Sunday, June 29, 2008

अशोक.

थांब अशोक, क्षणभरच थांब. काही क्षण तरी, अर्धा भारतवर्ष ज्या टाचांखाली तू आणलास, त्या तुझ्या अश्रांत पायांना लगाम घाल. हां माझा आश्रम तुझ्या दैदीप्यमान अस्तित्वाने काही क्षण वैभावांकित कर, असे मी तुला आवाहन करतो।

आहाहा! तुझ्या तेजस्वी मुखमन्डलावरचे वीरोचित भाव तुझ्या दिग्विजयी सेनेला सतत स्फूर्तीदायी वाटत असतील. तुझ्या विशाल भाळावर अवकाशाताल्या गृह-तार्याँनी यशाच्या रेषा किती स्पष्टपणे रेखाटल्या आहेत. तुझ्या समर्थ भुजा भारतावर्शातील कितीतरी नरेशांना भयकंपित करून सोडत असतील; अन् तुझ्या नजरेतला विजयोन्माद तुझ्या धन्य मातेस पुत्राभिमानाचे भरते आणत असेल. अर्ध्याहून अधिक भारतवर्ष ज्याच्या अंकित आहे, आणि तोच विजयध्वज घेउन तू संपूर्ण भारतवर्ष पादाक्रांत करायची उज्वल महत्वाकांक्षा बाळगत आहेस; त्या महापराक्रमी चक्रवर्तीस आशीर्वचन करताना मलाच किती धन्यता वाटत आहे. माझ्या तपस्येतून मला प्राप्त झालेले तप:सामर्थ्य तुझ्यासारख्या नरवीरांस अर्पण करताना मला कोण आनंद होइल म्हणून सांगू!

