शब्दस्पर्शी स्पंदनांनी,
भावनांचे चांदणे खुलते.
नील विभोर मनाकाशावर,
काव्यरंगी धनु उमलते.
नादलयींच्या बरसातीतून,
गीतसुमनांच्या बहरती पंक्ती.
उत्कट गहिर्या शब्दांमधूनी,
काव्यरत्ने उधळती मोती.
स्वछंदमनी भ्रमण करती,
रंगबिरंगी काव्यपखरे.
आनंदाच्या लहरींवरती,
शब्दगंधित विहंगम वारे.
पिसाट कुठल्या रानामध्ये,
शीळ घुमाते कवीतेची।
उजाड़ उनाड माळरानी,
उठती पाउले सवितेची।
निळ्या नभी ती मेघगर्दी,
मनात दाटे कसली गदगद,
कव्याश्रुंचे ओघळ भुईवर,
लखलख वैखरी करी निनाद.
सान्ज्वेड्या व्याकुळ मनी,
रंग ल्याते सावळी कविता,
चाहूल येता अंधाराची,
शब्दाग्नीने पेटतो पलीता।
गर्दगहिर्या रात्रप्रहरी,
पश्चिमवारा नाचत आला,
शुक्रकान्क्षी काव्यरतीवर,
भावदेव तो लुब्ध झाला।
भावरुतू हा सजतो नटतो,
वनीमनी दाटे गहिवर,
काव्यतनुवर चढते यौवन,
श्रुन्गारातून या मनोहर।
कवितेच्या श्रुंगारास या,
पवित्रतेची असते झालर।
भावार्थी उजळे काव्यदिपिका,
शब्दांचे अन् तेजोपझार.
ज्ञानेशाने गावी ओवी,
तुका घाली अभंगस्नान।
कबीर दोहे उत्कट गाई,
कवितेचे हे अमरगान.
मीरा छेडती एकतारी,
नाथ गातो चपखल भारुड।
भावगर्भी तळमळ घेउन,
समाजमनी अवखळ आसूड़।
मायाभूच्या विरहातूनी,
भावसागारा शपथ घातली।
पवित्रचरणी काव्याभिषेक,
'वन्दे मातरम्' मंगल झाली.
मांगाल्याच्या पूर्ण मुहूर्ती,
प्रतिभेची पहाट होते.
कवितेच्या शिवालयातून,
ओंकार ध्वनिची आरती होते।
No comments:
Post a Comment