Monday, June 30, 2008

संग

स्पर्श स्मरता तुझा कांती शहारून उठते,
दवांत नाहलेली कळी बहरून खुलते
चमचमती चान्दणी ही चन्द्र चोरून बघते,
मधात माखलेली रात्र मोहरून उरते।

शून्य ह्रुदयाताही आहे तुझीच आस,
सांजवा-यातही वाहे तुझाच श्वास
नि:श्वास धुंद माझे गई तुझाच ध्यास।

मनात मावलेल्या मालवतात आशा,
सांजेत सजलेल्या सलतात दिशा
विराण विरघळते व्याकुळ निशा,
उरात उलते उन्हाळ उषा।

खुल्या नभात काही तारका सांडलेल्या,
खुळ्या मनात काही आशा मांडलेल्या
वेड्या वनात काही वाटा जोडलेल्या,
तूच तनुत काही रेघा ओढलेल्या।

वैशाख विरहात वाहे थेंब आसवांचे,
भलत्या रुतूत का हे मेघ पावसांचे
तुलाच अविरत पाहे पंख पाखरांचे,
शल्य मनात राहे झडत्या पिसांचे

तुझ्या विराहातच ही रात्र सरणार का?
साद घातलेली वांझ विझणार का?
आग अंगाताच ही सांग मरणार का?
शन्ढ रात्रीत हे न्यून उरणार का?

कापूस पिंजलेले अंग उसवून टाक,
अंगात बांधलेली आग निववून टाक
बाहूत गुंतलेली काया भिजवून टाक,
अतृप्त पेटलेली तृष्णा विझवून टाक.

Sunday, June 29, 2008

अशोक.

थांब अशोक, क्षणभरच थांब. काही क्षण तरी, अर्धा भारतवर्ष ज्या टाचांखाली तू आणलास, त्या तुझ्या अश्रांत पायांना लगाम घाल. हां माझा आश्रम तुझ्या दैदीप्यमान अस्तित्वाने काही क्षण वैभावांकित कर, असे मी तुला आवाहन करतो।

आहाहा! तुझ्या तेजस्वी मुखमन्डलावरचे वीरोचित भाव तुझ्या दिग्विजयी सेनेला सतत स्फूर्तीदायी वाटत असतील. तुझ्या विशाल भाळावर अवकाशाताल्या गृह-तार्याँनी यशाच्या रेषा किती स्पष्टपणे रेखाटल्या आहेत. तुझ्या समर्थ भुजा भारतावर्शातील कितीतरी नरेशांना भयकंपित करून सोडत असतील; अन् तुझ्या नजरेतला विजयोन्माद तुझ्या धन्य मातेस पुत्राभिमानाचे भरते आणत असेल. अर्ध्याहून अधिक भारतवर्ष ज्याच्या अंकित आहे, आणि तोच विजयध्वज घेउन तू संपूर्ण भारतवर्ष पादाक्रांत करायची उज्वल महत्वाकांक्षा बाळगत आहेस; त्या महापराक्रमी चक्रवर्तीस आशीर्वचन करताना मलाच किती धन्यता वाटत आहे. माझ्या तपस्येतून मला प्राप्त झालेले तप:सामर्थ्य तुझ्यासारख्या नरवीरांस अर्पण करताना मला कोण आनंद होइल म्हणून सांगू!

