एकच दिवस असा यावा, वा-यालाही सुगंध यावा,
प्राणवायु नसेल तरी; श्वास स्वच्छ धुंद यावा.
पिंज-यातले नुसते धावणे; जन्माला या पुजलेले,
क्षण काही तरी मिळावे; थकले डोळे निजलेले.
रहाट आहे चालु सदैव; जगणे कसले सडलेले,
फ़ेकून द्यावे एकदा तरी; खोटे कायदे किडलेले.
नाती ना ती कळलेली; नुसती नियती जुळलेली,
व्हावी निदान एकदातरी; ओली फ़ांदी वाळलेली.
दंग कोकिळा गाण्यामध्ये; पिलास भरविते काऊ,
स्तनामधल्या पाझराने; बाळा घालावे न्हाऊ.
उर्मी सर्वदा उंच उडावे; उगा अन् मग पंख थकावे,
सवंगड्यासह शीतल पाणी; अंगावर कधी शिंपावे.
मुक्त मनाने कधी वाटते; अंबरात मुग्ध विहरावे,
आकाशाच्या भारानेही; क्षितीजावरती पसरावे.
===============================================
सारंग भणगे. (08-11-2008)
No comments:
Post a Comment