जानकी....
ती 'वेळ'च तशी होती,
रावण जिंकणा-या रामाला,
धोब्यानं बोलण्याची..
अहिल्येला मुक्त करणा-या राघवाला,
सीते, तुझी सुवर्णमुर्ती
अश्वमेध यज्ञाला बसवण्याची...
ती वेळच तशी होती, पृथे....
तुझ्या प्राक्तनाचा समागम
हिरण्यगर्भाशी होण्याची,
आशिर्वचनच शाप होऊन
तुझ्या गर्भात दुःखाचं मूल कि मूळ
जन्म घेण्याची.....
अहिल्येSSS, ती वेळच तशी होती...
तपस्वी गौतमानंही,
संयमाचं दावं तोडून
तुझ्या भाग्याला ढुशी देण्याची,
कुणाच्या लालसेनं
कुणी लाथाडावं
कुणाच्या लाथेतून
मुक्त होण्यासाठी.....
ती वेळच खरेच तशीच होती, रेणूके.....
दुष्टांचं निर्दालन करुन,
उदधिला मागं सारणा-या
चिरंजीव भार्गवानं,
पित्याच्या आज्ञेसाठी
जगन्मातेला परशुचे कंठस्नान घालण्याची..........
कसली ही अभद्र वेळ..........
======================================================
सारंग भणगे. (22 नोव्हेंबर 2008)
No comments:
Post a Comment