हे नृपश्रेष्ठा, तुझ्या डोळ्यातला विजयोन्माद; तुझ्यातला अदम्य आत्मविश्वास उत्तुंग महत्वाकान्क्षेचीच साक्ष देतोय. तुझ्या अतृप्त खड्गाची धार शत्रुवर विद्द्युल्लतेप्रमाणे कडाडत असेल; तेव्हा तुझ्या शत्रुन्च्या हृदयातून मृत्युभयाचा काळसर्प सळसळत जात असेल।
तुझ्या अणकुचिदार बाणांच्या अचूक वेधान शत्रूची छाती छिन्नविछिन्न होत असेल। तुझ्या रणावेशापुढे या भारतवर्षातील कित्येक महान वीर, योद्धे अन् नरेश नतमस्तक होउन तुला शरण आले असतील. तुझा दुर्दम्य उत्साह, तुझ्या सेनेमध्ये उत्तेजनाच्या लाटा निर्माण करीत असेल; अन् निधड्या छातीने शत्रुच्या प्राणान्चा ठाव घेण्यासाठी त्यांची अमोघ शस्त्रास्त्र तळपत असतील. तुझ्या अक्षुण्ण तख्ताखाली ग्रहांनादेखिल तुझ्या विजयपथाची मान्डणी करावी लागत असेल, असा तुझा दरारा आहे।
एखाद्या वनराजान एकाच पंज्याच्या वारान निरागस हरणाच्या गर्दनीचा घोट घेउन त्यास निष्प्राण कराव; तस हे नरशार्दुला, तू तुझ्या आक्रमणान कित्येक नृपमृगांची मृगया केलीस. उंच पर्वताच्या कड्यावरून उन्मत्तपणे कोसळणा-या पाण्याच्या विशाल प्रपातामध्ये दगड, धोंडे, ओंडके फुटून जातात; चक्काचूर होतात; वाहून जातात, तसे तुझ्या विशाल सेनेच्या प्रलयापुढे तू तुझ्या कित्येक शत्रूंना खड़े चारलेस.हे राजा, तुझ्या रणनीती कौशल्यान अन् युद्धचातुर्यान विवंचनेत सापडलेल्या कित्येक शूरातिशूर शत्रुंनादेखिल तुला शरणागत येण्यास भाग पाडणा-या तुझ्या अद्वितीय युद्धनैपुण्यान कित्येक थोरातिथोर रणधुरंधरही अचंबित होतात.
रणचंडी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुझा विजयध्वज दिसू लागताच प्रत्यक्ष काळदेखिल तुझ्या विजयाच्या रणदुन्दुभि वाजवू लागतो। तुझ्या दिग्विजयाचा कृतनिश्चय असाच अढळ राहो; परमभक्त अर्जुनाच्या मनातही संभ्रमाच्या कोळ्यान जाळ विणल की, जे तोडण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या रथाचे वेग हाती धरून, भग्वद्गीतेची ज्ञानगंगा उद्धृत करण्याचे कष्ट घ्यावे लागले. अर्जुनाचे मन निरभ्र करण्यासाठी गुह्यज्ञान सांगावे लागले; आपल्या परमस्वरूपाचे दर्शन घडवावे लागले.
परंतु तुझ्या मनास संभ्रम शिवला नाही; की तू धर्मा-अधर्माचा विचारही केला नाहीस।
असा चमकून बघू नकोस........... सत्यावर कितीही पांघरूण घातलेस तरी ते लपत नाही. सुर्याला आपल्या हातांनी झाकायाचा प्रयत्न केल्यान तो तुझ्या नजरेआड जरुर होइल, परन्तु अवघी सृष्टी त्याच्या तेजान लख्ख प्रकाशित असते, हे तू विसरला आहेस कसा? राजा, विजयोन्मत्त होउन तुझ्यातला विवेक तू मारून टाकलास म्हणून ज्या जगड्व्याळ यम-नियमांनी ही सृष्टी बांधली आहे, ती तू दुर्लक्षित करू शकत नाहीस.हे राजा, जी रणधुमाली तू उठवली आहेस, त्यात तुला रणवेदीवर चढलेल्या बळीन्चे आर्त टाहो ऐकू येत नाहीत काय? तुझ्या महत्वाकांक्षेचा मत्त हत्ती कित्येक निष्पाप जीवांना निष्कारण चिरडत जात आहे, याची किंचितमात्र जाणीवही तुला झाली नसावी याचे मला आश्चर्यच वाटते. तुझ्या सामर्थ्याच्या गर्वात तू कित्येक अश्राप जीवांचा, प्राणीमात्रान्चा प्राण हरण केल्याची पुसटशी जाण तुला आहे का? तुझ्या विजयाचे ढोल बडवण्यात गर्क असल्याने तुला बेघर, अनाथ व पोरके झालेल्या सहस्त्रावधि बाया-बापड्यांच्या किन्काळ्या ऐकू आल्या नाहीत काय? स्मशानात जळणा-या शेकडो-सहस्त्र चितांच्या अग्निजीव्हा तुला गिळण्यासाठी 'आ' वासून उभ्या आहेत, हे तुला दिसत नाही का? तुझ्या विजयोत्सवात ज्यांच्या रक्ताच्या लाल रंगांची उधळण केली, त्याच रक्तान तुझ्या भाळावर तिलक ओढलाय; त्या रक्तरंजित यशाच ओझ वागावाताना तुला कष्ट होत नाहीत याच मला कौतुकच वाटत.
राजा, तू आरंभीलेला हां युद्धयज्ञ सहस्त्रावधि नर-पशूंचे हकनाक बळी घेत आहे. तुझ्या नृशंस शत्रुनिर्दालानान तुझे राज्य खचित नि:शत्रु होइल असा तुझा समाज असेल; परंतु ज्या युद्धाग्निने तू देशच्यादेश भस्मसात करत चालला आहेस; त्याच्या गगनचुंबी अग्निशिखा तुला अन् तुझ्या कित्येक भावी पिढ्यांना 'स्वाहा' केल्याशिवाय राहणार नाही. ज्या सर्पास तू दूध पाजून तुझ्या शत्रुंना दंश करण्यासाठी मोठे केलेस, त्या सर्पाची कित्येक पिल्ल तुला डसणार नाहीत आशा भ्रमात राहू नकोस. जे रक्ताचे पाट तू वाहवलेस, तेच तुझा महालही रक्तरंजित करतील.
ज्या युद्धाच्या वेदीवरती तू सहस्त्रावधी नरमुन्डावळ्या अर्पण केल्यास, ती वेदी सदैव अत्रुप्तच राहणार हे तू विसरलास काय? जे विश्वविजयाचे अमृत शोधण्यासाठी तू हां युद्धाचा सागर घुसळलास, त्यातून बाहेर पडलेल विष पचवायची ताकद तुझ्यात आहे काय? तू भावी पीढ्यांसाठी रक्तरंजित पावलांचे माग सोडतो आहेस, यातून तुझ्या भावी पिढ्या ही वाचतील काय?