हे नृपश्रेष्ठा, तुझ्या डोळ्यातला विजयोन्माद; तुझ्यातला अदम्य आत्मविश्वास उत्तुंग महत्वाकान्क्षेचीच साक्ष देतोय. तुझ्या अतृप्त खड्गाची धार शत्रुवर विद्द्युल्लतेप्रमाणे कडाडत असेल; तेव्हा तुझ्या शत्रुन्च्या हृदयातून मृत्युभयाचा काळसर्प सळसळत जात असेल।
तुझ्या अणकुचिदार बाणांच्या अचूक वेधान शत्रूची छाती छिन्नविछिन्न होत असेल। तुझ्या रणावेशापुढे या भारतवर्षातील कित्येक महान वीर, योद्धे अन् नरेश नतमस्तक होउन तुला शरण आले असतील. तुझा दुर्दम्य उत्साह, तुझ्या सेनेमध्ये उत्तेजनाच्या लाटा निर्माण करीत असेल; अन् निधड्या छातीने शत्रुच्या प्राणान्चा ठाव घेण्यासाठी त्यांची अमोघ शस्त्रास्त्र तळपत असतील. तुझ्या अक्षुण्ण तख्ताखाली ग्रहांनादेखिल तुझ्या विजयपथाची मान्डणी करावी लागत असेल, असा तुझा दरारा आहे।
एखाद्या वनराजान एकाच पंज्याच्या वारान निरागस हरणाच्या गर्दनीचा घोट घेउन त्यास निष्प्राण कराव; तस हे नरशार्दुला, तू तुझ्या आक्रमणान कित्येक नृपमृगांची मृगया केलीस. उंच पर्वताच्या कड्यावरून उन्मत्तपणे कोसळणा-या पाण्याच्या विशाल प्रपातामध्ये दगड, धोंडे, ओंडके फुटून जातात; चक्काचूर होतात; वाहून जातात, तसे तुझ्या विशाल सेनेच्या प्रलयापुढे तू तुझ्या कित्येक शत्रूंना खड़े चारलेस.हे राजा, तुझ्या रणनीती कौशल्यान अन् युद्धचातुर्यान विवंचनेत सापडलेल्या कित्येक शूरातिशूर शत्रुंनादेखिल तुला शरणागत येण्यास भाग पाडणा-या तुझ्या अद्वितीय युद्धनैपुण्यान कित्येक थोरातिथोर रणधुरंधरही अचंबित होतात.
रणचंडी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुझा विजयध्वज दिसू लागताच प्रत्यक्ष काळदेखिल तुझ्या विजयाच्या रणदुन्दुभि वाजवू लागतो। तुझ्या दिग्विजयाचा कृतनिश्चय असाच अढळ राहो; परमभक्त अर्जुनाच्या मनातही संभ्रमाच्या कोळ्यान जाळ विणल की, जे तोडण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या रथाचे वेग हाती धरून, भग्वद्गीतेची ज्ञानगंगा उद्धृत करण्याचे कष्ट घ्यावे लागले. अर्जुनाचे मन निरभ्र करण्यासाठी गुह्यज्ञान सांगावे लागले; आपल्या परमस्वरूपाचे दर्शन घडवावे लागले.
परंतु तुझ्या मनास संभ्रम शिवला नाही; की तू धर्मा-अधर्माचा विचारही केला नाहीस।
असा चमकून बघू नकोस........... सत्यावर कितीही पांघरूण घातलेस तरी ते लपत नाही. सुर्याला आपल्या हातांनी झाकायाचा प्रयत्न केल्यान तो तुझ्या नजरेआड जरुर होइल, परन्तु अवघी सृष्टी त्याच्या तेजान लख्ख प्रकाशित असते, हे तू विसरला आहेस कसा? राजा, विजयोन्मत्त होउन तुझ्यातला विवेक तू मारून टाकलास म्हणून ज्या जगड्व्याळ यम-नियमांनी ही सृष्टी बांधली आहे, ती तू दुर्लक्षित करू शकत नाहीस.हे राजा, जी रणधुमाली तू उठवली आहेस, त्यात तुला रणवेदीवर चढलेल्या बळीन्चे आर्त टाहो ऐकू येत नाहीत काय? तुझ्या महत्वाकांक्षेचा मत्त हत्ती कित्येक निष्पाप जीवांना निष्कारण चिरडत जात आहे, याची किंचितमात्र जाणीवही तुला झाली नसावी याचे मला आश्चर्यच वाटते. तुझ्या सामर्थ्याच्या गर्वात तू कित्येक अश्राप जीवांचा, प्राणीमात्रान्चा प्राण हरण केल्याची पुसटशी जाण तुला आहे का? तुझ्या विजयाचे ढोल बडवण्यात गर्क असल्याने तुला बेघर, अनाथ व पोरके झालेल्या सहस्त्रावधि बाया-बापड्यांच्या किन्काळ्या ऐकू आल्या नाहीत काय? स्मशानात जळणा-या शेकडो-सहस्त्र चितांच्या अग्निजीव्हा तुला गिळण्यासाठी 'आ' वासून उभ्या आहेत, हे तुला दिसत नाही का? तुझ्या विजयोत्सवात ज्यांच्या रक्ताच्या लाल रंगांची उधळण केली, त्याच रक्तान तुझ्या भाळावर तिलक ओढलाय; त्या रक्तरंजित यशाच ओझ वागावाताना तुला कष्ट होत नाहीत याच मला कौतुकच वाटत.
राजा, तू आरंभीलेला हां युद्धयज्ञ सहस्त्रावधि नर-पशूंचे हकनाक बळी घेत आहे. तुझ्या नृशंस शत्रुनिर्दालानान तुझे राज्य खचित नि:शत्रु होइल असा तुझा समाज असेल; परंतु ज्या युद्धाग्निने तू देशच्यादेश भस्मसात करत चालला आहेस; त्याच्या गगनचुंबी अग्निशिखा तुला अन् तुझ्या कित्येक भावी पिढ्यांना 'स्वाहा' केल्याशिवाय राहणार नाही. ज्या सर्पास तू दूध पाजून तुझ्या शत्रुंना दंश करण्यासाठी मोठे केलेस, त्या सर्पाची कित्येक पिल्ल तुला डसणार नाहीत आशा भ्रमात राहू नकोस. जे रक्ताचे पाट तू वाहवलेस, तेच तुझा महालही रक्तरंजित करतील.
ज्या युद्धाच्या वेदीवरती तू सहस्त्रावधी नरमुन्डावळ्या अर्पण केल्यास, ती वेदी सदैव अत्रुप्तच राहणार हे तू विसरलास काय? जे विश्वविजयाचे अमृत शोधण्यासाठी तू हां युद्धाचा सागर घुसळलास, त्यातून बाहेर पडलेल विष पचवायची ताकद तुझ्यात आहे काय? तू भावी पीढ्यांसाठी रक्तरंजित पावलांचे माग सोडतो आहेस, यातून तुझ्या भावी पिढ्या ही वाचतील काय?

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...