Saturday, June 28, 2008

नाही

ओल्या भावनांनी पोट भरणार नाही,
ओल्या लाकडान्नी चूल पेटणार नाही।

धुंद रात्रीची नशा जरी सरणार नाही,
भय उजाड़ दिवसांचे परी उतरणार नाही।

चिंब पावसात भिजणे विसरणार नाही,
छत मेघांचे परी घरास पुरणार नाही।

पिठुर चांदणे ते उरी सलणार नाही,
पेटत्या उन्हात कांती काय जळणार नाही?

गंधात धुंद होणे जरी टळणार नाही,
चक्र संसाराचे असे पळणार नाही।

किलबिल पाखरांची कान किटणार नाही,
चिंता व्याकुळ उदाराची अशी मिटणार नाही।

दवात सान्द्र पाने मुकी राहणार नाही,
सुक्या भाकरीने भूक भागणार नाही।

ओल्या भावनांचा बाजार चुकणार नाही,
माझ्याविण गावचा परि बाजार थांबणार नाही.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...