हा क्षण धन्यतेचा!
हा क्षण पूर्ततेचा!
राजा तव हुजुरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
मनि न उरले कसले किल्मिष
काय पुरावे आता आमिष!
झालो अधीर पुरता अनिमिष
स्वराज्यवेदीवरी; कराया मृत्योत्सव साजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
प्रगाढ मिठी ही अंधाराची
बारीक चाहूल जनावरांची
जटिल जाळी धीवरांची
हूल देऊनि, हळूच निसटा; या यवन अजगरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
जाता तुमची दूर पालखी
आयुष्याची लिप्सा हलकी
जीजीविषा ही होय शेलकी
सफ़ल होता हेतू तर मग; मृत्युही दिसे गोजीरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
जीवंतपणी ना जरी वाजले
शरीर अलगुज आता सजले
बलिदानाचे सूर पाजले
मृत्युओठी अखेर वाजवा; कि मुरडा या गाजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
प्रसंग बाका दिलेरीचा
वेढ्यात राजा शिवनेरीचा
नजराणा या शरीराचा
पेश करता होईल कठोर मृत्युही लाजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
फ़ितवेन अवघे शत्रुशिबिर
लावेन ललाटी त्यांच्या अबीर
भेद खुलता अतीव खंबीर
अभेद्य राहतील राज ऊरी; जरी फ़ुटला शरीर पिंजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
शत्रुहाती मी मृत झालो
इतिहासातून विस्मृत झालो
तरी म्हणेन कृतकृत झालो
स्वातंत्राच्या सूर्यासाठी; अर्पण शिवबांचा हा हुजरा,
हा 'अखेरचा मुजरा'...हा 'अखेरचा मुजरा'...
===================================
सारंग भणगे. (ऑक्टोबर 2008)
No comments:
Post a Comment