कारगिल war च्या नंतर सुचलेली कविता:
बिळात लपुनी डंख मारतो जो शत्रु आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
शत्रूला या वेसण घालू अंकुश ठेऊ माथी,
शिर उडऊ या सत्वर त्याची फोडून ताकू छाती।
सीमेवरती ज्यांची आपुल्या दृष्टी वक्र आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
संगीनीच्या जिव्हल्या झाल्या रक्त पिण्या आतुर,
वधस्तंभ हे रक्तपिपासु भासे अति भेसूर।
यामदूताचा महिष इथला शुभंकर आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
संगीनीशी संग सांगते संहारक संगर,
रक्ताच्या रंगात रंगती रोमांचित रंध्र।
शुभ्रधवल या हिमशिखरांना जो घेरु पाहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
घंटानाद करे यमदूत तमा न कोणा त्याची,
नश्वर जीवन फुंकून टाकू आस ना त्याची।
मृत्यूचे पडघम ऐकता उसळत रुधिर आहे।
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
पेटली पाने पेटली राने पेटली सारी जनता,
वडवानल होऊ पिउन टाकू पापाची लंका।
प्रमत्त प्रकामी पापाची हीच अखेर आहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२)।
भेदाल काशी लेकुरे या अखंड मातेची,
असेल भिन्न काया परी आत्मा वसे एकचि।
धर्मद्वेश या भूमिमध्ये जो पेरू पाहे,
त्या शत्रुशी आमुचे युद्ध सुरु आहे (२).
No comments:
Post a Comment