Saturday, November 1, 2008

"वनमृगजल"

गर्द रानी गहिरी वाट
विशाल वृक्षे वन घनदाट
उदंड वनिता हिरवी लाट
तलम धुक्याचा आंतरपाट

हस्तसरींच्या विराट धारा
पिसाट सुटला वादळवारा
उत्फ़ुल्ल् फ़ुलला हरित पिसारा
मेघ गर्जती तारस्वरा

काय म्हणावे सृष्टीमैथुन
वसुंधरेसह व्योमी मंथन

उचंबळले गगनाचे स्तन
मेघनभांचे धरालिंगन

अजस्त्र उठली ढगात लाट
जळात बुडली प्रांजळ वाट
सरीता वाहे जणू विराट
ताम्रसुरेचा गढुळ पाट

वनचर सारे थरारले
वनवैभवही शहारले
धुरकट अंतर काहुरले
मृग भयकंपित बावरले

वनात उधाण भयाण वारा
वरुन वाहती विराट धारा
मृगास वाटे वाट सहारा
भ्याले पाहून प्रवाह पहारा

वनसृष्टीचा हरित रंग
मृदायुक्त ताम्र जलतरंग
सुवर्ण कांतीचे मृगसारंग
किशोर चित्रीत अद्भूत रंग

================================
सारंग भणगे. (01 नोव्हेंबर 2008)

1 comment:

सचिन कृष्णा तळे said...

वा खूप सुंदर ... आवडली

Related Posts Plugin for WordPress, Blogger...