लोक झाले

भवदुःख सारे आज निमाले
पंढरी निघाले, वारकरी

धन द्रव्य दारा, विठु रखुमाई
जोडली पुण्याई, भक्तीरूपी

दाही दिशातून, भक्तीचे निर्झर
मुक्तीचा पाझर, चंद्रभागा

विसरला लोभ, विसरला मोह
आनंदाचा डोह, पांडुरंग

पाहिले डोळिया, पांडुरंग रावो
आता नेत्र जाओ, मिटूनिया
==================
सारंग भणगे. (जुलै २०१४)
 

Saturday, July 5, 2014

नमन

नमन कर धरोनी ज्ञानवंतास माझे
चरण कमल स्थानी शीर ठेवीन माझे


चिर अमरचि होतो ज्ञान ज्याला मिळे तो
परम अढळ स्थानी फक्त ज्ञानीच जातो


विकल विफल होता धीर त्याचा खचेना
चिवटपण मनाचे सोडतो जो कधी ना


मदन दमन केल्यावीण विद्या न लाभे
विषय क्षय न होता ज्ञान होई न जागे


अवखळ मन वारू संयमाने धरी जो
सफल सहज होतो साधना आचरी जो


अथक परिश्रमाने ज्ञानप्राप्ती नखाची
विकट बिकट आहे वाट ज्ञानार्जनाची


अविरत रत अभ्यासात मेधा जयाची
दवडत क्षण नाही शारदा फक्त त्याची


ढग जल भरलेले ज्ञानवंताप्रमाणे
उचितचि उपमा ही ज्ञान पाण्याप्रमाणे


बहुजन उदकाचा थेंब एकेक जैसे
महद् उदधि ज्ञानी सर्व लोकास भासे


जन चिखल सभोती त्यात ज्ञानी विभूती
विमळ कमळ जैसे शोभते सर्वभूती


सुमन गमन ज्याचा छंद मोठा विलासी
भ्रमरचि असतो तो ग्रंथपुष्पाभिलाषी


धवल सुयश किर्ती काय सांगू तयांची
गगन झुकुन ठेवी शीर त्यांच्या पदाशी
=========================
सारंग भणगे. (जुलै २०१४)

Sunday, June 22, 2014

आठवते का काही

सुन्न मनाने बसलो असता कानी आले काही
कोण म्हणाले कुणास ठावे, 'आठवते का काही?'
क्षणचित्रांचा पडदा झर्रकन डोळ्यापुढून गेला
डोळे मिटुनी मलाच पुसले... 'आठवते का काही?'
-----------------------------------------------------

तलम धुक्याच्या शालीमध्ये ओलेत्या अंगाने
हुळहुळणाऱ्या वाऱ्याच्या अन गोड मृदू स्पर्शाने
शहारलो होतो दोघेही आठवते का काही
                                                   
ओठांचा मी चंबू करूनी शीळ वाजवित जाता
तू ओठांना दुमडून घेई स्मित लाजरे फुटता
चुंबन त्यांचे असे घेतले आठवते का काही

मुकेच बसलो धुके पांघरून ऊंच कड्याच्या काठी
गहिवर होते मनात, होती दरीत दहिवर दाटी
मुके राहुनी किती बोललो आठवते का काही       

जरा चुकीचे वळण घेतले, धुंद मनाने जेव्हा
चमकून होते मला बघितले प्रश्नांकित तू तेव्हा
त्या वळणावर देऊळ होते आठवते का काही     

तुझ्या पापण्या झुकल्या होत्या नेत्रकडांना पाणी
हळवी असली प्रिती अपुली आठवते का राणी
डोळ्यांची भाषा आताशा आठवते का काही

हुरहुरण्याची मजा आगळी छंद असे झुरण्याचे
प्रितीमध्ये देऊन सारे पुरूनही उरण्याचे
कुरकुरण्याचे कारण तेव्हा आठवते का काही

तू जाण्याच्या जखमांनाही गंध फुलाचा येतो
रडता रडता त्या गंधाने थोडे हसून घेतो
वेडे होते मला म्हणाले आठवते का काही
मी ही वेडा त्यावर हसलो आठवते का काही
------------------------------------------------

ज्या गीताने पुन्हा उसवले गत-स्मरणांचे धागे
त्या गीताच्या वैभवास ये मुजरा करू या दोघे
किती प्यायले अमृत त्याचे..........आठवते का काही
=================================
सारंग भणगे. (२२ जून २०१४)

Sunday, May 18, 2014

आभाळ


तिचा मायेचा पदर, पर त्यालाही ठिगळ
फाटक्यानं कशी बरं झाके लाजेचं आभाळ

वरं आभाळ दिसतं तेच झालं घरा छतं
दहा दिशांचा संसारं तोचं झाला घरागत
जिण उघडं नागडं देणं देवाचं सगळं

