Sunday, January 4, 2009

तृषार्त

काजळघोट अंधारात
मिणमिणती चिमणी
थरथरत्या ओंजळीत
पीवळं पीवळं पाणी

सुरुकुतल्या आसवांत
सुकलेला कोंब
उजाड शीवारात
उलट्या हाताची बोंब

नुसतं वाळवंट
अफ़ाट फ़ुटलेलं
निवडुंगाखाली
आभाळ दाटलेलं

गोठ्यातले बैल
घासतात खुरं
बामनाच्या ताम्हणास
फ़सतात गुरं

छपराचं फ़ुटकं खापर
रांजणाला चिरा
भावकितल्या आडात
शेवाळला झरा

चूल विझलेली
कवाची उपाशी
वाळक्या पोराला
गुंजभर लापशी

विहिरतळाशी बेडकं
मोकाट फ़िरतात
उताण्या मोटा
स्वप्नात झुरतात

ओशाळली पहाट
दमानंच उठते
किरणांच्या थारोळ्यात
डबकुले नटते

उर्मट ऊन्हाची
ऊठली काहिली
म्हाता-यानं दुपार
शेवटचीच पाहिली

म्हाता-याच्या तिरडीला
तेरडाही महाग
जळलेल्या देहाला
तहानेचीच आग.
===============================
सारंग भणगे (4 जानेवारी 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...