Saturday, June 28, 2008

असे व्हावे!

घनतमी या अवसनभी, शुभ्र चांदणे चुकून हसावे.

उदास आर्त व्याकुळ नयनी, प्रसन्नतेचे स्मित दिसावे।

निष्पर्ण रित्या झाडावरती, नवी पालवी जशी फुटावी,

नि:शब्द गूढ़ अधरान्वरती, आनंदाची लाकर उठावी।

विराण उभ्या वाटेवरती, तिन्ही सान्जेने रंग भरावे,

मरगळलेल्या प्राणान्मधुनी, चैतन्याचे मंत्र स्फुरावे.

नाही

ओल्या भावनांनी पोट भरणार नाही,
ओल्या लाकडान्नी चूल पेटणार नाही।

धुंद रात्रीची नशा जरी सरणार नाही,
भय उजाड़ दिवसांचे परी उतरणार नाही।

चिंब पावसात भिजणे विसरणार नाही,
छत मेघांचे परी घरास पुरणार नाही।

पिठुर चांदणे ते उरी सलणार नाही,
पेटत्या उन्हात कांती काय जळणार नाही?

गंधात धुंद होणे जरी टळणार नाही,
चक्र संसाराचे असे पळणार नाही।

किलबिल पाखरांची कान किटणार नाही,
चिंता व्याकुळ उदाराची अशी मिटणार नाही।

दवात सान्द्र पाने मुकी राहणार नाही,
सुक्या भाकरीने भूक भागणार नाही।

ओल्या भावनांचा बाजार चुकणार नाही,
माझ्याविण गावचा परि बाजार थांबणार नाही.

आग

कवितेचा मी बाजार मान्डतोय,
आतड्यातील खळगी भरण्यासाठी,
हृदयातल्या ठिणगीने,
पोटाची आग शमवण्यासाठी.