कुठं कुठं शिवू आता सारं फाटलं आभाळ
कोरं कोरडं ठेवलं सटवाईनं कपाळ
सारं कोरडं तरीही गाली वाहतो ओघळ

देव आंधळा म्हणू कि त्याला दगडाचा म्हणू
त्याचे कटीवर हात त्याने वर केले जणू
त्याचं आभाळ कोरडं आम्हावरीच कोसळं
===========================
सारंग भणगे (१८ मे २०१४)

Monday, May 12, 2014

कृष्णा

घेत आहे सारखे ती नाव कृष्णा
द्रौपदीला वाचवाया धाव कृष्णा

खेळणे झाले पुरे हा माणसांशी
आंधळ्या कोशिंबिरीचा डाव कृष्णा

यादवीला टाळणे ना शक्य झाले
वाचण्याचा काय आम्हा वाव कृष्णा!

भारताला धर्म ग्लानी गाढ आली
अन् तुझाही झोपल्याचा आव कृष्णा

नाम-भक्ती सोड आता युद्ध कर तू
काय नाही हा अहिंसा-भाव कृष्णा!

सारंग भणगे. (2 मे 2014)

Thursday, April 17, 2014

ती मला अन मी तिला

कोण होते सोबतीला, ती मला अन मी तिला
वाळवंटी जीवनाच्या, ध्रूव ती मी काफिला

सोयरे सारेच आले द्यावयाला सांत्वना
ना दिला तो हात आम्ही एकमेकांना दिला

खेळ होता जीवनाचा चालला चोहीकडे
ज्यात नाही हार ऐसा डाव आम्ही मांडिला

पाठराखी खूप होते पाठशिवणी खेळले
आंधळ्या रात्री परंतू तूच धरले कंदिला


शेंदले पाणी जनांनी आपुल्या आडातले
तू तळाशी जीवनाचा ओघ बनुनी वाहिला
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Wednesday, April 16, 2014

नाते

तुझे माझे असे नाते जसे ओवी नि जात्याचे
पहाटेच्या दंवाचे अन् तृणाच्या लीन पात्याचे


सुगंधाचे तुझ्या कोडे कळाले ना कुणालाही
जळालो मी तरी राखेस 'तो' येतो; धुरालाही


तुझ्या गाण्याविना काही मला ऐकू न येऊ दे
मुका मी आंधळा होवो परी बहिरा न होऊ दे


नुरावी मी तरीही आपल्या मागे उरावी तू
जणू मी धूप होवोनी जळावे अन सुटावी तू


कधी माझ्यावरी कोणी रचावे काव्य शब्दांनी
मला वाचून जाणावे तुझ्या अर्थास सर्वांनी


अशी होतीस अस्तित्वात माझ्या तू मिळालेली
तुझ्या गर्भात मी, आत्म्यात माझ्या तू बुडालेली
================================
सारंग भणगे. (१६ एप्रिल २०१४)

Sunday, March 16, 2014

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या

तुझ्या सजलेल्या किती फुललेल्या
मनात स्मृतींचे थवे नभवर्खी
...
अता उरले ते उरी उललेले



मनावर ओझे अनावर झाले
उरी रुतलेले जणू शर होते
...
जसे मदनाचे तिच्या वळणांचे




जरा मरणाचे उरी भरलेले
कमी भय झाले जसे कळले की
...
मला सुख नाही तिच्या मिळण्याचे

 
मला मरणाचे असे सुख झाले
असे घडले की पुन्हा परतावे
...
कधी रडले ना, जरा रडले ते
==================
सारंग भणगे (डिसेंबर २०१३)

Saturday, January 25, 2014

सांजसंध्या

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले


चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती


हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे


दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता


समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा


भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती


खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते


निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते


जना मनास भावते कवीसही विभाव ही
निवांत सांज सावळून जन्मते विभावरी
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

Tuesday, January 21, 2014

राधा - २


प्रिय राधा,

 

कशी आहेस? कित्ती दिवसात तुझे पत्रच आले नाही! पाठवलेच नाहीस कि आपल्या post खात्याच्या कार्यक्षम कारभारामुळे मला मिळाले नाही! अर्थात तुला हे माझे पत्र मिळाले आणि त्याचे तू उत्तर लिहिलेस आणि ते मला पोहोचले तरच ते कळेल, नाही का.

 

मी तसा मजेत आहे. खरेतर ‘तसा’ हे चुकूनच लिहून गेलो. मी तसे लिहावयाला नको होते. मला कल्पना आहे कि तुला त्यातून काय वाटणार आहे याची. पण खरोखर सहज लिहिता लिहिता मी तसे लिहून गेलो गं! आत्ता माझ्याकडे पेनाचे खोडरबर देखील नाही, आणि ज्यावेळी हे पत्र लिहितो आहे त्यावेळी कुठली दुकानं उघडी असणार! तुला तर कल्पना आहेच माझी पत्र लिहायची वेळ!

