निरोप ..
पापण्यांच्या पाकळ्यांवर जमलेले दव
ओघळत राहिले हळुवार ..
कित्येकदा, त्या वेळी ..
...
दाटलेल्या कंठात शब्दांची गर्दी
अडखळली वाक्ये
कित्येकदा त्या वेळी ..
थरथरत्या मनात, भावनांचा प्रपात
लपवले कंपित हात,
कित्येकदा त्या वेळी..
अखेरची नाही भेट, जुळतील वाटा पुन्हा
समजावले मनाला,
कित्येकदा त्या वेळी..
चिडलो, रडलो, हसलोही जरा खिन्नपणे,
नेमका निरोपच घ्यायचा राहिला ..
अखेरचा .. त्या वेळी ..
-कल्याणी
पहाटे १:४५
टिप : 'Life of Pi' चित्रपटातील एका प्रसंगाने प्रेरित !
========================================================================
कविता अत्यंत सुरेख आहे!
पापण्यांच्या पाकळ्या, त्यावरल दंव, अर्थात अश्रू, हे कदाचित नवीन नसेल. परंतु यातून कवियित्री एक भावनिक मार्दव शब्दातून निर्माण करते. समोर उभी राहते, एका खिन्न फुलाची अश्रूत भिजलेली पाकळी......
मला यात 'रडणे' हि प्रक्रिया अपेक्षित नसून, त्यातून मनाची खिन्नावस्थाच अधिक प्रतीत करण्याचा प्रयत्न कावियीत्रीचा प्रयत्न असावा असे वाटते.
'कित्येकदा त्यावेळी' हि कवितेची मध्यवर्ती theme. इथे त्यावेळी म्हणजे नक्की कुठल्या वेळी (?), किंवा नक्की काय घडले असताना हे कवियित्री कुठेच स्पष्ट करत नाही. परंतु त्यामुळेच वाचकाच्या मनात त्याच्या जीवनाशी निगडीत एखादा प्रसंग आपोआपच उभा राहतो आणि पहिल्याच फटक्यात हि कविता केवळ कावियीत्रीची न राहता, कवितेच्या मुलभूत वैश्विक अपेक्षित नियमानुसार ती कविता सर्वांची होते, खऱ्या अर्थाने वैश्विक होते.
इथे मनाची ती खिन्नता, उद्विग्नता, विषण्णता अधिक गहिरी होते कारण 'त्यावेळी' अशी मनाची अवस्था 'कित्येकदा' झाली होती, ती अनामिक मूक असावे कित्येकदा गळाली होती, यातून ती भावगहनता अधिक प्रतीत होते, त्यातील आर्तता अधिक अधोरेखित होते.
सुरुवातीलाच पकडलेला हा सूर संपूर्ण कवितेमध्ये मग पुन्हा कधी ढळतच नाही......उलट तो अधिक अधिक उत्कट होत जातो.
अशा मानस अवस्थेमध्ये शब्दांचे मुके होणे, हातांचे कंपित होणे....हे सारे स्वाभाविक शारीरिक आणि मानसिक परिणाम अत्यंत परिणामकारकरित्या कावियीत्रीने मांडले आहेत, आणि ते देखील कवितेतील भाव-सूर कुठेही फार कमी-अधिक होऊ न देता! आणि प्रत्येक वेळी 'त्या कुठल्यातरी अनामिक वेळी' हे घडले आहे हे वारंवार मांडून वाचकाला त्या प्रसंगाबद्दल औत्सुक्य निर्माण करतानाच त्याच्या जीवनातील कुठल्याही भाव-व्याकूळ प्रसंगाचे स्मरण करून देण्याची ताकद या कवितेच्या ओळींमध्ये जाणवली.
हि सारी भावावस्था अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडताना कवितेतील काव्यभाव इतका सुरेख सांभाळला आहे कि वाचक आपोआपच कवितेच्या ओळींमध्ये तल्लीन होऊन जातो. मनाचे कोमेजणे इतके सुंदर फुलवले आहे कि जणू दु:खानेच शब्दांचा शृंगार केला असावा!
