Wednesday, January 7, 2009

अंश



मी निघालो प्रकाशमार्गे
तीमिराचे तुम्हा किनारे
भक्ती हीच शक्ती माझी
अन्य साधना विना रे ।।१।।


भौतीकाचे शोध तुमचे
नवल तुम्हा विज्ञानाचे
आनंदाचा उपासक मी
शौक माझे अन् ज्ञानाचे ।।२।।


कर्म माझा धर्म आणि
धर्म माझ्या अंतरंगी
लक्षणांचे तुम्हा दिखावे
पाठपूजा सर्व सोंगी ।।३।।


युक्तीच्या सांगीन गोष्टी
अन् गीतेचे अध्यायही
व्यर्थ सारे कर्मच्युता
सांडिला जर स्वाध्यायही ।।४।।


घेतले जे कर्म हाती
तेच अर्पि ईश्वरासी
जिंकले त्या मानवाने
ऐहिकाच्या नश्वरासी ।।५।।


स्वाध्यायान्मा प्रमदः
कृण्वन्तु विश्वमार्यम्
सर्वेSपि सुखिनः सन्तु
अमृतस्य पुत्रोSहं ।।६।।


दीव्यशलाका घेऊनी या
उजळु अवघे नभोमंडल
स्वकर्माचे आज्य अर्पुनी
उत्थानाचे चेतवु स्थंडिल ।।७।।


समाजसागर घुसळुनिया
भक्तीक्रांतीचे क्षीरमंथन
अनंताच्या असीम वक्षी
प्रेमाचे अनाहत स्पंदन ।।८।।


युगात्म्याच्या ह्रन्मालेतील
अंश मिळावा स्पंदनाचा
रजःकण अमुचे जीवन त्यांचा
देह झाला चंदनाचा ।।९।।
===============================

सारंग भणगे. (7 जानेवारी 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...