अनंत मरणे भोगीत जगे
थोपवून मृत्यु शरपंजरी,
एकच आशा भीष्म निश्चित
येशीलच तू कधीतरी.
शापित संचित घेऊन भाळी
कवच देऊनि कर्ण भिकारी,
रुतता चक्र रथाचे निश्चित
येशीलच तू कधीतरी.
शतशत वधून असुर दानव
श्रांत तरी ना श्याम मुरारी,
अटळ यादवी अनंतास अंती
येणारच तू कधीतरी.
कडाडली ती वीज नभी
उपसून हाती तलवारी,
झाशीवीण जीणे व्यर्थ असता
येशीलच तसाही तू कधीतरी.
घावावरती घाव पडती,
छिन्नविछिन्न छातीवरी,
जीवंत 'बाजी' मरण्यासाठी
येशीलच तू कधीतरी.
मी फ़क्त म्हणालो "प्रेम करा",
अन् तुम्ही चढविले मज सूळावरी,
येशीलच तू कधीतरी पण,
पुन्हा यायचे तुज कधीतरी.
नवदिशांचे आव्हान पेलण्या
भिस्त अमुची शिडावरी
भूतळी वा सागरतळी
येशीलच तू कधीतरी.
आज अखेर युगान्त झाला,
देह अवघा चंदन झाला,
अस्तंगत भास्कर उदधि-उरी,
येशीलच तू कधीतरी.
==========================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)
1 comment:
ही कविता अप्रतीम आहे...
न जाणे का पण प्रचंड आवडली..
Post a Comment