कंठाचे दाटणे, शब्दांचे आटणे हे इतके स्वाभाविक भाव अत्यंत संयत उत्कटतेने प्रकट झाले आहेत. इथे माझेही शब्द आता मला सांगत आहेत कि इतक्या सुंदर ओळींवर तुझ्या शब्दांचा साज चढवण्याचा प्रयत्न वृथा आहे, तो करू नकोस. नाहीतरी चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कशाला हवे!
'अखेरची नाही भेट'.....हा आशावाद भासेल कदाचित, पण तो भाबडाच आहे हे 'समजावले मनाला' मधून लगेचच स्पष्ट होते. इथे पुन्हा अशा भावावास्थेमध्ये उलगडणारा मनाचाच पुन्हा एक भाव-पदर. ती भेट कदाचित शेवटचीच असेल हे माहित असते, परंतु मन ते मनात नाही. त्यावेळी नाही, आणि नंतरही कित्येकदा नाही. मी स्वत: अशा प्रसंगातून गेलेलो आहे. त्यामुळे या शब्दातून काय सांगायचे आहे त्याची अनुभूती मी घेतली आहे.
पुन्हा एकदा असे ते मनाला समजावणे कित्येकदा घडते आणि मनाची भावविभोरता अधिकच ठळक होते.
कवितेचा शेवट केवळ अप्रतिम आहे! तो वाचल्यानंतर क्षणभर श्वासच थांबतो.
तो प्रसंग असा काही असतो कि त्यात केवळ रडणे नसते, चिडणे आहे, रडणे आहे, त्रागा करणे आहे, खोटे खोटे हसणे आहे. अनेक भावनांचे नर्तन मनात चालू असते कारण ते कुणाचे तरी दूर जाणे हे सहनशक्तीच्या पलीकडचे असते. तो वियोग साहणे जड असते. आणि त्या प्रसंगाला भावनांचा असा कल्लोळ स्वाभाविक असतो.
परंतु तिथेच ती चूक घडते. या भावनांच्या भरात कवियित्री इतकी वाहून जाते कि दूर जातानाचा निरोप राहून जातो.................... केवढी हि हुरहूर मागे ठेऊन जातो हा प्रसंग! ज्याच्या विरह भावनेत मनामध्ये इतका कल्लोळ माजला आहे, ती व्यक्ती किंवा गोष्ट दूर जाताना 'शेवटचा निरोप' हि राहून जावा! हो, इथे मला Life of Pie मधला तो प्रसंग आठवला.......
कविता वाचायला सुरुवात करण्याच्या आधीच वाचले होते कि हि कविता Life of Pie वरील प्रसंगावरून लिहिली आहे. परंतु स्पष्ट नव्हते झाले कि तो प्रसंग कोणता? कविता सुंदरच असल्याने लिहिता लिहिता लिहित गेलो. अगदी या शेवटच्या ओळींवर लिहित गेलो आणि 'शेवटचा निरोप' हे शब्द लिहिले आणि त्यानंतर मग अचानक Life of Pie मधला वाघाच्या जंगलामध्ये निघून जाण्याचा प्रसंग उभा राहिला.
हि कविता इथे संपूर्ण यशस्वी होते. कारण आधी माहित असूनदेखील वाचक कवितेवर विचार करताना ती एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे हे विसरून जातो; आणि जेव्हा शेवटला पोहोचतो, तेव्हा तो प्रसंगच त्याला आठवतो. म्हणजे कुणाला तरी कुठल्या ठिकाणाचा रस्ता विचारावा, त्याने सहज गप्पा मारता मारता बरोबर चालायला लागावे, त्याच्या गप्पा इतक्या मनोरम असाव्यात कि आपण गप्पात हरवून; हरखून जावे आणि आपल्याला कुठे जायचे आहे ते विसरावे, आणि अचानक त्याने आपल्याला जिथे जायचे होते तिथे आणून सोडावे............असेच काहीसे झाले हे!
सुरेख कविता!!!!
--
सारंग भणगे