Saturday, November 29, 2008

आकांत.

जीवास मूल्य नाही; नित्य झाले आघात,
राजा करी प्रजेचा.. घात;झाला प्रघात.

थडग्यात जीवंत झाली; अपत्ये अधर्मी,
कर्दमात लोटली जनता; डुकरे नीचकर्मी.

बडदास्त बड्यांची बडी; बोकडे कटली;
खासदारी आमजनांची; गा-हाणी थटली.

स्फ़ोटात फ़ुटली उरे; विदीर्ण शरीरे,
बोचती जखमांची शरे; तुटली शीरे.

पुरात बुडाले कुणी; कुणी कर्जात,
कत्तली दंगली नित्य; प्रदेश कधी जात.

फ़ोडल्या मशिदी मंदिरे; बांधल्या उंच भिंती,
चिणली माणुसकी त्यात; ठेचली धर्मनीती.

त्याग झाला निष्फ़ळ; भोगलिप्सेचे कल्लोळ,
नशा-निराशा-नाशाचे; तारुण्यावर लोळ.

उभा देश जळतो आहे; मानवता भ्रांत,
घणाघाती आघात; अगडोंब आकांत....अगडोंब आकांत.
===================================
सारंग भणगे. (28 नोव्हेंबर 2008).

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...