Tuesday, November 18, 2008

बाजीप्रभुंचे विजयोद्गार


लढेन मी लढेन मी,
मृत्युकडा हा चढेन मी.

धडधडेल ना हे ह्रुदय जरी,
फ़डफ़डतील हे बाहु परी,

शत्रुवरती खड्गविशाखा
अस्मानातून पडेन मी.

शत्रुसेना मृत्युसेना
उडेल दोघांचीही दैना
पराक्रम हा पराकोटीचा
कोटीकोटी मुंड खुडेन मी (1)

धीर नको रुधिर हवे
यमयज्ञाला शीर हवे
तोषवीन मी काळभैरवा
तदनंतरच पडेन मी. (2)

भुजा नव्हे या तरवारी
कंठ नव्हे महातुतारी
ऊर नव्हे ढाल अभेद्य
मृत्युमुशीतून घडेन मी. (3)

आवेश हा वेष नव्हे
त्वेष हा द्वेष नव्हे
रक्त पिऊनी खड्गाने
ऊर फ़ाडूनी रडेन मी. (4)


नरमुंड्या धारूनी रणचंडी
कृतांतकटकाची दिंडी
वाजत गाजत वायुवरती
मृत्युसुगंधित उडेन मी. (5)

दरी नव्हे ही यमोदर
मृत्यु भासे सहोदर
अकाल काळा तोषविण्या
खिंडीमध्ये जडेन मी. (6)

शत्रु भले असो दिलेरीचा
छावा लढतो शीवकेसरीचा
अखेर 'बाजी' जिंकण्यासाठी
खिंडीमध्ये भिडेन मी. (7)

विझण्याचे केवळ एकच कारण
प्राण ठेवले त्यास्तव तारण
फ़ैरी झाडता तोफ़ बुलंदी
मृत्युकड्यावरून पडेन मी. (8)

==========================================
सारंग भणगे. (नोव्हेंबर 2008)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...