Sunday, November 9, 2008

मृत्युसोहळा

इस्पितळाच्या उद्घाटनाचा तो सोहळा होता,
शय्येवरती तळमळणारा जीव कोवळा होता.

वैद्यराज ते अगत्याने स्वागता उत्सुक,
यमराज ते आगंतुक प्राणहरणा उत्सुक.

दिमाख पोषाखांचे त्यांच्या अत्तरांचे सुगंध,
प्राण असती त्या रूग्णाचे श्वासयंत्रात बंद.

उत्तमोत्तम पदार्थांची श्रीमंत अशी मेजवानी,
नसात सुया खोवून वाहते सलाईनचे पाणी.

अभिनंदनाच्या फ़ैरी आणी भेटींचा वर्षाव,
आगाऊ रक्कम चुकता आहे जगण्याला अटकाव.

ग्राहक तो रूग्ण त्यासी पाहती सारे दुरून,
यातनांच्या शय्येवरती दुःखाचे पांघरूण.

भिंतीवरती लिंबूमिरच्या काळ्याबाहुल्या खोचलेल्या,
डोळ्यांभोती झटपटलेल्या काळबाहुल्या नाचल्या.

थाटात बुडाले सन्मान्यजन, परदुःखाचे सोहळे,
कर्जात बुडाले सामान्यजन, रूग्णास मृत्युचे डोहाळे.
===================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...