 

नाही, ती वेळ बदलली नाही. बदलेल असेही वाटत नाही. आठवतंय, मी दिवसा तुला एक पत्र लिहिलं होतं, आणि मग त्याचं उत्तर येण्याऐवजी तूच घरी आली होतीस भेटायला इतक्या लांबून, मी आजारी वगैरे आहे का असे पाहायला. तुझं येणं आवडतंच गं, पण मी आजारी आहे का पाहायला आलीस, आणि मी आजारी नाही म्हटले तेव्हा कपभर चहाही न घेता निघून गेलीस............ते आवडलं नाही. म्हणूनच, ज्यावेळी कदाचित आकाशात चंद्रालाही झोप लागत असेल अशाच वेळी मी तुला पत्र लिहू शकतो! तसेही त्या चंद्राशिवाय, आकाशातल्या ताऱ्यांशिवाय, कळवळणाऱ्या काही जनावरांपेक्षा आणि माझ्या मनात तुझ्या विषयी उठलेल्या वादळांशिवाय आणखी ह्यावेळी कोण कुठे जागे असते!

 

sorry, हे देखील लिहून गेलोच! तुला सांगू, काही वेळा शब्द साथच देत नाहीत, आणि काही वेळा जणू पेनाला गळती लागल्यासारखे निबमधून ते झिरपत जातात जणू. निसरड्यावरून आपला पाय सटकतो ना तसा ह्या शब्दांचादेखील पाय घसरतो कधी कधी असेच वाटते.

 

असो! मी छान मजेत आहे. तू इतकी ओरडयाचीस म्हणून ऑफिसमध्ये वेळेत जायचा, मन लावून काम करायचा खूप प्रयत्न केला, करत असतो. पण तुला माहिती आहे ना, औषधाचा डोस एकदा दोनदा घेऊन चालत नाही. काही काही रोग असे असतात कि त्यांना वारंवार आणि सातत्याने औषध घ्यावेच लागते. पण काही काही दूरच्या गावांमध्ये कुठे दवाखाने आणि औषधाची दुकानं असतात! तिथले रोगी नाहीत का कधीतरीच औषध घेतात कुणी शहरा-बिहराकडून घेऊन आले तर, आणि मग जेव्हा औषध मिळत नाही तेव्हा खोकत राहतात; कण्हत राहतात! आपल्या देशात गरीबीच फार आहे बघ.

 

नवीन काय वाचते आहेस? म्हणजे तुला मिळत का वाचायला काही? आणि नाही मिळालं तरी काही बिघडत नाही गं. नुसती पुस्तकं वाचून कुणी मोठं होत का? पुस्तकी किडे होतो आपण. मी देखील हल्ली अजिबात पुस्तकं वाचत नाही............पहाटेपर्यंत! हं! झोपेचं माझं पहिल्यापासून तसं वाकडंच, तुला तर माहितीच आहे. मग त्याची कशाला काळजी करायची उगाच. अग काही काही माणसांना झोप कमी चालते; पुरते. मग रात्री फक्त रातकिड्यांच अद्भुत संगीत ऐकत बसण्यापेक्षा बसतो आपला काहीतरी पुस्तकाची पान उघडून, त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

 

काळजी करायचीच झाली तर ह्या कडाक्याच्या थंडीत डांबराच्या निगरगट्ट रस्त्याच्या कडेला कुत्र्यासारख झोपणाऱ्या त्या भिकाऱ्यांची करावी किंवा धरणामध्ये जमीन बुडालेल्या; आतड्यात फक्त पीळच उरलेल्या; सरकार दरबारी हक्काचा मोबदला मागण्यासाठी कित्येक कोस चालत तालुक्याच्या गावाला आलेल्या शेतकऱ्याची करावी, नाहीतर ....................

 

म्हणूनच मी तुला पत्र लिहित नाही! लिहायला घेतलं कि काहीतरी भलत-सलतच लिहितो जातो. जिथे सलतंय तिथे असंच होत कि काय कोण जाणे! राधे, सोलवाटलेल्यानं विव्हाळायचही नाही का गं!

 

असो, माझ्या जखमांच रक्त हळूहळू माझ्या शाईत उतरायला लागलं आता बहुदा. ते वाचून तुझ्या डोळ्यात अश्रुंच रक्त तरारेल. म्हणून इथेच थांबतो आता!...............पुन्हा उद्या लिहीनच ना तुला पत्र, ह्या रात्रीला तांबडं ढुशी द्यायला सुरुवात करायच्या वेळी!

 

आणि हो, सर्वात महत्वाचं राहिलंच कि! अग बाई, लवकरात लवकर जरा तुझा पत्ता कळव कि!

 

सारंग
Related Posts Plugin for WordPress, Blogger...