नवीन भारत असा घडवु
सुवर्ण मुकुटी माणिक मढवु
भूमातेच्या चरणांवरती
नवसृजनाचा प्रसाद चढवु ॥1॥
आधुनिक होऊ शेतकरी
परंपरा तरी वारकरी
जोडू किनारे प्रेमाचे
नद्यांचेही कितीतरी ॥2॥
नको हिंसा नको दहशत
शत्रु उतता दावु ताकद
सदैव जागे राहुनि राखु
अपुली सीमा अपुली सरहद् ॥3॥
दास होऊया परिश्रमाचे
कर्तव्य निभावु चतुःश्रमाचे
होऊनि मुक्त व्यसनातुनि
मोह त्यागु विश्रामाचे ॥4॥
पोर दिसता कुणी उपाशी
कवळुनि घेऊ त्यास उराशी
कणवेने भरवुनि कवळ
मैत्र जोडुया करूणेशी ॥5॥
व्यवहार करु सचोटीने
काम करु हातोटीने
स्वच्छ करुया भ्रष्टाचारा
मानवतेच्या तुरटीने ॥6॥
नाठाळ नसे आप-परका
दोषी बंधुही रिपु सारिखा
सोडवु खटले थटलेले
न्यायात नको फ़क्त तारखा ॥7॥
उजळुन टाकू दिव्यभारती
भयमुक्त गाऊ काव्यभारती
पोलादाच्या कणखरतेने
नवी निर्मुया भव्यभारती ॥8॥
=================================
सारंग भणगे. (जानेवारी 2008)
No comments:
Post a Comment