जातेस? निःसंकोच मनानं जा!
जाताना....... घराचं दार घट्ट लाऊन जा,
तुझ्या स्मृतींचा वारा...
दाराच्या फ़टीतून झिरपणार ही नाही..
इतकं घट्ट.
गेल्यानंतर परतायचे सारे मार्ग,
तुझ्या पावलांचे सारे माग...
पुसत जा.
फ़क्त तुझ्या भाबड्या अश्रूंचे...
चारच थेंब त्या पेल्यात सोडून जा,
माझ्यासाठी.
जाताना सगळी भांडी स्वच्छ धुवून..
निथळायला ठेव;
आता ती पुन्हा उष्टावणारच नाहियेत.
त्यावरच आसक्तीचं सगळं पाणी निथळू देत.
सगळं घर स्वच्छ झाडून घे;
सगळी जळमट काढून टाक;
आणी घरभर पसरलेली..
आपल्या सहवासाची क्षणमौक्तीक
वेचून...
एका पॉलिथिन मध्ये गुंडाळून घेऊन जा;
अन् जाताना ती एखाद्या..
कुमारी आगीत टाकून दे.
एकदा सगळ्या खोल्यातून डोकावून जा..
कुठे माझ्या ह्रुदयातील..
तुझी हळवी स्पंदनं दिसतील,
त्यांना तसेच राहू देत,
मला एकांतात साथ द्यायला.
सगळ्या खिडक्या बंद करुन घे,
धुळींची कुठलीच वादळं..
पचवायची ताकद माझ्यात आता नाही.
खिडक्यांचे पडदेही सारखे कर,
अतिथि म्हणूनही प्रकाशाचे किरण मला नको आहेत.
आता या..
अंधारल्या विश्वाचा निकोप निरोप घे,
निरोपाचा हातही न उंचावता.
जाताना एक्दाच मला तुला..
डोळे भरुन पाहू देत,
या अंधारविश्वात..
तुझं वास्तव्य हरपण्यापूर्वी,
तुझं अस्तित्व मला काळजाच्या मखरात...
साठवून घेऊ देत,
जर अश्रूंच्या पडद्यातून..
ते धुसरपणे दिसलं तर.
आता,
अखेरचा निःश्वास घेण्यास,
मी "मुक्त" आहे.
========================================
सारंग भणगे. (Oct. 2008)
No comments:
Post a Comment