'जगावेगळ्या वाटा'

त्यजुन स्वप्नांच्या तारका,
आज मी आसमंत कवळायला निघालोय,
सूर्याच्या तप्त किरणांचा दाह,
शीतल वाटावा खचित,
अशा अजाण मरुभूमीच्या ह्रुदयात
माझ्या हृदयातील आग अजूनही चेतवण्यासाठीशिरतोय।
असतील जगासाठी या 'जगावेगळ्या वाटा',
पण कुजत चाललेल्या त्या शरीरान्ना,
झडत चाललेल्या त्या बोटांना,
शिणत चाललेल्या त्या मनांना,
मला गच्च मीठी मारयचीय।
माझ्यातल्या भितीच्या सावल्यांना,
त्या मिठीतच गुदमरून मारायचय।
आणी पुन्हा एकदा त्या न गवसणार्या क्षितीजाच्या मागे धावायचय।
त्यांच्या प्रत्येक जीवंत अश्रुतूनमला एक जीवनाचा झरा निर्माण करायचाय।
अन् त्यांच्या कोरड्या कांतीलाआयुष्याचा स्पर्श करायचाय।
ही जर असेल जगावेगळी वाटतर हे अनंता,
या वाटेवरती आयुष्य उधळून टाकायची ताकद दे,
अन् अन्धारणार्या या जगावेगळ्या वाटेला
उद्याच्या सकाळ्ची चाहूल दे।

___________________________________________________________________

चल; उठ!

या लांबच लाम्ब वाळवन्टावर,

आपल्या पावलांची,

एक लांबच लाम्ब रेघ ओढू।

मागून येणार्यांना

ही 'जगावेगळी वाट' सोडू!

Thursday, June 26, 2008

नव नव

एकदा एक जखमी पारवा उड़ता उड़ताच कोसळला।
गिरक्या घेत पिम्पळाच्या पारावार आदळला।
झाडही थरारल, मायेना शहारल।
हिरव्या पानातून दवाच पाणी पाझरल।
कण्हतच म्हटला पारवा "काय दोस्तहो, बरय ना?"
पानांनी आपसूकच पुसला "मित्रा, फार दुखतय ना?"
चोचीच्या ओठातून हसत म्हटल पारव्यान"दिल आयुष्य देवान अविरत उडण्यासठी,
दोनच पंखात अवघ क्षितीज पेलण्यासाठी,
दिल बळ पंखात, पण नाही दिल अम्रुताच वरदान।"
ऐकून ते हसल, नुकतच झडणार पिकल पान,
न झेपणार दुःख असच झाडून टाकायच असत,
जीवनाच्या झाडावर नव्या पालावीला जगावायच असत.

Wednesday, June 25, 2008

वर्षा

आषाढाला फुटला कंठ
नाद घुमला मेघांचा
झिम्मा खेळे वीज
वाजे ढोल ढगांचा।

रंग लेउनी बरवे
इंद्रधनू नाहिले
पंख घेउनी सवे
वायुदूत वाहिले।

वाहूनी शतशत जलाम्बू
मेघफ़ळे रसरसली
ऋतूऋतूंची ऋतुराज्ञि
वर्षाराणी सरसरली.

युद्ध सुरु आहे


कारगिल war च्या नंतर सुचलेली कविता:

बिळात लपुनी डंख मारतो जो शत्रु आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

शत्रूला या वेसण घालू अंकुश ठेऊ माथी,
शिर उडऊ या सत्वर त्याची फोडून ताकू छाती।
सीमेवरती ज्यांची आपुल्या दृष्टी वक्र आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

संगीनीच्या जिव्हल्या झाल्या रक्त पिण्या आतुर,
वधस्तंभ हे रक्तपिपासु भासे अति भेसूर।
यामदूताचा महिष इथला शुभंकर आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

संगीनीशी संग सांगते संहारक संगर,
रक्ताच्या रंगात रंगती रोमांचित रंध्र।
शुभ्रधवल या हिमशिखरांना जो घेरु पाहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

घंटानाद करे यमदूत तमा न कोणा त्याची,
नश्वर जीवन फुंकून टाकू आस ना त्याची।
मृत्यूचे पडघम ऐकता उसळत रुधिर आहे।
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

पेटली पाने पेटली राने पेटली सारी जनता,
वडवानल होऊ पिउन टाकू पापाची लंका।
प्रमत्त प्रकामी पापाची हीच अखेर आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।

भेदाल काशी लेकुरे या अखंड मातेची,
असेल भिन्न काया परी आत्मा वसे एकचि।
धर्मद्वेश या भूमिमध्ये जो पेरू पाहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२).

Sunday, June 22, 2008

कविता

शब्दस्पर्शी स्पंदनांनी,
भावनांचे चांदणे खुलते.
नील विभोर मनाकाशावर,
काव्यरंगी धनु उमलते.

नादलयींच्या बरसातीतून,
गीतसुमनांच्या बहरती पंक्ती.
उत्कट गहिर्या शब्दांमधूनी,
काव्यरत्ने उधळती मोती.

स्वछंदमनी भ्रमण करती,
रंगबिरंगी काव्यपखरे.
आनंदाच्या लहरींवरती,
शब्दगंधित विहंगम वारे.

पिसाट कुठल्या रानामध्ये,
शीळ घुमाते कवीतेची।
उजाड़ उनाड माळरानी,
उठती पाउले सवितेची।

निळ्या नभी ती मेघगर्दी,
मनात दाटे कसली गदगद,
कव्याश्रुंचे ओघळ भुईवर,
लखलख वैखरी करी निनाद.

सान्ज्वेड्या व्याकुळ मनी,
रंग ल्याते सावळी कविता,
चाहूल येता अंधाराची,
शब्दाग्नीने पेटतो पलीता।

गर्दगहिर्या रात्रप्रहरी,
पश्चिमवारा नाचत आला,
शुक्रकान्क्षी काव्यरतीवर,
भावदेव तो लुब्ध झाला।

भावरुतू हा सजतो नटतो,
वनीमनी दाटे गहिवर,
काव्यतनुवर चढते यौवन,
श्रुन्गारातून या मनोहर।

कवितेच्या श्रुंगारास या,
पवित्रतेची असते झालर।
भावार्थी उजळे काव्यदिपिका,
शब्दांचे अन् तेजोपझार.

ज्ञानेशाने गावी ओवी,
तुका घाली अभंगस्नान।
कबीर दोहे उत्कट गाई,
कवितेचे हे अमरगान.

मीरा छेडती एकतारी,
नाथ गातो चपखल भारुड।
भावगर्भी तळमळ घेउन,
समाजमनी अवखळ आसूड़।

मायाभूच्या विरहातूनी,
भावसागारा शपथ घातली।
पवित्रचरणी काव्याभिषेक,
'वन्दे मातरम्' मंगल झाली.

मांगाल्याच्या पूर्ण मुहूर्ती,
प्रतिभेची पहाट होते.
कवितेच्या शिवालयातून,
ओंकार ध्वनिची आरती होते।

गझल

उन्हातल्या त्या पावसाला दु:ख माझे कळले कसे?
ओठ ओले बोलले की बोलले आसवांचे ठसे.

चिम्ब ओल्या पाखरांनी साधला हा डाव नवा,
झाडले ना पंख त्यांनी झडली ना ती पिसे.

ढाळले चितेवरी मूक अश्रु आज का?
सांधलेले श्वास होते उसवलेले अन् उसासे.

काल काळ्या कातळावर कावळ्यान्ची काक सभा,
पिंड शिवण्याचे का त्यांनी घेतले मूक वसे?

त्या पहाटे वायूसंगे मेघ आले भरुनी नभी,
झाकोळला तेजोनिधी सुटले खट्याळ कवडसे.

अशीच एक मित्राची कविता!

तू फ़टकळ वावटळ

तू अवखळ ओघळ

तू रानातली करवंद

पण

तू चिखलातल अरविंद.

तू हवेत मस्त उडणारा पतंग

तू भिरभिरणारा सारंग.

तू अवघड घाट

तू नागमोडी वाट

तू ओथंबलेली लाट

पण तुझी मैत्री दाट.

Saturday, June 21, 2008

कसा?

ही शांत तू अशी हां शांत मी असा
चांदणे थंड जरीही वारा निवांत कसा?

सांग तुझ्या ओठातूनी वेचू का भावनांना
न फ़ुलणारा असा हां प्रांत कसा?

आताशीच चन्द्र हा आला नभी तरीही
चेहरा हां असा तुझा श्रांत कसा?

नभदीप माळून आली अंगणात आज माझ्या
काळोख दाटला आहे माझ्या मनात कसा?

सुकले अजून नाही पंख या पाखरांचे
क्षणात उठला असा हां आकांत कसा?

घेउन आज आलो आशा सिकन्दराच्या
शस्त्र उठण्या आधीच जाहलो भ्रांत कसा?

गावचा पोर कुणी का पुरात वाहून गेला
हजार माणसांचा असा एकांत कसा?

नको दाबुस हुंदके साठलेले
नको विचारुस मला मी अशांत कसा?

करतील काय कधी सावल्या कुठला गुन्हा
काजव्यांनी आरोप केला खोटा धाधांत कसा?

मैत्री

शीतल पाण्यान
इवलस रोपट कस छान बहरत जात,
चान्दण पांघरून झोपलेल
छोटस फुल
पहाटेच्या मऊ उन्हात न्हाउन कस
छान फुलत;
अन् तुझ्या निरागस निखालस मैत्रीत
माझ मन कस मोहरून निघत.
कितीदा माझ्या ओथंबलेल्या डोळ्यातले
पाणी टिपलेस;
अन् कितीदा तरी मी दाबलेले हुंदकेतूच गिळलेस.
कितीदा माझ्या शुष्क मनावर
प्रेमाचे चांदणे शिम्पलेस,
अन् कितीदा अनोळखी वाटान्वर
तुझ्या पावलांचे माग सोडलेस.
ज्या ढगांनी गर्दी केलेल्या काळ्या आकाशात
तू नेहेमीचे आनंदाचे रंगीत इंद्रधनुष्य चितारलेस,
ती तुझी अव्यंग मैत्री अभंग रहावीअशी इच्छा करते........

Saturday, June 14, 2008

करम की गति न्यारी..

वस्तीत काजव्यांच्या सूर्यास म्हणती चोर,
हंसास हसती सारे हे कावळे मुजोर.

चित्कार चातकांचे ग्रीष्मात वीरून जाती,
चान्दण्यास महाग झाले बंदिस्त हे चकोर.

मारीत मिटक्या खाती प्रेतास ही गिधाडे,
गरुडास पिंजर्यात डाळीम्ब आणी बोर.

हां आव चिंतानाचा आहे जुनाच तरीही,
बगळ्यास फसती सारे मासे लहान थोर.

गाउनी कोकिळा ही मिळ्वी कौतुकही,
रानात राबणारे काय दिसती न ढोर?

प्रादेशिक पोपटान्ची ही संतप्त सभा,
ठराव मोडण्याचे आकाश हे विभोर.

उघड्या वनात करती सारेच प्राणी शोक,
मेघास आळविता नाचूं थकले मोर.

Saturday, June 7, 2008

झंझावात

थोडयाच पवालांची आपुली साथ होती,
पुढे कुणी विराणी उगाच गात होती।

झुलवी उगा कशाला झोका उन्मत्त वारा,
सवय हिंदोळ्यांची नुकतीच जात होती।

शब्द ओठात होते, लावण्य वैखारीचे,
शब्द नि भावानांची अंतिम रुजवात होती।

टाक पुसून ओल्या नेत्रकाडा पाणावल्या,
कधी न संपणारी एक सुरुवात होती।

घे आवरून बटा त्या केसांच्या नागमोडी,
वाटली झुळूक तुला जी, एक झंझावात होती।

Sunday, June 1, 2008

प्रेम

प्रेम की एक शर्त होती है,
की प्रेम की कोई शर्त न हो।
प्रेम का एक अर्थ होता है,
की प्रेम में कोई 'अर्थ' न हो।



Related Posts Plugin for WordPress, Blogger...